अमली पदार्थ आणि(सुदृढ?) तरुणांचा देश

09 Oct 2021 22:19:36

drugs 2_1  H x

हा संपूर्ण आठवडा माध्यमजगतात आणि समाजमाध्यमांमध्येही गाजला तो आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे. यानिमित्ताने पुन्हा एकदा ड्रग्जसेवनाचा भारतीय तरुणाईला बसलेला विळखा हा विषय चर्चेत आला. खरंतर प्रत्येकवेळी अशी एखादी घटना समोर आली की, त्यावर बर्‍याच चर्चा रंगतात. परंतु, त्यानंतर ठोस असे काहीच हाती लागत नाही, हे दुर्देव. त्यातच आज ‘युवकांचादेश’ म्हणून जग भारताकडे मानवसंसाधन मिळवण्यासाठी डोळे लावून बसले आहे. आज ६३ कोटी युवक (युवाशक्ती) भारताकडे आहेत. पण, या देशाला हा ‘सुदृढ युवकांचा देश’ म्हणता येईल का, हा खरा प्रश्न आहे. ही युवाशक्ती सुदृढ ठेवायची असेल, तर त्यांच्याशी पालकांचा मनमोकळा संवाद, घरात तणावरहित वातावरण, मुलांबरोबर अभ्यासेतर गप्पा, पालकांचं निर्व्यसनीपण, इ. बाबींची आवश्यकता आहे, तरच मोबाईल-इंटरनेटवरच्या आभासी जगाबाहेर तो येऊ शकेल.


ल्या रविवारी, दि. ३ ऑक्टोबरला समाजमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवर एकच खळबळ उडवून देणारी बातमी प्रसारित झाली. सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ने (एनसीबी) अटक केली. २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईहून गोव्याला जाणार्‍या प्रवासी जहाजावर ‘एनसीबी’ने छापा टाकून पाच ग्रॅम ‘एमडी’, १३ ग्रॅम ‘कोकेन’, २१ ग्रॅम ‘चरस’, ‘एमडीएमए’च्या २२ गोळ्या व काही रक्कम अमली पदार्थाच्या पार्टीत आर्यन खान आणि त्याचे मित्र, चाहते यांच्याकडून हस्तगत करून जप्त करण्यात आली. आर्यनबरोबर सिनेक्षेत्रातील इतर सात जणांनाही अटक करण्यात आली. या ‘रेव्ह पार्टी’ची ‘एनसीबी’ला आधीच माहिती मिळाल्याने छापा घालणार्‍या २० अधिकार्‍यांचे पथक प्रवासी म्हणून जहाजावर दाखल झाले होते.या घटनेबरोबरच गेल्या वर्षभरात ‘एनसीबी’ने एकापाठोपाठ एक अशा अनेक बेधडक कारावाया करून अमली पदार्थ उद्योग, निर्मितीपुरवठा करणार्‍यांवर एक जरब बसवण्याचा जो प्रयत्न होतो आहे, ते केवळ एका कर्तव्यकठोर, धडाकेबाज अधिकार्‍यांमुळे! ते अधिकारी म्हणजे ‘एनसीबी’चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे होय.सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाने सिनेसृष्टीतील तारे-तारकांचे ‘ड्रग्ज कनेक्शन’ उजेडात आणले गेले. तसा सामान्य माणूस हा ड्रग्ज किंवा अमली पदार्थांच्या विश्वाबद्दल अनभिज्ञ असतो. वानखेडे आल्यापासून ‘एनसीबी’ हा शब्द लोकांच्या कानावर वारंवार येऊ लागला. त्याआधी ‘एनसीबी’ फारसे कुणाला माहीत नव्हते. एखादाच अधिकारी आपल्या पदाचं काय मोल असतं, ते आपल्या कामावरील निस्सीम निष्ठेवरून दाखवून देत असतो. उदा. गो. रा. खैरनार, टी. एन. शेषन यांनाही जनता विसरलेली नाही. अगदी अलीकडेच म्हणजे २२ सप्टेंबरच्या वर्तमानपत्रात गुजरातमधील मुंद्रा बंदरात २१ हजार कोटींचे ‘हेरॉईन’, साबणवड्यांच्या रूपाने अफगाणिस्तानातून आलेले पकडून जप्त करण्यात आले. ‘हेरॉईन’ची किंमत किलो मागे सात कोटींपर्यंत असते. हे ‘हेरॉईन’ चेन्नई येथील एका ट्रेडिंग कंपनीने आयात केले होते. पण, आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात ते कसे आणले गेले, त्याची पाळेमुळे कुठे आहेत, यात कोणत्या बड्या धेंडांचा हात आहे याचा शोध घेणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज जगात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणारे सर्वात मोठेपण काळे धंदे म्हणजे दोनच - एक अमली पदार्थ (ड्रग्ज) व दुसरे अश्लील चित्र निर्मिती (पोर्न). यात मिळणार्‍या प्रचंड पैशांमुळे अनेकांना ही क्षेत्रे भुरळ पाडतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा अश्लील चित्रनिर्मितीच्या रॅकेटमध्ये असल्याने त्याच्यावर अलीकडेच कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. सिनेजगतातील रिया चक्रवर्ती, ममता कुलकर्णी इ. अनेक अभिनेत्रींनी आपल्या ‘ड्रग्ज कनेक्शन’मुळे आपल्या प्रतिमा मलीन करून घेतल्याचे चित्र समोर आहे. एका मद्याच्या ब्रॅण्डची जाहिरात शाहरूख खान करतो, तर अजय देवगण पानमसाल्याची जाहिरात करतो, ज्यामुळे लाखो-करोडो लोकांना आपलं जीवन अकाली संपवावं लागतं, याची त्यांना जराही जाण नसावी? त्यात काही कमी होती म्हणून त्याच्या जोडीला शाहरूख पण ‘विमल’ जाहिरातीत आला आहे! अशांना देव सुबुद्धी देवो, एवढंच आपण म्हणू शकतो.



