भारतीय संस्कृतीतील सर्वच सण-उत्सव निसर्गाशी नाते जपतात. आजपासून सुरू होणारे शारदीय नवरात्रदेखील असेच निसर्गाशी आणि कृषिसंस्कृतीशी निगडित आहे. नवरात्र हा आदिमायेचा उत्सव. या आदिशक्तीचे एक नाव ‘प्रकृती’ म्हणजे निसर्गच आहे, त्यामुळे वर्षभरात चार वेळा निसर्गातील प्रमुख बदल होताना या आदिमाया प्रकृतीचे चार उत्सव चार नवरात्रींच्या रूपाने साजरे केले जातात.
पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्या परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती होते. भारताच्या भौगोलिक स्थानामुळे आपल्याला वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू अनुभवायला येतात. यापैकी शिशिर, वसंत, वर्षा आणि शरद या चार ऋतूंतील पौष, चैत्र, आषाढ, आश्विन या चार महिन्यांत आदिशक्तीची उपासना केली जाते. या चार नवरात्रींपैकी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी चालणारे शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे.
शक्ती उपासना जगभरातल्या बहुतांश संस्कृतीत आढळते. प्रागैतिहासिक काळापासून मानव विविध रूपांतील मातृदेवतांची आराधना करत आला आहे. भूमीची सर्जनशीलता आणि स्त्रियांची सुफलनक्षमता यातील साम्य लक्षात आल्यावर मातृदेवतांची उपासना सुरू झाली. सिंधू संस्कृतीत अशा मातृदेवतांच्या मृण्मूर्ती आढळतात. वैदिक काळात सरस्वती, श्री, अदिती, उषा, पृथ्वी या स्त्रीदेवतांची स्तुती केली गेली. दुर्गा, लक्ष्मी, काली अशा अनेक देवतांच्या गाथा पुराणांनी गायल्या. पुरुषी अहंकारातून उन्मत्त झालेल्या महिषासुराचा या शक्तीने महिषासुरमर्दिनी होऊन वध केला. नवरात्रीमध्ये या स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो.
नवरात्र हे एक नैमित्तिक व्रत असले तरी पिढ्यान्पिढ्या चालत आल्याने अनेक घराण्यांत याला कुळाचाराचे स्वरूप आहे. यात प्रांत, जातीगणिक भेद असले तरी घटस्थापना, मालाबंधन, उपवास, अखंड दीप अशी उपासना सर्वत्र आढळते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. देवघरात वेळूच्या परडीमध्ये माती घेऊन त्यावर मातीचा घट स्थापन केला जातो. घटाभोवती सप्तधान्य पेरले जाते. या घटालाच देवी स्वरूप मानून त्याची रोज पूजा केली जाते. यावर मंडपी बांधून त्याला रोज एक किंवा चढत्या क्रमाने झेंडू किंवा तिळाच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात. धान्यावर रोज हळदीचे पाणी शिंपून अंकुरित केले जाते. काही कुटुंबांत घटावर कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे. याव्यतिरिक्त कुमारिकापूजन, सप्तशतीपाठ, हवन, ब्राह्मण-सुवासिनींना भोजन, जागरण -गोंधळ इत्यादी कुळाचारदेखील प्रचलनात आहेत.कुळाचाराप्रमाणे नवमी किंवा दसर्याला घटोत्थापन होऊन नवरात्र व्रताची सांगता होते.
शारदीय नवरात्रीतील कुळाचार हे कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. जमिनीतून धान्य, कंदमुळं उगवतात, हे मानवाच्या लक्षात आलं आणि त्या आदिमकाळापासून भूमिपूजनाचे विधी प्रचलात आले. ऋग्वेदातील श्रीसूक्तांत ‘गंधद्वारां दुराधर्षां’ असे म्हणत, या पृथ्वीलाच ‘आदिशक्ती’ म्हटले गेले आहे. घटस्थापना म्हणजे हे कृषिव्यवस्थेचे जणू लहान प्रारूप होय. सात ठिकाणची माती आणण्यामागे कदाचित वेगवेगळ्या मातींच्या मिश्रणातून जमिनीची सुफलन क्षमता वाढते, असा विचार असावा. यावर मातीचा घट ठेवून सभोवती सात धान्ये पेरण्यात मिश्र पिकांचे साहचर्य उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते ही कल्पना असावी. हळदीचे पाणी शिंपडणे, हे जणू कीटकनाशक फवारणीचे प्रतीक असावे, अशा प्रकारे नऊ दिवसांत धान्य बहरून आले की, या समृद्धीचा उत्सव म्हणजे दसरा.
