राजकीय संस्कृतीमध्ये परिवर्तन घडविण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या राजवटीतील भ्रष्टाचार आणि कुशासनास जनता कंटाळली होती. त्यांचा राजकीय व्यवस्था आणि राजकीय नेत्यांवरील विश्वास डळमळीत होऊ लागला होता. त्यामुळे विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात असलेल्या जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज पंतप्रधान मोदी यांनी राजकीय विश्वासार्हतेच्या संकटावर मात केली आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय प्रमुखपदाच्या कारकिर्दीस २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या समारोपाच्या सत्रास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच देशातील व्यवस्था बदलांना प्रारंभ केला आहे. हा त्यांचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहे. त्यामुळे कोणी त्यात कमतरता नक्कीच काढू शकतो, मात्र त्यांच्या मनसुब्यावर कोणीही अविश्वास दाखवून शकत नाही. राजकीय संस्कृतीमध्येदेखील नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडविले आहे. देशात सात वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसप्रणित युपीए सरकारचे घोटाळे आणि कुशासन यांना देशातील जनता कंटाळली होती. त्यांचा भारतीय राजकीय व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे डळमळीत होऊ लागला होता. अशा परिस्थितीमध्ये देशातील जनता एक विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात होती. नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांना विश्वास वाटल्यानेच त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली. परिणामी, गेल्या सात वर्षांच्या आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये राजकीय विश्वासार्हतेच्या संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात केली आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
भारताच्या दहशतवादविरोधी धोरणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आमूलाग्र बदल घडविल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यापूर्वीच्या सरकारांमध्ये दहशतवाद्यांविरोधात अतिशय मवाळ धोरण राबविले जात असे. दहशतवादी घटना घडल्यानंतर दहशतवाद्यांना सेफ पॅसेज देण्याची भाषा बोलली जात असे, पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळायचे की नाही यावर चर्चा होत असे. मात्र, मोदी सरकारने क्रिकेट सामन्याचा प्रश्नच चर्चेसाठी ठेवलेला नाही. कारण, आता दहशतवादाविरोधात कठोर कारवाई आणि दरज पडल्यास सीमापार कारवाई करण्याचे धोरण भारताने ठेवले आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेवर अतिशय सकारात्मक परिणाम झाला असल्याचेही राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले.