विकासकाऐवजी पालिकेकडून कोट्यवधींची रस्ते उभारणी

29 Oct 2021 13:38:25

vip_1  H x W: 0
मुंबई :  घाटकोपर निलयोग मॉल ते घाटकोपर लिंक रोडला जोडणारा जवाहर रस्ता सध्या वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. कारण, या रस्त्यावरील वस्तीचे पुनर्वसन ‘एसआरए’ योजनेअंतर्गत विकासकाने केले. त्यावेळी हा रस्ता बनवण्यासाठी अनेक समस्या उभ्या राहिल्या. विकासकाने बांधायचा हा रस्ता २०२० साली महानगरपालिकेनेच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधला. त्यामुळे या रस्त्याच्या हस्तांतराबाबत स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.२०१५ साली मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी ‘एन’ वॉर्ड आणि गौरीशंकर वाडी पुनर्विकास करणार्‍या विकासकाने संयुक्तपणे या रस्त्यावर अहवाल बनवून आयुक्तांकडे सुपूर्द करावा, असे सूचित केले होते. त्यानंतर हा रस्ता बनवावा आणि तो महानगरपालिकेला सुपूर्द करावा, असेही त्यात नमूद केले होते. त्यानंतर अचानक हा रस्ता २०२० साली बांधण्यात आला. त्यासाठी अंदाजे दहा ते १२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा अंदाज आहे. यावर घाटकोपरच्या जागरूक नागरिकांनी प्रश्न केले आहेत की, हा रस्ता बनवताना तत्कालीन आयुक्तांंनी जो अहवाल बनवायला सांगितला होता तो बनवला का? जर तो अहवाल बनवला असेल, तर त्याबाबत महानगरपालिका विकासक किंवा कमिशनर यांच्याकडे नोंद आहे का? तसेच हा रस्ता विकासकाने नाही, तर महानगरपालिकेने बनवला आहे. विकासकाने रस्ता बनवून महानगरपालिकेला सुपूर्द करायचा, असे स्पष्ट असताना महानगरपालिकेने हा रस्ता का बनवला? महानगरपालिकेने रस्ता बनवला असल्यामुळे विकासकाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. विकासकाचा खर्च वाचवण्यासाठी महानगरपालिकेने हा रस्ता बांधला का? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.





रस्तेनिर्माणासाठी विरोध नाही





जवाहर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला याबद्दल विरोध नाही. कारण मार्ग बनणे महत्त्वाचे होते. मात्र, तो ज्या पद्धतीने बनला, त्याबद्दल अनेक प्रश्न उठत आहेत. हा रस्ता विकासकाने बनवायचा असताना तो रस्ता महानगरपालिकेने कोणाच्या पैशातून बनवला? तसेच हा रस्ता बनवताना प्रशासकीय नियम आणि सूचना यांचे पालन केले गेले का? भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सोबतच घाटकोपरचा जागरूक नागरिक म्हणून मला हा प्रश्न पडला आहे. या रस्त्याचे हस्तांतर महानगरपालिकेकडे झाले, असे कुठे नमूद आहे का? कारण महानगरपालिकेकडे हा रस्ता हस्तांतरित झाल्याशिवाय या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती किंवा इतर काम महानगरपालिका करू शकत नाही. हा रस्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाला का? नसेल तर तो त्वरित व्हावा, अशी आमची मागणी आहे.




- अजय बागल, महामंत्री, भाजप, घाटकोपर विधानसभा



Powered By Sangraha 9.0