मोदींनी ईशान्य भारताला ‘हिरा’ दिला : सुनील देवधर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2021
Total Views |

Sunil Deodhar _1 &nb
 
मुंबई : “काँग्रेसच्या वर्षानुवर्षांच्या सरकारांनी आजवर ईशान्य भारताकडे एक समस्या म्हणून बघितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या लगत असलेल्या देशांशी संबंध वाढवण्यावर व त्यातून ईशान्य भारताच्या आर्थिक, व्यापारी विकासावर भर दिला. ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करत ‘हायवे’, ‘आयवे’, ‘रेल्वे’ आणि ‘एअरवे’ असा ’हिरा’ नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताला दिला आहे,” असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सा. ‘विवेक’च्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीवर आधारित सा. ‘विवेक’च्या ’लोकनेता ते विश्वनेता’ या ग्रंथाच्या निमित्ताने ‘विवेक’द्वारा ‘राष्ट्रजागरण व्याख्यानमाला’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 25 ऑक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या या व्याख्यानमालेत ’पद्मभूषण’ डॉ. अशोकराव कुकडे, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ लेखक - विचारवंत रमेश पतंगे आदींची व्याख्याने झाली, तर समारोप सत्रामध्ये भाजप राष्ट्रीय सचिव व आंध्रप्रदेश सहप्रभारी सुनील देवधर यांनी ’भारताची विदेशनीती आणि ईशान्य भारत’ या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी सुनील देवधर म्हणाले की, “ईशान्य भारताची दुर्दशा ही भारताच्या फाळणीमुळे झाली.
 
पूर्व पाकिस्तान-आताच बांगलादेश निर्माण झाला नसता, तर ईशान्य भारत हा वेगळा पडलेला भूभाग झाला नसता. काँग्रेसच्या वर्षानुवर्षांच्या सरकारांनी ईशान्य भारताकडे एक समस्या म्हणून बघितले. सर्वप्रथम अटलजींनी सांगितले की, ईशान्य भारत ही समस्या नाही तर भारताची ताकद असल्याचे सांगितले. त्यातून अटलजींनी ’लूक इस्ट पॉलिसी’च्या माध्यमातून ईशान्य भारताच्या लगत असलेल्या देशांशी संबंध वाढवण्यावर व त्यातून ईशान्य भारताच्या विकासावर भर दिला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी प्रथम ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ व त्यानंतर ‘अ‍ॅक्शन ईस्ट पॉलिसी’ राबवली,” असे देवधर यांनी सांगितले.
 
 
सुनील देवधर यावेळी म्हणाले की, “आतापर्यंत एक रेल्वेमार्ग आणि एक महामार्ग एवढाच ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणारा दुवा होता. त्यामुळे बांगलादेशच्या माध्यमातून ईशान्य भारताशी संपर्क-दळणवळण निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता होती. तसेच, अनेक वर्षे भारत-बांगलादेश दरम्यानच्या सीमाच अनेक वर्षे निर्धारित झालेल्या नव्हत्या. ईशान्य भारतात अशांतता, अस्थिरता माजवण्यासाठी दहशतवाद्यांचे अनेक तळ शेजारी देशांमध्ये सक्रिय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच भूतान, नेपाळ, बांगलादेश आदी शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे काम केले तसेच, ईशान्य भारतात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला. तसेच सीमेवर घुसखोरी नियंत्रणात आणण्यासाठी सीमेवर कुंपण उभारण्याचे काम वेगाने पूर्ण करत आणले. भारत-बांगलादेश सीमा निर्धारित करण्यात आल्या. बांगलादेशच्या माध्यमातून ईशान्य भारताचे उर्वरित भारताशी संपर्क-दळणवळण वाढवण्यासाठी मोदी यांनी पुढाकार घेतला. ही मोदींची ईशान्य भरताला सर्वात मोठी भेट होती,” असे प्रतिपादन देवधर यांनी केले.
 
 
यानंतर या व्याख्यानात मोदी सरकारच्या कार्यकाळात ईशान्य भारतामध्ये रस्ते, रेल्वे, जलमार्ग, इंटरनेट मार्ग आदी सुविधांमध्ये झालेली प्रगती, त्यातून ईशान्य भारतातील व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी झालेले काम यांची सविस्तर माहिती सुनील देवधर यांनी दिली. तसेच, खुद्द मोदी यांनीच सांगितल्याप्रमाणे, त्यांनी ईशान्य भारताला ’हिरा’ (हिरा : ‘हायवे’, ‘आयवे’, ’रेल्वे’ आणि ‘एअरवे’) दिला असल्याचे देवधर म्हणाले. “आज भूतान, म्यानमार येथे एकही दहशतवादी तळ अस्तित्वात नाही, सर्व दहशतवादी शरण आलेले आहेत. बांगलादेशातून येथे होणारी घुसखोरी बंद झालेली असून यापूर्वी आलेले घुसखोर आता परतू लागले आहेत. त्यामुळे ईशान्य भारत आज शांत असून विकासाच्या मार्गावर आहेत,” असे देवधर यांनी सांगितले. “आतापर्यंत असे म्हटले जायचे की, भारत ईशान्य भारताकडे जाऊन संपतो. येत्या दहा वर्षांत आपण सर्वचजण म्हणू की आमचा भारत ईशान्य भारतातून सुरू होतो. याचे कारण नरेंद्र मोदी यांची विदेशनीती आहे,” असे सुनील देवधर यांनी स्पष्ट केले.
 
 
सा. ‘विवेक’ राजहंसाच्या ‘नीरक्षीर विवेका’सारखेच!
 
“आपल्या सर्वांचे सा.‘विवेक’वर असलेले प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत होत जावो,” अशा शुभेच्छा देत सुनील देवधर म्हणाले की, “या साहित्यसृष्टीत जे देशासाठी, समाजासाठी योग्य आहे ते निवडून आपल्याला देणारे सा. ‘विवेक’ राजहंसाच्या ’नीरक्षीर विवेका’प्रमाणे आहे. ‘विवेक’च्या ’लोकनेता ते विश्वनेता’ या ग्रंथाची आपण सर्वांनी अधिकाधिक नोंदणी करावी,” असे आवाहनही सुनील देवधर यांनी यावेळी केले.



@@AUTHORINFO_V1@@