किंचित नही भयभीत मैं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2021   
Total Views |

Jammu Kashmir_1 &nbs
 
 
 
'कलम ३७०’ हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरची फक्त सीमाच नव्हे, तर भाग्यरेखाही बदलली. घराणेशाहीच्या भ्रष्टाचारात तुंबलेला विकासही गतिमान झाला. त्याचबरोबर या नंदनवनाची ओळख असलेल्या काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठीही काश्मीर सरकारने पुढाकार घेतला. ज्या काश्मिरी पंडितांना १९९०च्या सुमारास आपला जीव, आपली अब्रू वाचवण्यासाठी त्यांच्याच मायभूमीतून पलायन करावे लागले, त्यांना पूर्ण मान, सन्मानाने काश्मीरमध्ये सुरक्षितरीत्या वसवण्याचे शिवधनुष्य राज्य सरकारने हाती घेतले व देशभरात विखुरलेल्या काश्मिरी पंडितांची पावलं पुन्हा एकदा या स्वर्गभूमीकडे वळू लागली. केंद्र सरकारने दिलेल्या एका आकडेवारीनुसार, जवळपास ५२० काश्मिरी पंडितांनी ‘कलम ३७०’ रद्दबातल केल्यानंतर काश्मीरची वाट धरली आणि भविष्यात ही संख्या निश्चितच वाढत जाईल. परंतु, आजही काश्मिरी पंडितांनी पुन्हा काश्मीरची वाट धरू नये, म्हणून जिहादी शक्ती तितक्याच सक्रिय आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे काश्मीर खोऱ्यातील नुकत्याच झालेल्या दोन हिंदूंच्या हत्या. कारण, काश्मीरमध्ये दाखल होऊन आपल्या नवजीवनाची सुरुवात करू इच्छिणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या मनात या हत्यासत्रामुळे भयगंड निर्माण व्हावा, हाच या हत्यासत्रांमागचा कुटील डाव! पाकिस्तानप्रणित जिहादी शक्तींच्या अन्याय-अत्याचारामुळे १९९० पासून जवळपास ४४ हजार १६७ काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन केले. पण, काही पंडितांनी मात्र जिहादी शक्तींना अजिबात भीक न घालता ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ या विचाराने काश्मीरमध्येच वास्तव्याचा निर्णय घेतला. त्यापैकी औषधाचे दुकान चालवणारे आणि समाजात सक्रिय असणाऱ्या मक्खन लाल बिंदरू यांची नुकतीच ‘द रेसिसटन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेकडून त्यांच्या दुकानाबाहेर निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचबरोबर मूळचे बिहारच्या असलेल्या आणि काश्मीरमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या वीरेंद्र पासवान यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. दोन्ही हत्यांमागचा संदेश हाच की, काश्मिरी पंडित असाल वा इतर ठिकाणांहून काश्मीरमध्ये स्थायिक झालेले अन्य कोणी, ‘काश्मीरपासून लांब राहा!’ असे हे भयनिर्मितीचे शेकडो प्रयत्न ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर जिहादींकडून झाले आणि आजही सुरु आहेत. पण, काश्मिरी पंडित ‘किंचित नही भयभीत मैं’ या विचारांवर ठाम आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये ‘त्या’ काळ्या इतिहासाची आता पुनरावृत्ती होणे नाही!
 
 
हे ‘ते’ काश्मीर नव्हे!
 
 
 
'कलम ३७०’ हद्दपार केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आणि स्थिरता वरकरणी प्रस्थापित झाली असली तरी जिहादी शक्तींची पाळेमुळे मात्र अद्याप खोलवर रुजली आहेत. परिणामी, आजही राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि हिंदू बांधवांच्या हत्यांचे सूत्र काश्मीरमध्ये सुरूच आहे. त्यातच अफगाणिस्तानमधील तालिबानच्या प्राबल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील जिहादी पिल्लावळीत आयते बळ संचारले आणि त्याची परिणती या हत्यासत्रांमध्ये होताना दिसते. बिंदरू आणि पासवान यांच्या हत्यांपूर्वीही जून २०२०मध्ये सरपंच अजय पंडिता आणि यावर्षीच्या जूनमध्ये त्रालच्या म्युनसिपल कमिटीचे प्रधान राकेश पंडिता यांचीही अशाच प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनाही या जिहादींनी वेळोवेळी टार्गेट केले. पण, हिंदूंच्या या हत्यासत्रांनंतरही हिंदू मागे हटत नाहीत, उलट काश्मीरमध्ये वास्तव्यासाठी ते सरकारदरबारी प्रयत्नशील असल्याचे या जिहादींना रुचले नसावे. म्हणूनच हिंदूंमध्ये नव्वदच्या दशकाप्रमाणे इस्लामिक कट्टरवाद्यांचे भय निर्माण होऊन त्यांनी पलायन तरी करावे किंवा पुन्हा काश्मीरकडे ढुंकूनही बघू नये, यासाठी अगदी पद्धतशीरपणे या हत्यासत्राची आखणी होताना दिसते. तसेच एखादी व्यक्ती भाजप अथवा संघ परिवाराशी निगडित असेल, तर त्यांना नामोहरम करण्यासाठी या जिहादी शक्ती सध्या एकवटलेल्या दिसतात. परंतु, या सगळ्या हत्यासत्रांतूनही हिंदू मागे हटत नाही म्हटल्यावर हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची तोडफोड करण्याच्याही घटना खोऱ्यात घडल्या. पण, हे जिहादी सपशेल विसरतात की, त्यांच्याच हिंस्र पूर्वजांनी हिंदूंच्या कत्तलींपासून हजारो मंदिरेही जमीनदोस्त केली. लूटपाट केली. वस्त्यांच्या वस्त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. परंतु, हिंदू समाज, हिंदू संस्कृती त्या सांस्कृतिक महाविनाशातूनही तावूनसुलाखून निघाली आणि उत्तरोत्तर बहरत केली. विज्ञान असो अथवा परंपरा, हिंदूंनी सर्जनाचीच घटस्थापना केली. याउलट इस्लामच्या प्रारंभीपासून ते आजतागायत ही मंडळी मात्र धर्माच्या नावाखाली आजही त्याच जिहादी मानसिकतेत विनाशीवृत्तीने वावरताना दिसतात आणि यांचे भविष्यातील चित्रही असेच असेल, यात तीळमात्र शंका नाही. तेव्हा, काश्मिरी हिंदूंना भयभोवऱ्यात ढकलण्याचा कितीही नापाक प्रयत्न या जिहादींनी केला, तरी काश्मिरी पंडित आणि समस्त हिंदू समाजाच्या पाठीशी भक्कमपणे मोदी सरकार उभे असल्यामुळे जिहादींचे मनसुबे या जन्मात तरी साध्य होणार नाहीत!
 
 
@@AUTHORINFO_V1@@