समर्पित सेवाव्रती भगिनी निवेदिता

28 Oct 2021 12:29:47

Nivedita_1  H x
 
 
‘विकसित व्हावे अर्पित होऊन जावे’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिता यांचे स्फूर्तिदायी चरित्र! आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारा हा लेख...
 
 
स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता पूर्वाश्रमीच्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल एक समर्पित व्यक्तिमत्त्व... वंशाने आयरिश, रंगाने गोऱ्या असूनही पारतंत्र्याच्या काळात भारतात आल्या. त्यांनी भारतीय गोरगरीब, अशिक्षित, वंचित आणि पीडित लोकांसाठी सेवा करताना आपले सर्वस्व अर्पण केले. भारतात सेवा करत असताना वयाच्या ४४व्या वर्षी या मातीत त्यांनी आपला देह अर्पण केला. भगिनी निवेदिता यांच्या जन्मदिनी त्यांच्या जीवनकार्याचा आढावा.
 
 
मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचा जन्म दि. २८ ऑक्टोबर, १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील काऊंटी टिरोन येथे वडील सॅम्युअल व आई इझॅबेला या आयरिश दाम्पत्याच्या पोटी झाला. वडील सॅम्युएल नोबल हे स्थानिक महाविद्यालयात प्राध्यापक, आदर्शवादी आणि धर्मोपदेशक होते. ’धर्म म्हणजे सेवा’ असा त्यांचा धर्मविषयक संदेश होता. नोबल कुटुंब सुशीलता, सात्त्विकता आणि धर्मजिज्ञासा यासाठी पंचक्रोशीत विख्यात होते. मार्गारेट यांचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर इथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण चर्चतर्फे चालविण्यात येणाऱ्या हॅलिफॅकस महाविद्यालयात झाले. बालवयात स्वदेश प्रेम, जगातील विविध प्रश्न, त्यातून त्या त्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या विचारसरणी यांची माहिती मार्गारेटना वडिलांकडून मिळत होती. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्या लंडन येथे शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. या काळात ‘हसतखेळत बालशिक्षण’ या नव्या प्रयोगाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. लंडनमध्ये मार्गारेट यांनी पेस्टालोत्सी व फ्रबेल यांच्या नवीन शिक्षण पद्धतीच्या प्रभावातून त्यावर आधारित १८९२ साली विंबल्डन येथे लहान मुलांची शाळाही सुरू केली. याच काळात त्यांचा विवाह एका वेल्श तरुणाशी ठरला. परंतु, साखरपुड्यानंतर महिनाभराच्या काळात त्या तरुणाचे अकाली निधन झाले आणि मार्गारेट अविवाहित राहिल्या त्या आयुष्यभरासाठी! त्यामुळेच त्या त्यांच्या आयुष्यात पुढे होऊ घातलेल्या मोठ्या बदलांना सामोरे जाऊ शकल्या.
 
 
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील दोन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतात. एक त्याचा जन्मदिवस आणि दुसरा आपण कशासाठी जन्माला आलो आहोत, याचा आत्मसाक्षात्कार ज्यादिवशी होतो तो दिवस! त्या दिवशी व्यक्तीला जीवनाचे खरे ध्येय, अंतिम लक्ष्य उगमते. मार्गारेट व विवेकानंद यांची पहिली भेट १८९५ साली लंडन येथे झाली. हा त्यांचा दुसरा व अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल. लंडनच्या विविध उपनगरांमध्ये ‘भारतीय संस्कृती’ या विषयावर विवेकानंदांची व्याख्याने झालीत. मार्गारेट यांनी ही सर्व व्याख्याने काळजीपूर्वक ऐकली. स्वामीजींच्या अभ्यासवर्गांनाही त्यांनी हजेरी लावली. स्वामीजींना त्यांनी अनेक प्रश्नही विचारले. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा, मतमतांतरे झालीत. प्रसंगी वादही घातला. मात्र, विवेकानंदांची ओजस्वी वाणी, त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व, त्यांचे चारित्र्य व नि:स्पृहता यांचा जबरदस्त प्रभाव मार्गारेट यांच्यावर पडला. त्यांच्या आध्यात्मिक समस्यांची सर्व उत्तरे त्यांना स्वामीजींबरोबर केलेल्या चर्चेतूनमिळाली. स्वामीजी म्हणत, “जगाला त्यागी, सेवाभावी, वीरवृत्तीच्या तरुण-तरुणींची गरज आहे.” हे विचार ऐकून त्यांनी हिंदुस्थानात येण्याचा संकल्प स्वामींजीकडे व्यक्त केला. दि. २८ जानेवारी, १८९८ रोजी मार्गारेट कोलकाता या शहरी पोहोचल्यात. स्वामीजी त्यांना घेण्यासाठी स्वतः बंदरावर आले होते. तद्नंतर गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी सारदादेवी यांची त्यांनी भेट घेतली. सारदादेवींनी मार्गारेटला आपली कन्या म्हणून स्वीकारले. दि. २५ मार्च, १८९८ या दिनी मार्गारेट यांनी ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली व त्यांनी ‘भगिनी निवेदिता’ असे नाव धारण केले. अशाप्रकारे त्या दैवी कार्यार्थ पूर्णपणे समर्पित झाल्यात. उपनिषदे, श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचाही त्यांनी अभ्यास सुरू केला. त्या हाडाच्या शिक्षिका होत्या. ध्यानधारणेबरोबरच शिक्षण क्षेत्रातदेखील आपण काहीतरी करावे, असे त्यांना वाटू लागले.
 
