युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून उद्योजकतेची कास धरावी : दत्तात्रय आंबुलकर

    दिनांक  08-Oct-2021 13:23:45
|

Dattartyay Ambulkar  _1&n
पिंपरी चिंचवड : “युवकांनी महाविद्यालयीन काळापासूनच करिअरसाठी केवळ नोकरी हा पर्याय डोळ्यासमोर न ठेवता ’उद्योजक’तेची कास धरावी व त्यायादृष्टीने प्रयत्नशील राहावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापनतज्ज्ञ दत्तात्रय आंबुलकर यांनी नुकतेच केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन - एआयसीटीई’चा ’इनोव्हेशन’ विभाग व ‘यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ (आयआयएमएस) च्या संयुक्त विद्यमाने ’उद्योजकता- करिअरचा पर्याय’ या विषयावरील वेबिनार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात, उद्योजकतेची तयारी कशी करावी, उद्योजक म्हणून तयार होण्यासाठी कोणत्या अटी आहेत. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या पायर्‍या आहेत? उद्योजकतेमध्ये भविष्यातील आणि अपयशाच्या शक्यता काय आहेत? याबद्दल सविस्तर माहिती विविध उदाहरणांद्वारे सांगितली. “तसेच उद्योजक म्हणून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपली विचारसरणीदेखील उद्योजकीय मानसिकतेची असायला हवी,” असे सांगत संपत्ती निमिर्तीच्या जागा जी निर्माण करू शकते, शोधू शकते तोच व्यक्ती उद्योजक होऊ शकते,” असे मत आंबुलकर यांनी व्यक्त केले.


वेबिनारच्या द्वितीय सत्रात डॉ. संजय लाकोडे यांनी त्यांच्या व्याख्यानात ‘पेटंट’ नोंदणीच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देताना त्यांनी बौद्धिक संपदा व पेटंट म्हणजे काय, ट्रेडमार्क, कॉपीराईट, डिझाईन्स, भौगोलिक संकेत आणि व्यापार रहस्ये यांसारख्या बौद्धिक मालमत्तेच्या विविध क्षेत्रांबाबत तपशीलवार माहिती दिली. दोन्ही व्याख्यात्यांनी प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आयआयएमएस’चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले, तर ‘वेबिनार’चे समन्वयक म्हणून प्रा. स्वाती भालेराव यांनी काम पाहिले. जवळपास १५० हून अधिक विद्यार्थी या ‘वेबिनार’मध्ये सहभागी झाले होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.