धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान,पुणे

    10-Nov-2021
Total Views |

pravin dareklar.jpg_1&nbs



पुणे शहरातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दि. २६ ऑक्टोबर रोजी ३५ वर्षे पूर्ण झाली. या अप्रतिम अशा शिल्पाकृतीची उभारणी ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती’ आणि ‘धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान,पुणे’ यांच्या माध्यमातून सुरेश दत्तात्रय नाशिककर या शंभुभक्तांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून पूर्णत्वास आली. या कार्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.




१९७८ साली हिंदू धर्मतेजाची जनजागृती करण्याच्या उद्देशातून शिवाजीनगरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, पुणे’ या नोंदणीकृत संस्थेची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून घडलेले सुरेश नाशिककर यांच्या पुढाकाराने संस्थेचे कामकाज सुरु झाले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रासंबंधी फारशी पुस्तके, ग्रंथ साहित्य त्यावेळी उपलब्ध नव्हते. ऐकीव परंपरांगत चालत आलेली माहिती आणि बखरकारांनी रंगविलेले चरित्र हेच पुराव्याचे आधार होते. सुरेश नाशिककरांनी संभाजीराजांच्या जीवनाचा अभ्यास सुरु केला. रियासतकार देसाई, वा. सी. बेन्द्रे यांचे ग्रंथ आणि डॉ. कमलाताई गोखले यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ या ग्रंथाचा अभ्यास केला. दत्तात्रय चोरगे, विजयराव खेडेकर, सुभाश खाडिलकर, अ‍ॅड.विनायक अभ्यंकर, गजाभाऊ आपटे, सुरेश पायगुडे, बाळासाहेब थोरात, दिलीपराव ठकार, नानासाहेब बुट्टेपाटील, शंकर पासलकर, गिरीश आचरेकर, बाळासाहेब सुपेकर या कार्यकर्त्यांच्या सहभागातून प्रतिष्ठानचे कार्य सुरु झाले.त्यातूनच छत्रपती संभाजी महाराजांचा हा देशातला पहिलाच पुतळा पुणे शहरात उभा राहिला, याचे सारे श्रेय शंभुभक्त सुरेश नाशिककरांचे आहे, यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या पुतळ्याचा अनावरण समारंभ तितकाच चिरकाल संस्मरणीय असा झाला. भारताचे माजी पंतप्रधान आणि लोकनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण झाले होते. या प्रसंगी अटलजी आपल्या भाषणात म्हणाले, “शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी, तेजस्वी, कर्तृत्ववान, साहसी राजे होते. ते धर्मउद्धारक होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले. धर्मवीर असणार्‍या संभाजीराजांचे जीवनचरित्र लोकांच्या समोर आले पाहिजे. ते काम आज पुणेकरांनी केले आहे. त्यांचे हे शिल्पाकृती स्मारक समाजजीवनाला विशेष करून नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील.” पुतळ्याचे कौतुक करत सुरेश नाशिककरांनी या स्मारकाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष कौतुकाची पाठीवर थाप टाकायला अटलजी विसरले नाहीत. त्यांच्या खास शैलीत अभिनंदन करुन ”हे शिल्प म्हणजे पुणे शहराची शान आहे,” असे ते म्हणाले. डेक्कन जिमखान्यावर ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती, पुणे’ आणि ‘धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, पुणे’ यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या अप्रतिम अशा शिल्पाकृती निर्मितीतून सुरेश नाशिककरांनी धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मारक साकारले. देशातला पहिलाच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा म्हणून त्यांचे विशेष अप्रूप म्हणावे लागेल. तरुण शिल्पकार संजय परदेशी या कलाकाराने हा पुतळा तयार केला आणि पुतळा तयार करण्यासाठी त्यांना शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन लाभले. ‘छत्रपती संभाजी महाराज ३०० वा बलिदान सोहळा समिती’ सुरेश नाशिककरांच्या प्रयत्नातून स्थापन झाली. या समितीच्या अध्यक्षपदी सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले होत्या. समितीमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, व्याख्याते शिवाजीराव भोसले, ‘छावा’कार शिवाजीराव सावंत, प्रतापराव तथा तात्या गोडसे, शाहीर योगेश इ. मान्यवरांचा सहभाग होता.




१९९३ पासून ‘धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान’ने ‘धर्मवीर पुरस्कार’ प्रदान करायला सुरुवात केली. संभाजी महाराजांचा पुतळा असलेले स्मृतिचिन्ह, मानपत्र, फेटा आणि ‘शौर्य तलवार’, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निर्मितीसाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. स्मारकाला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने पुन्हा एकदा शंभुतेजाचा जागर करुन पुतळा उभारणीसाठी ज्यांचे सहकार्य लाभले, अशा काही ज्येष्ठ सहकार्याचा सत्कार करण्यासाठी एका छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन दि. २६ ऑक्टोबर रोजी ‘सावरकर अध्यासन केंद्र’, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खा. प्रदीपदादा रावत, सिनेअभिनेते प्रवीण तरडे इ. मान्यवर उपस्थित होते.धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या धर्मकार्यासाठी आपले प्राण वेचले. त्यांच्या जीवनप्रेरणेतूनच ‘धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान’ही समाजासाठी अखंड कार्यरत आहे. सुरेश नाशिककर यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने प्रतिष्ठान आज पुणे आणि परिसरात सामाजिक जागृती करत आहे. नव्या पिढीला राष्ट्रप्रेम आणि समाजनिष्ठेची बांधिलकी शिकवीत असे. या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला शिवाजीनगरात पाच बालवाड्या सुरु करण्यात आल्या. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले.




- नंदकुमार राऊत