 
दि. १२ नोव्हेंबर, १८९८ रोजी दिवाळीच्या दिवशी त्यांनी कोलकात्यातील बागबाजार येथे एका बालिका विद्यालयाची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षणकार्यास आरंभ केला. फेब्रुवारी १८९९ साली कोलकात्यात उद्भवलेल्या ‘प्लेग’च्या साथीत त्यांनी सेवाकार्य केले. त्याच साली त्या अमेरिकेत गेल्या व तेथे त्यांनी ‘रामकृष्ण साहाय्य संस्था’ स्थापन केली. पॅरिस व लंडन येथील प्रवासानंतर १९०२ साली त्या भारतात परत आल्या. त्याच वर्षी विवेकानंदांचे निधन झाले व निवेदितांनी ‘रामकृष्ण मंडळा’बाहेर पडून राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनास स्वतःला वाहून घेतले. १९०२ ते १९०४ या काळात सर्व भारतात प्रचारदौरा करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. जुन्या व नव्या उपयुक्त आचार-विचारांचा समन्वय करून स्वतंत्र, संघटित व समर्थ भारत बनविण्याचे विवेकानंदांचे ध्येय साकार करण्याकरिता त्यांनी जिद्दीने प्रयत्न केला. त्याकरिता त्यांनी देशप्रेमी व स्वार्थत्यागी तरूणांची संघटना उभारली. त्या काळातील प्रमुख राजकीय पुढाऱ्यांशी व सशस्त्र क्रांतिकारी संघटनांशीही त्यांचा संबंध होता. १९०२ साली पुण्याला जाऊन हुतात्मा चापेकर बंधूंच्या मातेची पायधूळ डोक्यास लावली. १९०५ साली बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला व स्वदेशी चळवळीला पाठिंबा देऊन स्वदेशीचे व्रत अंगीकारले. त्याच वर्षी लॉर्ड कर्झनच्या बंगाल-फाळणीच्या योजनेला त्यांनी कडवा विरोध केला. १९०६ साली पूर्व बंगालमध्ये दुष्काळाने व पुराने थैमान घातले असताना, त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन लोकांना मदत केली. युरोप व अमेरिकेत असलेल्या भारतीयांना इंग्रज राजवटीविरूद्ध संघटित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. भारतात सेवा करत असताना वयाच्या अवघ्या ४४व्या वर्षी दि. १३ ऑक्टोबर, १९११ रोजी दार्जिलिंग येथे त्यांनी आपला नश्वर देह ठेवला.
 
 
‘विकसित व्हावे अर्पित होऊन जावे’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिता यांचे स्फूर्तिदायी चरित्र! भगिनी निवेदिता हे नाव उच्चारताच त्यांनी भारतात केलेल्या लोकविलक्षण कार्य, त्यांचा अस्सिम त्याग, संपूर्ण समर्पणता आपल्या देशवासीयांप्रति असलेली अपार करुणा आणि त्यातून उभे राहणारे लोकसेवेचे उत्तुंग कार्य आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. त्यांनी महिला शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रात तर मोठे कार्य केलेच, पण त्या एक ब्रिटिश नागरिक असूनही भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील कार्यकर्त्यांना उघडपणे मदत करून ब्रिटिश सरकारचा रोष ओढवून घेतला होता. त्यांची बुद्धिमत्ता, हिंदू धर्मावरील व भारतावरील निष्ठा, ध्येयवादी वृत्ती आदी गुणविशेषांमुळे त्या भारतीयांच्या कायमच्या आदरास पात्र ठरल्या. भगिनी निवेदिता यांच्या पवित्र स्मृतीस शतशः प्रणाम...!
 
 
- प्रा. अमोल अहिरे
(लेखक विवेकानंद केंद्र, नाशिकचे नगरप्रमुख आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0