‘नेम ऑफ दि इव्हिल स्पिरीट’

09 Oct 2021 12:04:40

France_1  H x W



“चर्चमध्ये केलेले ‘कन्फेशन’ (कबुल केलेला गुन्हा) हे गोपनीय असते. चर्चमध्ये गुन्ह्यासंदर्भात दिलेली कबुली ही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे,” असे ‘फ्रान्स बिशप कॉन्फरन्स’च्या प्रमुख सिग्नर एरिक डी मौलिंस-ब्यूफोर्ट नावाच्या बिशपने म्हटले आहे. फ्रान्स सरकारने या बिशपला कोर्टाचे समन्स पाठवले. फ्रान्स सरकारचे प्रवक्ते ग्राबिल एटलर म्हणाले की, “फ्रान्सच्या कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही,” तर दुसरीकडे फ्रान्सच्या गृहमंत्री गेराल्ड डरमेनिन यांना बिशपला भेटण्यास सांगितले गेले. असो. वरकरणी कितीही पुरोगामी निधर्मीतत्त्वाचा आव आणला, तरी पाश्चात्त्य देशांवर चर्चसंस्थेचे निर्विवाद वर्चस्व आहेच. मुस्लीम राष्ट्रांवर मुस्लीम धर्माचे वर्चस्व आक्रमकपणे दिसून येते, तर पाश्चात्त्य ख्रिस्ती देशांवर ख्रिस्ती धर्माचे वर्चस्व छुपे असते.
 
 
‘बिशप कॉन्फरन्स’च्या प्रमुखाने देशाच्या कायद्यापेक्षा चर्चची प्रथा श्रेष्ठ म्हणणे हे काही प्रासंगिक नाही, तर या सगळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. “मी, अथेन्सच्या देवतांना नाही; मात्र ईश्वराला मानतो,” असे म्हणणार्‍या सॉक्रेटिसचा मृत्यू आणि पृथ्वी सूर्याभोेवती फिरते म्हणणारा, गॅलिलिओचे शापित वृद्धत्व तथाकथित धर्म आणि न्यायमार्तंडांच्या क्रूरतेची साक्षच देणारे आहेत. त्यानंतर पाश्चात्त्य संस्कृतीत आणि राजसत्तेत बदल घडवू शकणार्‍या अनेक क्रांती जगाने पाहिल्या. मात्र, ही क्रांती केवळ सत्ताबदलाची होती की, त्यामुळे संस्कृती आणि समाजव्यवस्थेत बदल झाला का? ‘बिशप कॉन्फरन्स’प्रमुखाने चर्चसंस्थेला शासन संस्थेपेक्षा महत्त्वाचे असे म्हणणे सिद्ध करते की, चर्चव्यवस्था आजही स्वतःला शासन व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ समजते. त्यांच्या या समजण्याला प्रत्यक्ष शासन व्यवस्थाही मोठेच समजत असावी. त्यामुळेच तर संबंधित बिशपला फ्रान्सच्या गृहमंत्र्याला भेटण्यास सांगितले आहे. चर्चमध्ये बालकांवर झालेल्या लैंगिक शोषणाचा मुद्दा सध्या फ्रान्समध्ये गाजत आहे.
 
 
या अहवालाचे अध्यक्ष जॉ मार्क सावे यांनी या अडीच हजार पानी अहवालात अत्यंत तर्कशुद्धपणे तथ्य जगासमोर मांडली. १० ते १३ वर्षांची बालके त्यात ८० टक्के बालक आणि २० टक्के बालिका या अत्याचाराला बळी पडल्या. चर्चमधील पाद्री आणि संबंधित व्यक्तींनी हे अत्याचार केले. हे सगळे अत्याचार नियोजनबद्ध पद्धतीने लपवले गेले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावर पोप फ्रान्सिस, तसेच फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी भयंकर दुःख आणि संताप जाहीर केला. या सगळ्या प्रकारात फ्रान्स प्रशासनाने चर्चला गुन्ह्यासंदर्भातली माहिती देण्यासाठी आवाहन केले.
 
 
 
आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की, चर्च कसे काय गुन्ह्यांची माहिती देऊ शकेल? तर इथेही प्रश्न श्रद्धा आणि प्रथेचाच. ‘नेम ऑफ दि होली स्पिरीट’च्या नावाने चर्चमध्ये ‘कन्फेशन’ म्हणजे गुन्हा कबूल केल्यावर तो गुन्हा माफ होतो, अशी रोमन कॅथलिक चर्चची मान्यता आहे. १९५० सालापासून चर्चमधील श्रद्धाळू पादरी आणि चर्चव्यवस्थेतील व्यक्तींकडून तीन लाख बालकांवर अत्याचार झाला. गुन्हा केल्यानंतर गुन्हेगारांनी त्याबद्दलचे ‘कन्फेशन’ चर्चमध्ये केलेच असणार. गुन्हेगारांनी केलेल्या ‘कन्फेशन’ची माहिती चर्चकडे या न त्या स्वरूपात असणारच. त्यामुळे त्या कबुलनाम्यांची माहिती चर्चने प्रशासनाला द्यावी, असे फ्रान्स प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
 
यावर काही प्रश्न आहेत. गुन्हा केला आणि तो चर्चमध्ये प्रिस्ट समोर कबूल केला, तर माफ होतो का? गुन्हेगाराच्या या ‘कन्फेशन’ने त्याचा अत्याचार सहन करावा लागणार्‍या पीडित व्यक्तीला न्याय मिळतो का? ‘कन्फेशन’ केल्यानंतर गुन्हेगार पुन्हा गुन्हा करणारच नाही का? गुन्ह्याची कबुली दिली की झाले. पुढे-मागे वेळ आल्यास पुन्हा गुन्हा करू आणि त्यानंतर पुन्हा ‘कन्फेशन’ करू अशी मानसिकता गुन्हेगाराची कशावरून होऊ शकत नाही? बरं, हा गुन्हा जिथे कबूल केला जातो, तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने गुन्हेगाराच्या कबुलीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर? पण छे, असे प्रश्न बिलकूल पडू द्यायचे नसतात. जगाच्या पाठीवर सगळे विज्ञान आणि विद्वता केवळ हिंदू धर्माच्या चिकित्सेसाठीच वापरायची. इतर कोणत्याही धर्मपंथांच्या चालीरीती प्रथांबाबत केवळ श्रद्धा आणि ‘हे असेच असते’ म्हणत गप्प राहायचे. कायद्याचे श्रेष्ठत्व अमान्य करणार्‍या बिशप आणि चर्चव्यवस्थेवर फ्रान्समध्ये शासन आणि जनता काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, ‘नेम ऑफ दि होली स्पिरीट’च्या आड तीन लाख बालकांवरचा अत्याचार हे ‘गेम ऑफ दि इव्हिल स्पिरीट’ आहे.
 
 
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0