भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी योगदान दिलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर क्रांतिकारकांचे मुकूटमणी म्हटले जाते. त्यांच्या सान्निध्यात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणार्या दामोदर महादेव चंद्रात्रे उर्फ दामुअण्णा यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या कार्याची माहिती देणारा विशेष लेख...दामुअण्णांचा जन्म शके १८०३ फाल्गुन शु. ५ बुधवार, दि. २२ फेबु्रवारी, १८८२ या दिवशी झाला. लहानपणीच अण्णांचे पितृछत्र हरपल्यानंतर त्यांचे संपूर्ण संगोपन मातोश्री पार्वतीबाई यांनी केले. त्यांच्या लहानपणी नाशिकमध्ये प्लेगची जोरदार साथ पसरली होती. त्या साथीमुळे दामुअण्णा आणि मातोश्री असे दोघेही धार येथे त्यांच्या नातलगांकडे राहण्यास गेले. धार येथे विद्वान वैदिक पंडित यांच्या घरी दामुअण्णा यांनी वेदाध्ययन सुरू केले. दामुअण्णा यांचे शरीर सुदृढ होते, तसेच व्यायामाचीदेखील त्यांना आवड होती. त्या जोरावर यात्रेच्या दंगलीत, फडात कुस्त्या खेळून अण्णांनी विजयश्रीचा मान पटकावला होता. वेदाध्ययनासोबत त्यांना वाचनाचा प्रचंड छंद होता.सन १९०२ साली नाशिकला स्वदेशीच्या चळवळीचा खूपच प्रसार झाला. त्यावेळी अण्णांनी स्वदेशीचे शपथपूर्वक व्रत अंगीकारले, ते व्रत त्यांनी काटेकोरपणे पाळले. ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संस्थेशी दामुअण्णांचा संबंध त्यांचे मित्र विष्णुशास्त्री केळकर यांच्या संगतीमुळे आला. या संस्थेत बाबाराव सावरकर, रामभाऊ दातार, वामनशास्त्री दातार, नारायणनाना वर्तक, चिपळूणकर, विनायकराव सावरकर, म्हसकर, पागे, नारायणराव सावरकर, कृष्णाजी महाबळ, दत्तू केतकर, बापू दातार, भाऊ केतकर, सीताराम शौचे, तसेच बापू जोशी, कृष्णाजी कर्वे, केशव भागवत, यशवंत वाड, महादेव गाडगीळ, चिंतू वैद्य, मोरेश्वर जोशी, गोविंदआबा दरेकर आणि दामुअण्णा चंद्रात्रे हे सर्व ‘अभिनव भारत’चे सक्रिय कार्यकर्ते होते.
‘अभिनव भारत’ संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरिता विधिपूर्वक शपथ होऊन दामुअण्णा या संस्थेत प्रविष्ट झाले. १९०४ सालापासून दामुअण्णांचा संबंध ‘अभिनव भारत’ या संस्थेशी वाढतच होता. या संस्थेतर्फे गणेशोत्सव मेळ्यासाठी स्वातंत्र्यवीर कवी गोविंदआबा दरेकर यांच्या पद्यरचनेचा परिणामदेखील अण्णांवर झाला. नेदरलँडच्या बंडाचा इतिहास, इतर देशातील क्रांतीचा इतिहास, राजस्थानचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, गॅरिबाल्डी, मॅझिनी या क्रांतिकारक देशभक्तांची चरित्रे तसेच ‘केसरी’, ‘भाला’, ‘बिहारी’, विविध वृत्तपत्रे नि मासिके हे सर्व दामुअण्णा नियमित वाचत असत. ते अखिल भारतीय काँग्रेसचे सभासद झाले.