नवरात्रीच्या नैमित्तिक कुळाचारासोबतच काही विशिष्ट व्रतेदेखील केली जातात. आश्विन शु. तृतीयेला ‘सिंदूरतृतीया’ हे व्रत करत देवीला सिंदूर लावून आरसा दाखवला जातो. आश्विन शु. चतुर्थीला रथोत्सव चतुर्थी व्रतात देवीची सजविलेल्या रथामध्ये बसवून मिरवणूक काढावी. आश्विन शुद्ध पंचमीला ‘ललितापंचमी’ हे उपांगललिता देवीचे व्रत केले जाते. यात कुंकवाच्या करंड्याचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून घेत 48 दूर्वांनी पूजन केले जाते.आश्विन शु. सप्तमीपासून नवमीपर्यंत साहित्यिक, लेखक यांच्यासाठी सरस्वतींचे शयनव्रत सांगितले गेले आहे. सप्तमीला पुस्तकादिकांचे पूजन करून सरस्वतीचे शयन म्हणून तीन दिवस पठण-पाठण, लेखन आदी गोष्टी बंद ठेवाव्यात आणि दसर्याला सरस्वती पूजन करून पुन्हा नव्या ऊर्जेने लेखन, काव्य सुरू करावे. आश्विन शु. अष्टमीला देवीच्या उपासनेची अनेक अनुष्ठाने होतात म्हणून ही तिथी ‘महाष्टमी’ किंवा ‘दुर्गाष्टमी’ म्हणून ओळखली जाते.चित्पावन समाजात अष्टमीला तांदळाच्या पिठाच्या मुखवट्याची श्रीमहालक्ष्मीची मूर्ती करून तिच्या पुढे घागरी फुंकतात. आश्विन शुद्ध नवमीला ‘खङ्गनवमी’ किंवा ‘खांडेनवमी’ असे म्हणतात. या दिवशी शस्त्रपूजा करण्याची प्रथा आहे.
नवरात्री हा देवीचा उत्सव. ‘दीव्यति इति देवी’ अशी देवी शब्दाची व्युत्पत्ती सांगता येईल. ‘दिव्’ धातूचा ‘खेळणे’ असाही अर्थ आहे. अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सृष्टी-स्थिती-प्रलयरूपाची क्रीडा देवी करीत असते. या कार्यात कधी दुष्टांच्या निर्दालनासाठी, तर कधी स्वभक्तांच्या पालनासाठी देवी अवतार घेत असते.तिचे अवतार प्रसंगानुसार सात्त्विक, राजस किंवा तामस स्वरूपाचे आहेत. नवरात्रीमध्ये देवीच्या प्रमुख नऊ अवतारांची-नवदुर्गांची दर दिवशी उपासना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘शैलपुत्री’चे पूजन केले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून देवीने जन्म घेतल्याने तिला हे नाव प्राप्त झाले. ‘ब्रह्मचारिणी’ म्हणजे ‘तपचारिणी’. कमंडलू आणि माळ धारण केलेल्या या देवीने कठोर तपश्चर्या केली होती. नवरात्रीच्या दुसर्या दिवशी हिचे पूजन केले जाते. नवरात्रीच्या तिसर्या दिवशी मस्तकी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण करणार्या ‘चंद्रघंटादेवी’ची आराधना केली जाते. चौथ्या दिवशी सिंहवाहिनी अष्टभुजा ‘कुष्माण्डा’ देवीची पूजा होते. आपल्या मंदहास्यातून ब्रह्मांडाची उत्त्पती केल्यामुळे देवी ‘कुष्माण्डा’ नावाने प्रसिद्ध झाली. कार्तिकेयाची आई असणार्या चतुर्भुजा ‘स्कंदमाता’ रूपाची पाचव्या दिवशी अर्चना केली जाते. सहावा दिवस ‘कत’ नावाच्या ऋषीच्या कुळात, ‘कात्यक’ गोत्रात उत्पन्न झालेल्या ‘कात्यायनी’ देवीच्या उपासनेचा मानला जातो. सातव्या दिवशी देवीच्या भयंकर अशा कालरात्री स्वरूपाची उपासना केली जाते. काळा रंग, तीन डोळे, गाढव वाहन, हातात खड्ग, कंटक असे उग्ररूप असणारी ही देवी भक्तांसाठी मात्र शुभंकरी आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी चतुर्भुजा ‘महागौरी’ रूपाची आराधना केली जाते.तिचे स्वरूप गौरवर्ण, सुंदर आभूषणे, शुभ्र वस्त्रे यांनी युक्त असे परमसात्त्विक आहे. सर्व सिद्धी देणार्या ‘सिद्धिदात्री’ देवीचे पूजन नवव्या दिवशी केले जाते.कमळात बसलेल्या या देवीची यक्ष, गंधर्व, राक्षस, देव आराधना करत असतात.