२००७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने बजावले होते की, वलयांकित (सेलेब्रिटी) लोकांच्या ‘ड्रग्ज’ सेवनाकडे कानाडोळा करणे किंवा त्याबाबतीत नरमाईचे धोरण स्वीकारणे हे समाजात ‘ड्रग्ज’ वापराचा फैलाव होणे व जागतिक अमली पदार्थ व्यापाराला मोठी बरकत मिळण्यास प्रोत्साहन देण्यासारखे आहे. “सेलिब्रिटींचे ड्रग्जसेवन हे जनतेच्या एकंदर दृष्टिकोनावर, मूल्यांवर व वर्तणुकीवर खूप प्रभाव करणारे, विशेषतः तरुणांवर ज्यांनी ड्रग्जविषयी माहिती व अनुषांगिक भूमिका घेतलेली नसते, अशांवर अधिक प्रभाव करणारे ठरते,” असे त्या अहवालात नमूद केले होते. ते नेमकं आपल्या देशात आज घडत असल्याचं प्रत्ययास येत आहे.


अमली पदार्थ कोणते?


माणसाला अंतर्बाह्य पोखरणार्‍या मादक किंवा अमली पदार्थांची यादी सतत वाढतच असते. सर्व प्रकारची मद्ये, सर्व तंबाखूजन्य पदार्थ, ही तर परिचित मादक द्रव्ये आहेत.अफू, गांजा, चरस, दतुरा या पूर्वीपासून वापरत असलेल्या अमली पदार्थांपासून ते अलीकडच्या ‘कोकेन’, ‘हेरॉईन’, ‘इफेड्रीन’, ‘अ‍ॅम्फेटिमाईन’, ‘एलएसडी’, ‘एमडी’, ‘एम कॅट’, ‘म्याऊ म्याऊ’, ‘के2’, ‘स्पाईस’, ‘आयव्हरी वेव्ह’ इ. अनेक सिंथेटिक आणि विशेष म्हणजे डिझाईनर ‘ड्रग्ज’चं एक भयंकर वादळ आपल्या घराच्या दारापर्यंत येऊन ठेेपलं आहे. भरीत भर म्हणजे हे पदार्थ सुटे न घेता कफ सिरप, रम, पेप्सी किंवा कोकमध्ये मिश्रण करून घेण्याची टूम नव्यांना, विशेषतः तरुणींना या जाळ्यात अडकवण्यासाठी आकर्षक ठरत आहे.अमली पदार्थांच्या वापराचे अनेकविध मार्ग आहेत. तोंडावाटे सेवन करण्याबरोबर नाकावाटे हुंगणे, धूर आत घेणे, इंजेक्ट करणे इ. काही पद्धती आहेत. मध्यंतरी ‘पेपर ड्रग्ज’चा प्रकार प्रसिद्धीस आला. ‘एलएसडी सोल्युशन’चे काही थेंब स्टीकरच्या आकाराच्या कागदावर टाकले जातात व ते जिभेवर ठेवले की विरघळणे व त्याची नशाही येते.

 
कोण आहेत हे अमली पदार्थांचे सेवन करणारे?