‘अभिनव भारत’ या संस्थेत प्रविष्ट झाल्यानंतर अण्णा त्या संस्थेशी संबंधित विविध कार्यात सहभाग घेऊन सभासदांचे संघटन करणे, अखिल भारतातील क्रांतिकारकांशी संबंध जोडणे, क्रांतिकारक वाङ्मयाचा प्रचार नि प्रसार करणे, तसेच स्वातंत्र्ययुद्धाच्या कामी उपयोगी पडावे म्हणून नाशिकच्या आसपासच्या डोंगरांची तसेच किल्ल्यांची पाहणी करणे, यात हिरिरीने लक्ष घालत होते. १९०६ साली वंगभगाच्या निमित्ताने स्वदेशी व्रताचा पुरस्कार, परदेशी मालाचा बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, या चळवळी नाशिक येथे बाबासाहेब खरे यांच्या नेतृत्वाखाली चालत होत्या. त्याच सुमारास नाशिक येथे ‘वंदे मातरम्’ खटला झाला. त्यात बाबासाहेब खरे, सावरकर, वर्तक आदी मंडळी होती. सरकारची दडपशाही जशी जशी वाढत होती, तशीतशी देशातील असंतोषाची तीव्रता वाढत होती. काँग्रेसच्या अर्ज, विनंत्या या मार्गापासून जहाल मार्गाच्या पक्षाकडे सर्व लोकांची मनं झुकू लागली. सुरत येथे काँग्रेसचे अधिवेनशन भरले, त्यात लो. टिळकांचे कट्टर अनुयायी गेले होते. त्यात दामुअण्णा हेदेखील होते. सुरत काँग्रेसचे पर्यवसान मवाळ आणि जहाल गटांच्या प्रत्यक्ष मारामारीत झाले. दामुअण्णा महाराष्ट्रातील जहाल गटाचे एक प्रतिनिधी म्हणून त्या सभेत उपस्थित होते. स्वा. सावरकर ज्यावेळी लंडनला होते, त्यावेळी विनायक देशपांडे, वामन जोशी, दांडेकर, धारप, वैद्य या मंडळींनी शस्त्र जमवण्याचे काम सुरू केले. कृष्णाजी कर्वे या तरुणाशी अण्णांचा परिचय झाला. लंडनहून विनायकराव सावरकरांनी चतुर्भुज याच्या मदतीने २० ऑटोमॅटिक पिस्तुले मुंबई येथे आणल्याचे दामुअण्णांना कळाले. कर्वेच्या मदतीने मुंबईत ही पिस्तुले कोठे व ती आपणास कधी हस्तगत करता येतील, याचा तपास अण्णांनी लावला. त्यानंतर त्यांनी क्रांतिवादी मित्रमंडळींकडून ३०० रु. वर्गणी जमा करून कर्वे आणि देशपांडे यांना मुंबईत पाठवले. त्यात सात पिस्तुले आणि प्रत्येक पिस्तुलाच्या २०० काडतूस पेट्या मिळवल्या. ही सामग्री देशपांडे यांनी गुप्तपणे नाशिकला आणली. आपल्या निवडक माणसासोबत रात्रीच्या वेळी पेठच्या रानमळ्यात पिस्तुलाने नेम धरण्याचा सराव सुरू झाला. त्यावेळी तरुण तडफदार औरंगाबादचा अनंत कान्हेरे यास धारप आणि देशपांडे यांनी नाशिकला आणले. नाशिकच्या मंडळींची आणि कान्हेरे यांची भेट होऊन बाबाराव सावरकर यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवण्याकरिता अनंत कान्हेरे उत्सुक असल्याचे दिसून आले. २० डिसेंबर, १९०९ रोजी अनंत कान्हेरे हे औरंगाबादेतून संपूर्ण तयारीनिशी नाशिकला आले होते. ते आसरा वेशीजवळच्या एकनाथ शुक्ल यांच्या वाड्यातच बॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात उतरले होते, कारण दुसर्याच दिवशी विजयानंद नाट्यगृहात नाशिकच्या तत्कालीन कलेक्टर जॅक्सनच्या सत्कारार्थ किर्लोस्कर मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग होणार होता.
दुसर्या दिवशी विजयानंद नाट्यगृहात कान्हेरे यांनी गोळ्या झाडून जॅक्सनचा वध केला. या खुनाची बातमी विनायक देशपांडेंमार्फत दामुअण्णांना मिळाली, आसरा वेशीतील बॉम्बच्या कारखान्यात पोलिसांची धाड पडणार हे जाणून त्याच रात्री सामान नि वस्तूंची विल्हेवाट लावून टाकली. या घटनेच्या तीन दिवसांनंतर रात्री ११.३० वाजता दामुअण्णांना पकडण्यात आले आणि सरकारवाड्यात आणले. त्या अटकेत दामुअण्णा यांचे नानाविध प्रकारे अपमान, छळ, हाल करण्यात आले. प्रसंगी अमानुष पद्धतीने मारझोड करण्यात आली.१५ दिवसांनी मॅजिस्ट्रेट खोपकर आणि पळशीकर यांच्यापुढे अण्णा यांना उभे करण्यात आले. तेथे अण्णांची कसून चौकशी करण्यात आली. परंतु, आपल्याला या प्रकरणात काहीच माहीत नसल्याचे अण्णांनी सांगितले. त्यानंतरसुद्धा दामुअण्णांना पोलिसांच्या ताब्यात देऊन पुन्हा तोच छळ करण्यात आला. अगतिक परिस्थितीत त्यांच्यावर लादण्यात येणारे सर्व शारीरिक क्लेश खर्या देशभक्तीने प्रेरित झालेले होते आणि त्यातूनच दामुअण्णांसारखे देशभक्त क्रांतिकारक आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी निमूटपणे सर्व सहन करीत होते.अशा या नाशिकच्या कटाच्या खटल्यात दामुअण्णा यांना गोवण्यात येऊन पाच वर्षे सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली आणि त्यांना हैदराबाद-सिंध येथे पाठवण्यात आले. तेथेसुद्धा कैदेत असताना पोलिसांपासून होणार्या यमयातना दामुअण्णा मोठ्या धैर्याने सोसत होते. हे सर्व त्यांची सुरुवातीपासूनची काटक शरीरयष्टी आणि वृत्तीमुळे सहज शक्य झाले. तेथे तत्त्वचिंतन, धार्मिक ग्रंथ वाचन नि वेदपठन करून काळ व्यतीत केला. पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दामुअण्णांची तुरुंगातून सुटका झाली. सुटका झाल्यावरही दामुअण्णांवरील पोलिसांची देखरेख बरेच दिवस चालू होती. थोडा काळ लोटल्यानंतर दामुअण्णा लो. टिळकांचे दर्शन घेण्याकरिता पुण्यास रवाना झाले. लो. टिळकांनी दामुअण्णा यांना बैठकीत बोलावून घेतले नि सकुशल विविध गोष्टींवर चर्चा झाली. टिळकांच्या दर्शन उपरान्त नमस्कार करून दामुअण्णा पुन्हा नाशिक येथे परतले. ते कायम ‘केसरी’चे वर्गणीदार नि वाचक होते.
