वानखेडेंची अनुसूचित जाती आयोगात धाव; महाराष्ट्र सरकारकडून मागवला अहवाल

01 Nov 2021 16:15:38
sameer wankhede _1 &




मुंबई -
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सोमवारी दिल्लीत पोहोचले. त्यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे (NCSC) पोहोचून त्यांच्या जातीशी संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यांनी आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांचीही भेट घेतली. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर मुस्लिम असल्याचा आरोप करत जात लपवल्याचे म्हटले होते.

 
समीर वानखेडे यांनी शनिवारी एनसीएससीचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. रविवारी हलदर यांनी समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. या भेटीवर प्रश्न उपस्थित करत मलिक यांनी हलदर यांच्याबाबत राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी सोमवारी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली. यावेळी विजय सांपला आणि समीर वानखेडे यांच्यात सुमारे अर्धा तास बैठक झाली.
 
 
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला हे आजच्या बैठकीबाबत म्हणाले की, “आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे मला भेटायला आले होते. त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी तक्रार देखील केली होती, ज्याच्या आधारावर आम्ही महाराष्ट्राचे गृह सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे आणि सात दिवसांत उत्तर मागितले आहे. आज त्यांनी आम्हाला त्यांचा धर्म आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व कागदपत्रे दिली आहेत. आम्ही ते महाराष्ट्र सरकारकडे पाठवले असून ही सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे आढळल्यास त्यांनी काळजी करू नये. समीर वानखेडे यांनी सांगितले की, ते अनुसूचित जातीतून येतात. त्यांनी आयोगाला संबंधित सर्व कागदपत्रे दिली आहेत.
मलिक यांचा आरोप आहे की, नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी मुस्लिम असूनही दलिताचे खोटे जात प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर वानखेडे यांनी डीडीजी एनसीबीची भेट घेण्यासाठी दिल्लीतील कार्यालय गाठले. वानखेडे यांच्यावरील २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाची चौकशी एनसीबीची दक्षता शाखा करत आहे. 







Powered By Sangraha 9.0