नट्टू काका अनंतात विलीन ; सर्व कलाकार भावूक

04 Oct 2021 15:58:58

Nattu kaka_1  H
मुंबई : छोट्या पडद्यावरील काही पात्रे ही चिरंतर आपल्या लक्षात राहतात. सुप्रसिद्ध 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील 'नट्टू काका' हे पात्रदेखील यामध्येच मोडते. गेली अनेक वर्ष नट्टू काका हे पात्र 'तारक मेहता...' मालिकेतून आपले मनोरंजन करत होते. मात्र आता हे पात्र आपल्याला 'तारक मेहता...'मध्ये दिसणार नाही. नट्टू काका हे पात्र घराघरात प्रसिद्ध करणारे कलाकार घनश्याम नायक यांचे रविवारी, ३ ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला. ४ ऑक्टोबर रोजी ते अनंतात विलीन झाले. यावेळी 'तारक मेहता...'तील अनेक कलाकारांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली.
 
 
 
घनश्याम नायक हे गेली ५० वर्ष हिंदी चित्रपट सृष्टीत छोट्यामोठ्या भूमिका साकारत होते. त्यांनी मासूम हा चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. त्यानंतर अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. 'बेटा', 'तिरंगा', 'लाडला', 'क्रांतिवीर', 'हम दिल दे चुके सनम' सारख्या अनेक चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र, हिंदी मनोरंजन विश्वात खरी ओळख मिळाली ती 'तारक मेहता का उलट चष्मा' या मालिकेतील 'नट्टू काका' या पात्रामुळेच. २००८पासून या मालिकेत त्यांनी ही भूमिका साकारलेली आहे.
 
 
 
घनश्याम नायक यांना घश्याचा कर्करोग होता. गेले अनेक महिने घनश्याम कर्करोगावर उपचार घेत होते. काही महिन्यांपूर्वी दोन शस्त्रक्रिया करून त्यांच्या घशातून आठ गाठी काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या स्वरयंत्रावर देखील परिणाम झाला होता. परंतु, अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. तरीही, त्यांनी अखेरच्या वेळेपर्यंत आपली भूमिका उत्तम निभावली. नट्टू काका हे फक्त प्रेक्षकांचेच नाही तर कलाकारांचे देखील आवडते होते. आपल्या आवडत्या कलाकाराच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घनश्याम यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
Powered By Sangraha 9.0