काही वर्षांपूर्वी कामधंदा सुटलेले वैफल्यग्रस्त जीवनात अपयशी ठरले आहोत, अशी भावना बाळगणारे भणंग, कर्जबाजारी इ. माणसं जुन्या, पडक्या इमारती, उड्डाणपुलाखाली, वर्दळ नसलेल्या अंधार्‍या जागी बसून अमली पदार्थ चरस, गांजा, हशीशचं सेवन करीत बसलेले असायचे. पण, अलीकडे गेल्या दोन दशकांत हे चित्र बदलले आहे. नवीन ‘अर्बन जंकी’ पिढी शिकलेली १२-१४तास काम करणारी, ‘कॉर्ल सेंटर्स’, ‘मीडिया’, ‘आयटी’, क्षेत्रातील तसेच रात्रपाळी करणारी, तरुण-तरुणी, ‘पैसा फेकला की जगात काहीही मिळतं’ अशा विचारांनी मुलं-मुली ताणतणावाचा शॉर्टकट उतारा म्हणून सिगारेट, दारू, गांजा, ‘कोकेन’, ‘मेथ’कडे वळली आहेत. नव्हे, ‘हूक’ झाली आहेत. ‘पब्ज’, ‘क्लब्ज’, पार्ट्यांद्वारे कूल होण्यासाठी नशेच्या अत्युच्च शिखरावरील ‘हाय’ मिळवायचं म्हणजे या जगात ‘ड्रग्ज’शिवाय आहे तरी काय? त्यामुळे दारू-तंबाखूच्या व्यसनात या ‘स्मार्ट’ तरुणाईला स्वारस्य राहिले नाही, अर्थात ही व्यसनं चांगली आहेत, असं नव्हे. दारू-तंबाखूचं व्यसनही तितकंच धोकादायक आणि जीव घेणारं आहे, यात संदेह असायचं कारण नाही.
 
उपलब्धीचे मार्ग

 
नुसत्या मुंबई शहरात हजारो ‘ड्रग्ज पेडलर’ (विक्रेते) असून, त्यांची संख्या काढणे अवघड आहे. अलीकडे महिला पेडलर्सची संख्या लक्षणीय वाढली आहे. अनेक झोपडपट्टी भागात वृद्ध किंवा दिव्यांग महिलांकडे छोट्या प्रमाणातील चरस, गांजा विक्रीचे काम चाणाक्ष दलालांनी दिलेले दिसते. पण, उच्चभ्रू समाजातील तरुण मुले-मुली ‘डार्कनेट’सारख्खा वेबसाईटवरून ती सरळ घरी मागवता येतात. जागतिक अमली पदार्थ अहवाल २०१६ नुसार इंटरनेटवर ड्रग्ज खरेदीचे प्रमाण २००० साली १.२ इतके टक्के होतं, ते २०१४ मध्ये २५.३ टक्के एवढं प्रचंड वाढले. एवढेच नव्हे, तर इंटरनेटवर ‘ड्रग्ज’ची रेसिपी डाऊनलोड करून घरच्या घरी ‘किचन लॅब’मध्ये बनवणे तर निर्धोक झाले आहे. ‘डार्कनेट’सारख्या साईट्सवर आपली ओळख सांगण्याची आवश्यकता नसते. ‘बिटकॉईन’मुळे आर्थिक व्यवहार कुठेही कळून येत नाही. तंत्रज्ञानाचा वापर किती प्रमाणात मारक ठरू शकतो, याचा हा उत्तम मासलाच आहे.


परिणाम काय?


तंबाखू, दारू व अन्य मादक पदार्थ मानवी शरीरावर व मनावर अतिशय विपरीत परिणाम करतात. एक सिगारेट ओढली, तर आयुष्यातील पाच मिनिटे कमी होतात, असे संशोधन सांगते. आपल्या देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वर्षाकाठी १२ लाख लोक मृत्यूला कवटाळतात. म्हणजेच, रोज सुमारे तीन हजार लोक तंबाखूमुळे मृत्यू पावतात. तंबाखूत पाच हजार रसायने असून, त्यातील ६० रसायने ही ‘कारसिनोजेनिक’ म्हणजे कॅन्सरला कारणीभूत ठरणारी आहेत. त्यामुळेच भारत तोंडाच्या कॅन्सरबाबत जगात सर्वात वरच्या स्थानावर आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. ‘युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अ‍ॅण्ड क्राईम’ (णछऊजउ) यांच्या पाहणीनुसार भारतातील अनेक राज्यांत अमली पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण एक ते तीन टक्के असून, ते युरोपमधील ०.१ टक्के व अमेरिकेतील ०.२ टक्के या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण जास्त झाल्यावर त्याचे पर्यवसान आत्महत्येत होते. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रोज सहा आत्महत्या हा आकडा मोठा आहे. याशिवाय अमली पदार्थांचे मानवी मेंदूवर व शरीरावर परिणाम होत असल्याने व्यसनीला अनेक गुंतागुतीच्या मानसिक समस्येला तोंड द्यावे लागते.


देशाची भौगोलिक स्थितीही कारणीभूत?