नवरात्री हा स्त्रीत्वाचा जागर करणारा उत्सव आहे.निर्गुण, निराकार, परमेश्वराला स्त्री रूपात आई मानून उपासना करताना नवरात्रात स्त्रीतत्त्वाचादेखील सन्मान केला जातो. म्हणून नवरात्रीत पाककलेची अन्नपूर्णा, समृद्धीची लक्ष्मी, विद्येची सरस्वती, शक्तीची काली, सौंदर्याची गौरी, अशा स्त्रीत्वाच्या विविध पैलूंच्या रूपात आदिमायेची उपासना केली जाते. सर्जन हा जीवनाचा मूलाधार आहे. या भावनेतून सर्जनक्षम सवाष्णींची ओटी भरली जाते. सर्जनाच्या जाणिवेपासून अबोध कुमारिकांचे पूजन केले जाते. कुमारिकांचे वयानुसार विविध देवींच्या रूपात पूजन करावे, असा प्रघात आहे. दोन वर्षांची कुमारिका, तीन वर्षांची त्रिमूर्ती, चार वर्षांची कल्याणी, पाच वर्षांची रोहिणी, सहा वर्षांची कालिका, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची कन्या सुभद्रा, अशी त्यांची नावे शास्त्रात सांगितली आहेत. देवीला स्त्री म्हणून शृंगाराची आवड असल्याने रोज विविध शृंगारसाधनांनी तिचे पूजन करावे, असे शास्त्र सांगितले आहे. प्रतिपदेला केसांना लावण्याची द्रव्ये-आवळा, सुगंधी तेल, वाहवीत, द्वितीयेला केस बांधण्यासाठी रेशमी दोरा वाहवा, तृतीयेला सिंदूर व आरसा अर्पण करावा, चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि नेत्रांजन अर्पण करावे, पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व अलंकार आणि षष्ठीला फुले-गजरे अर्पण करावीत. रोज तांबूल, गुग्गुळ आदींचा धूप, सुगंधी अत्तरे, सुंदर वस्त्रे-अलंकार इत्यादी माध्यमातून देवीची आराधना करावी, असे शास्त्रात म्हटले गेले आहे.
नवरात्रीदरम्यान महाराष्ट्रात ‘भोंडला’ हा खेळ खेळला जातो. आश्विन महिन्यात सूर्य हस्त नक्षत्रात असतो. त्याचे प्रतीक असणार्या हत्तीची आकृती पाटावर काढून त्याची पूजा केली जाते. त्याभोवती फेर धरून स्त्रिया, छोट्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. सासू-सून, नणंद-भावजय, जावा अशा विविध नात्यांमधील जिव्हाळा दाखवत, तर कधी हळूच चिमटा काढत ही गाणी मनोरंजन करतात.पूर्वी चूल आणि मूल एवढ्यातच अडकून पडलेल्या महिलावर्गाला भोंडला, हळदीकुंकू या निमित्ताने एकत्र येऊन विरंगुळा मिळत असे. या गाण्यांच्या माध्यमातून मन मोकळे करत पुन्हा संसाराचा गाडा ओढण्याची मानसिक शक्ती मिळत असे. आज महिलांना अशी आवश्यकता नसली तरी रोजच्या व्यस्त जीवनात विरंगुळा म्हणून भोंडल्याचा उत्साह आजही कायम आहे. या भोंडल्याचे स्वरूप ‘हादगा’, ‘भुलाबाई’ असे प्रदेशानुसार बदलते.
नवरात्रीच्या पारंपरिक कुळाचारांसोबतच नवीन परंपरादेखील जोडल्या जात आहेत. नऊ दिवसांचे नऊ वेगळे रंग आणि त्याप्रमाणे वस्त्र धारण करणे, ही एक नवी सामाजिक संकल्पना गेल्या दशकभरापासून सुरू झाली आहे. अर्थात, याला कोणताही पौराणिक संदर्भ आणि शास्त्रीय आधार नसला तरी महिलावर्गात मात्र ही संकल्पना लोकप्रिय आहे. गुजराती समाजातील गरबा आणि दांडिया आता संपूर्ण भारतात सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो आहे. भोंडल्याच्या पारंपरिक गीतात आधुनिक काळातील शब्द येत नवीन गाणी लोकप्रिय होत आहेत. परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालताना या उत्सवामागील भूमिकादेखील समजून घेणे गरजेचे आहे. नवरात्री हा स्त्रीत्वाचा उत्सव असल्याने फक्त नवरात्रीतच नाही, तर वर्षभर स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा. हा सर्जनाचा सोहळा असल्याने आपल्यातील कला, गुणविशेष यांच्यात नवीन सर्जनशीलता आणण्याच्या प्रयत्न करत आपल्याच ‘कम्फर्ट झोन’मधून सीमोल्लंघन व्हायला हवे. देशातील बुद्धिजीवी, कष्टकरी, व्यापारी, सैनिक, कलाकार अशा सर्व समाजगटात ही आदिशक्ती बुद्धी, शक्ती, लक्ष्मी, कला अशा विविध रूपांत विराजमान आहे. नवरात्रीच्या निमित्ताने तिला साद घालत समर्थ राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा या नवरात्रीतून आपल्या सगळ्यांना मिळो, हीच आदिमायेकडे प्रार्थना!
- विनय जोशी