सर्वांचे लाडके ‘नट्टू काका’

09 Oct 2021 12:37:07

Nattu Kaka _1  





आपले दुःख पचवून दुसर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू फुलवणारे, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील ‘नट्टू काकां’ची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी...
 
 
 
"Laughter is the best Medicine" ही इंग्रजीमधील म्हण अगदी सर्वश्रुत. अर्थात, हास्य हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. म्हणूनच तर अनेकदा विविध ठिकाणी आपण ‘लाफटर थेरपी’ वापरल्याचे बघतो. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी बरेचदा विनोदी चित्रपट अथवा कधी विनोदी कार्यक्रमही दाखवले जातात. अशाच एखाद्या थेरपी सेशनचा भाग म्हणून काही ठिकाणी तर चक्क ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिकादेखील दाखवली जाते. या मालिकेत घनश्याम नायक यांनी साकारलेले ‘नट्टू काका’ हे घराघरात पोहोचलेले पात्र सर्वस्वी लक्षवेधी ठरले.
 
 
 
अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ प्रेक्षकांच्याही पसंतीस पडलेले हे पात्र. त्यातच फक्त नट्टू काकांचाही असा एक वेगळा चाहतावर्ग आहे. याच पात्रामुळे घनश्याम नायक यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण त्यांना अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवून जवळपास ५० वर्षे झाली. तरी वयोमानापरत्वे त्यांचे अभिनयावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. एकीकडे ते प्रेक्षकांना हसवत होते, तर दुसरीकडे ते कर्करोगाशीही नेटाने लढा देत होते. अखेरच्या श्वासापर्यंत अभिनय सोडणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. त्यांचे आयुष्यही संघर्षमयी होते.
 
 
ब्रिटिशपूर्व काळात १२ मे, १९४४ रोजी घनश्याम नायक यांचा जन्म गुजरातमधील उथाई येथे झाला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या घनश्याम यांना लहानपणापासूनच अभिनयाचे वेड. विशेष म्हणजे, अभिनयाचा वारसा हा त्यांना घरातूनच लाभला. त्यांचे वडील आणि मोठे बंधू हे रंगभूमीचे कलाकार होते. घनश्याम यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. याचदरम्यान, घनश्याम यांनी लहान असतानाच रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. वडील आणि भावाप्रमाणे त्यांनीदेखील नाटकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या.
 
अभिनयासाठी ते मुंबईमध्ये राहू लागले. त्यांचा अभिनय पाहता पुढे एका चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांना कामही मिळाले. १९६० मध्ये अशोक कुमार यांच्या ‘मासूम’ चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात त्यांनी पहिले पाऊल ठेवले. हिंदी तसेच गुजराती चित्रपटांमध्येही त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बालक ध्रुव’मध्ये काम केले. त्यांच्या वाट्याला कधीच मोठी भूमिका आली नाही. या दरम्यान त्यांनी हिंदी नाटकांमध्येही त्यांनी छोट्या भूमिका निभावल्या, तर गुजराती नाटक, चित्रपटांमध्ये ते सातत्याने कार्यरत होते. आपल्या अभिनय कौशल्यावर त्यांनी यावेळी जास्त लक्ष दिले.
 
 
यानंतर १९९२ मध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितची मुख्य भूमिका असणार्‍या ‘बेटा’ या चित्रपटात हवालदाराची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या. त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘बेटा’, ‘तिरंगा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘चायना गेट’, ‘इश्क’ अशा हिंदी व गुजराती मिळून २०० चित्रपट आणि शंभराहून अधिक गुजराती नाटकांमध्ये काम केले. यामध्ये त्यांनी फक्त विनोदी भूमिकेसाठी आपला अभियन मर्यादित न ठेवता, वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनाही पसंती दिली. याशिवाय त्यांनी १२ चित्रपटांसाठी गाणी गायली असून, ३००हून अधिक चित्रपटांसाठी ‘डबिंग’ही केले आहे.
 
 
घनश्याम नायक यांच्यावर एक वेळ अशी आली होती की, त्यांना तीन रुपये कमावण्यासाठी २४ तास काम करावे लागत होते. कधीकधी त्यांना केलेल्या कामाचे मानधनदेखील मिळाले नाही. यादरम्यान घरभाडे देण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी शेजार्‍यांकडे उधार मागण्याची वेळ आली होती. तो काळ त्यांच्यासाठी खूप कठीण गेला. भूमिका मिळवण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागली. पण, त्याकाळातदेखील कधीही त्यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार केला नाही. मनात कायम एक जिद्द ठेवून मिळेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी अगदी रस्त्यांवरही कार्यक्रम केले. छोट्या पडद्यावर ‘दूरदर्शन’वरील मालिकांमध्येही अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. ‘खिचडी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘दिल मिल गये’ याशिवाय तब्बल ३००हून अधिक मालिकांमधील त्यांचा अभिनय अजूनही लक्षात राहील, असा.
 
 
परंतु, हवी तशी प्रसिद्धी मात्र त्यांना मिळाली नाही. अखेर २००८ मध्ये त्यांनी ‘तारक मेहता का उलटा चश्मा’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी साकारलेले ‘नट्टू काका’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागले. या मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना कर्करोगाने ग्रासले. उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करून घनश्याम यांच्या घशातून आठ गाठी काढण्यात आल्या. त्यानंतर स्वरयंत्रावर परिणाम झाल्याने घनश्याम घरी आराम करत होते. अखेरच्या श्वासापर्यंत अभिनय करीत राहावा आणि चेहर्‍यावर मेकअप असतानाच मृत्यू यावा, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखविली होती. अखेर दि. ३ ऑक्टोबर, २०२१ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. घनश्याम नायक यांचे ‘नट्टू काका’ हे पात्र कायम सर्वांच्या स्मरणात राहील. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना श्रद्धांजली...
 
 
 
Powered By Sangraha 9.0