शीखांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : दिल्लीत झालेल्या शीखांच्या नरसंहाराचा आरोपी असलेल्या जगदीश टायटलर याला दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. याद्वारे शीख नरसंहारास कारणीभूत असलेल्यांना सन्मानित करण्याचे काम सोनिया गांधी करीत असल्याची टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केली.
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजधानी दिल्लीत उफाळलेल्या शीख विरोधी दंगलीत आरोपी असलेल्या नेत्याला काँग्रेसने दिल्लीच्या कार्यकारिणीत स्थान दिल्याने भाजपने आक्षेप नोंदवला आहे. दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या (डीपीसीसी) स्थायी आमंत्रित सदस्यांमध्ये शीख विरोधी दंग्यात आरोपी असलेले जगदीश टायटलर यांना स्थान देण्यात आल्याने राजकारण तापले आहे. डीपीसीसी मध्ये ३७ स्थायी आमंत्रित सदस्य आहेत. या यादीत सहाव्या क्रमांकावर जगदीश टायटलर यांचे नाव असल्याची माहिती भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिली.
शीख विरोधी दंगली प्रकरणी टायटलर आरोपी आहेत.असे असताना ही सोनिया गांधी यांनी त्यांना दिल्लीच्या कार्यकारिणीत स्थायी आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केल्याचा आरोप करीत देशात त्यामुळे आक्रोश असल्याचा दावा भाटिया यांनी केला. कॉंग्रेस आणि गांधी परिवार शीख पीडितांच्या जखमा भरू शकले नाहीत. पंरतु, त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. डीपीसीसीच्या यादीला सोनिया गांधी यांनी मंजुरी दिल्याचे देखील भाटिया म्हणाले.
कॉंग्रेस शीख विरोधी दंग्यांमधील आरोपींना सन्मानित करण्याचे काम करीत आहे. सोनिया गांधी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश वाचला असता तर यादीला मंजुरी देण्यापूर्वी त्यांचे हात कापले असतो, अशी टीका भाटिया यांनी केली. कॉंग्रेस नेत्यांच्या लखीमपुर दौऱ्यावर देखील भाटिया यांनी आक्षेप नोंदवला.