सन १९१५ ते १९२० या कालखंडात दामुअण्णा यांनी देशसेवेची कामे घरसंसाराची सुव्यवस्था पाहूनच रीतसर पूर्ण केली. तुुरुंगवासापूर्वी त्यांनी १९०६ साली ‘रेणुका समर्थ मोफत वाचनालय’ स्थापन केले होते. नाशिकच्या ‘सनातन धर्मसभे’चे दामुअण्णा आधारस्तंभ होते. तसेच नाशिकच्या वेदशास्त्र पाठशाळेच्या गोविंदराव शौचे यांच्यासोबत दामुअण्णा सरचिटणीस म्हणून होते.दामुअण्णांच्या कार्यकुशलतेच्या सामर्थ्याने त्यांनी ‘मधली होळी व्यायामशाळा’ ही संस्था स्थापून तिला सर्वतोपरी भरभराटीच्या दिशेने पुढे नेली. नाशिक जिल्हा वर्णाश्रम स्वराज्य संघाचे दामुअण्णा हे अनेक वर्षे चिटणीस आणि अध्यक्ष होते. १९२८ आणि १९३६ मधील नगरपालिका निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने निवडून आले होते. रामरथ सत्याग्रहावेळी सनातनींचे प्रमुख पुढारी होते. या सर्व घटनांवरून दामुअण्णांचे देशप्रेम आणि व्यवहार चातुर्य दिसून येते.१९३३ साली आपले चिरंजीव पुरुषोत्तम यांच्या मदतीने दामुअण्णा यांनी मधली होळी येथे ‘विज्ञान मुद्रणालय’ सुरू केले. १९४० साली नाशिक येथे बृहन्महाराष्ट्र शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मणांचे संमेलन भरले होते. त्या संमेलनात शाखेचे एक मुखपत्र चालवावे म्हणून ठराव पास झाला. ती सर्वस्वी जबाबदारी दामुअण्णा यांनी अतिशय हौसेने नि धडाडीने स्वीकारून आपल्या समाजसेवेचा वाटा उचलला. १९४१ च्या ऑगस्ट महिन्यात दामुअण्णांनी ‘याज्ञवल्क्य’ मासिकाचा प्रथम अंक प्रसिद्ध करून ते मासिक सलग १२ वर्षे चालविले. त्यांच्या या वैदिक धर्माच्या जाज्वल्य अभिमानाबद्दल नि त्याच्या प्रचारकार्याबद्दल दामुअण्णा यांना आद्य श्री शंकराचार्य यांच्याकडून ‘धर्मभूषण’ या बहुमानाच्या पदवीने सन्मानित केले.दामुअण्णांची तत्त्वनिष्ठा प्रखर होती. त्यामुळे ईश्वरचिंतनात त्यांनी मोठ्या आनंदाने आपला काळ व्यतीत केला. लहानपणापासून परिमित आहार, नियमित वागणूक आणि कष्ट करण्याची सवय इ. गुणांमुळे अण्णांची अंगकाठी वृद्धावस्था असतानाही चांगल्या रीतीने तग धरून होती. कालांतराने त्यांची शारीरिक शक्ती दिवसेंदिवस क्षीण होत होती. श्रवणशक्ती कमकुवत होऊन दृष्टीही अंधूक होऊ लागली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा विरक्तपणा वाढू लागला. अखेर दामुअण्णांची जीवनधारा अश्विन वद्य प्रतिपदा, शके १८९३ सोमवार, दि. ४ऑक्टोबर, १९७१ रोजी रात्री २ वा. आटली. अण्णांनी पार्थिव देह सोडून परलोकी प्रयाण केले.
अशारीतीने राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील भोवतालच्या परिसरास समृद्ध आणि पवित्र करणारी दामुअण्णांची जीवनधारा मृत्यूच्या रणात लुप्त झाली असली, तरी त्यांच्या आदर्शवादी जीवनाचा अंतःप्रवाह अजूनही कुटुंबीयांच्या आणि परिचितांच्या वैराण अंत:करणांना धैर्याचा ओलावा देत आहे नि पुढेही कित्येक वर्षे देत राहील.
वंदे मातरम्!
लेख संदर्भ :
१) जीवनधारा कै. नि. दामोदर महादेव चंद्रात्रे यांचे जीवनचरित्र
२) स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रभावळ
३) महाबळ गुरुजींच्या आत्मचरित्रातील अभिनव भारत
- शिरीष पाठक