एका बाजूला आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीचा मार्ग व दुसर्‍या बाजूल अफू लागवडीचा पट्टा अशा कोंडीत सापडल्यासारखी भारताची स्थिती आहे. दक्षिणपूर्व सुवर्ण त्रिकोण (सेश्रवशप ीींळरपसश्रश) ज्यामध्ये म्यानमार, थायलंड व लाओस हे देश तर दक्षिणपश्चिम सुवर्ण चंद्रकोर (सेश्रवशप लीशलशपीं) ज्यात इराण, पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश येतात. त्यामुळे अमली पदार्थांच्या सर्व धोक्यांना काही राज्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच एकेकाळचा जवानांचा सुजलाम, सुफलाम पंजाब आतून खिळखिळा होत असल्याचे चित्र आहे. १५ ते २५ वयोगटातील ७५ टक्के युवक ‘हेरॉईन’, ‘कोकेन’, ‘स्मॅक’ इ.चे बळी ठरलेले आहेत. तरणतरणसारख्या जिल्ह्यात तर औषधांच्या दुकानात अमली पदार्थ राजरोस विकले जात होते. अशी विदारक परिस्थिती तिथे आहे. पंजाबपाठोपाठ उत्तरांचल, हरियाणा, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय या राज्यांतही अमली पदार्थांचा सुळसुळाट सुरू असून त्यात युवावर्ग भरडला जात आहे.ही भौगोलिक परिस्थिती काहीशी कारणीभूत असली, तर प्रशासन, पोलीस, राजकारणी यांच्यातील ‘मिली भगत’ हे सर्वात मोठे कारण आहे.


मग उपाय काय?
 
‘युवकांचादेश’ म्हणून जग भारताकडे मानवसंसाधन मिळवण्यासाठी डोळे लावून बसले आहे. आज ६३ कोटी युवक (युवाशक्ती) भारताकडे आहेत. पण, या देशाला हा ‘सुदृढ युवकांचा देश’ म्हणता येईल का, हा खरा प्रश्न आहे. ही युवाशक्ती सुदृढ ठेवायची असेल, तर त्यांच्याशी पालकांचा मनमोकळा संवाद, घरात तणावरहित वातावरण, मुलांबरोबर अभ्यासेतर गप्पा, पालकांचं निर्व्यसनीपण, इ. बाबींची आवश्यकता आहे, तरच मोबाईल-इंटरनेटवरच्या आभासी जगाबाहेर तो येऊ शकेल. मानसिक जवळीकता, प्रेम यापासून तो तुटत चालला आहे. हे पालकांना, कुटुंबीयांना सांधता आलं पाहिजे, याचबरोबर मुलांना स्वातंत्र्य देताना ती स्वैराचार तर करीत नाहीत ना, याकडेही कटाक्ष पाहिजे. आज घरात एक किंवा दोन अपत्ये असतात, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही गोष्टीला ‘हो’ म्हणणं, हे जबाबदार पालकत्व म्हणता येईल का, याचाही विचार हवा. पालकांनी पालक म्हणून आपली भूमिका बजावणं आवश्यकच आहे.दुसरी बाब म्हणजे अमली पदार्थांविरुद्धचा ‘एनडीपीएस’ कायदा हा कडक आहे. त्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे. मुलांच्या व्यसनाच्या दुष्परिणाबाबत लहानपणीच जाणीव निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं आहे.राज्यकर्त्यांना व्यसनांच्या समस्येबद्दल फारसं देणं नसून, ‘घेण्याशीच’ संबंध असल्यानं व्यसनांच्या विरोधात एकही राजकारणी व्यासपीठावरून काही जाहीर भूमिका घेताना दिसत नाही. व्यसनं करा म्हणून कुणी उघड सांगत नाहत, ही एक चांगलीच गोष्ट आहे. राजकारणी व्यक्ती निवडणुकीत महिलावर्गाच्या मतांकडे लक्ष देत दारुबंदीच्या बाजूने कधी कधी बोलतात. हेही चांगलेच. पण, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारू दुकानदार, मद्यपी यांना चंद्रपूर जिल्ह्याची असलेली दारुबंदी उठवण्याचं आश्वासन निवडणूक प्रचारात दिलं व निवडून आल्यानंतर ते आश्वासन पूर्णही केलं! त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद दिलीच पाहिजे! असो. शेवटी या अमली पदार्थांच्या व एकूणच व्यसनाधीनतेच्या समस्येला प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा, समाजसेवी संस्था व संपूर्ण समाज, सर्वांनी मिळून ठोस पावले उचलली तर या समस्येची पाळेमुळे उखडून काढून देश बलशाली बनविता येईल.

-डॉ. अजित मगदूम







Powered By Sangraha 9.0