'एसी' बसच्या देखभालीचे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2021   
Total Views |

BEST AC Buses_1 &nbs
 
 
 
मुंबईच्या रस्त्यांवर सध्या 'बेस्ट'च्या 'एसी' बसेसची एकच रेलचेल दिसते. त्यामुळे निश्चितच ऐन उकाड्यात मुंबईकरांना गारेगार प्रवासाची सफर घडत असून प्रवासकळा काहीशा कमीही झाल्या आहेत. या 'एसी' बसेसना मुंबईकरांचा मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेता, 'बेस्ट'च्या ताफ्यात 'इलेक्ट्रिक एसी बसेस'ची दिवसेंदिवस भरही पडताना दिसते. आगामी काही वर्षांत 'बेस्ट' पूर्णपणे इंधनमुक्त करून इलेक्ट्रिकवर चालवण्याचाही 'बेस्ट'चा मानस आहेच. पण, सामान्य तिकीट दरापेक्षा प्रवाशांकडून एक रुपये जादा आकारून धावणाऱ्या या 'एसी' बसेसमधील 'एसी' यंत्रणेची मात्र सध्या दुरवस्था झाली आहे. खासकरून 'बेस्ट'च्या 'ट्रॅव्हेलर' प्रकारातील 'मिडी' बसेसमधील प्रवाशांच्या डोक्यावरील एसी नियंत्रित करणारा 'नॉब'च मुळात सदोष बांधणीचा! कारण, बरेचदा या 'नॉब'च्या आतील प्लास्टिकचा पडदा हा अतिवापराने ढिल्ला पडलेला दिसतो. त्यामुळे प्रवाशांनी कितीही वेळा तो 'नॉब' व त्यामधील प्लास्टिकचा पडदा एसीची हवा येईल म्हणून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी, तो पुन्हा बंदच होतो. परिणामी, 'एसी' बसमध्ये बसूनही बरेचदा प्रवाशांच्या घामाच्या धारा काही थांबता थांबत नाहीत. त्याचबरोबर या 'मिडी' बस प्रामुख्याने बसून प्रवास करण्यासाठीच सोईस्कर असल्या, तरी बरेचदा या बसमध्येही प्रवासी अक्षरश: कोंबले जातात. पण, उभ्याने प्रवास करणाऱ्यांना या 'एसी'चा उपयोग मात्र शून्य! कारण, या 'एसी'चे सर्व 'नॉब्स' हे केवळ आसनांच्या वरती असून जे प्रवासी उभ्याने प्रवास करतात, त्यांच्या नशिबात तर 'एसी'च्या हवेची साधी झुळूकही नाही. त्यामुळे 'एसी' बसमध्ये फक्त बसूनच प्रवास करण्याकडे प्रवाशांचा साहजिकच कल वाढलेला दिसतो. परिणामी, बसस्टॉपवरील गर्दीही वाढत जाते आणि त्यात प्रवाशांच्या वेळेचाही अपव्यय होतो. तेव्हा, 'बेस्ट' प्रशासनाने जरुर 'एसी' बसेसची संख्या वाढवावी. परंतु, असे करताना त्या बसेसच्या देखभाल-दुरुस्तीकडेही तितकेच कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. दर आठवड्याला या बसेसमधील 'नॉब्स' व्यवस्थित चालतात का, ते पाहावे. शिवाय आसनांव्यतिरिक्त उभ्याने प्रवास करणाऱ्यांसाठी बसच्या मध्यभागीही 'एसी'च्या 'फ्लो'ची व्यवस्था करता येईल का, हा पर्यायही 'बेस्ट'ने तपासून पाहावा. कारण, 'एसी' म्हणून मिरवणाऱ्या, पण आतमध्ये मात्र प्रवाशांचा होणारा असा कोंडमारा 'बेस्ट' नक्कीच नाही!

'विनावाहक'चा अट्टाहास का?

एसटीप्रमाणे 'बेस्ट'च्या काही मार्गांवर 'विनावाहक' बसेस प्रशासनातर्फे चालवल्या जातात. कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात प्रवासीसंख्या तुलनेने कमी असल्याने हा पर्याय सोयीस्कर ठरतही होता. परंतु, आता मुंबई अन् मुंबईकरांची कामे पुन्हा रुळावर आल्यानंतरही 'बेस्ट'चा 'विनावाहक' बसेस पळवण्याचा अट्टाहास का, हाच प्रश्न उपस्थित होतो. 'विनावाहक' बसेसमध्ये वाहक अर्थात कंडक्टर नसतो. त्यामुळे बसमध्ये चढताना तरी प्रवाशांना तिकीट दिले जाते किंवा ते ज्या थांब्यावर उतरतील, तिथे कंडक्टर उभे करुन तिकीट घ्यावे लागते. इथवरही ठीक होते. पण, बसच्या सगळ्याच थांब्यांवर तिकीट देणारे वाहक उपलब्धही नसतात. म्हणूनच मग ज्या थांब्यांवर वाहक नसतील, तिथे 'बेस्ट'च्या बसेस न थांबवता पुढे दामटवल्या जातात. एवढेच नाही, तर काही ठरावीक बसथांब्यांवर तिकीट देण्यासाठी उपलब्ध असलेले वाहक बसमध्ये चढून प्रवाशांना तिकिटे देतात आणि परत उतरून जातात. यामुळे होते असे की, जोपर्यंत वाहक सगळ्या प्रवाशांना चढून तिकिटे देत नाही, तोवर बस तिथेच पाच-दहा मिनिटे खोळंबते आणि 'ट्राफिक जाम'चीही समस्या निर्माण होते. सकाळच्या वेळी खासकरून रहिवासी भागातून स्थानकांकडे जाणाऱ्या बसेस खचाखच भरलेल्या असल्याने वाहकांनाही बसमध्ये कसेबसे घुसून तिकिटे देण्याची तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे किमान काही मार्गांवर तरी 'विनावाहक'चा हा नाहक अट्टाहास 'बेस्ट' प्रशासनाने सोडून द्यावा. कारण, यामध्ये प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा तर होतोच, शिवाय काही ठरावीक थांब्यांवरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. 'बेस्ट'ने जरुर नवनवीन प्रयोग करावेत, आपल्या मार्गांचा विस्तार करावा. पण, हे सगळे प्रयोग करताना प्रवाशांच्या मतांचाही विचार करण्याचे सौजन्य दाखवावे. सप्टेंबर महिन्यातही 'बेस्ट'ने ४८ लांब पल्ल्याचे मार्ग एकाएकी रद्द करण्याचा असाच उफराटा निर्णय घेतला होता. त्यावेळीदेखील प्रवाशांना 'बेस्ट'च्या या 'नॉट सो बेस्ट' निर्णयाचा मोठा फटका बसला. त्यामुळे 'लोकल'नंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट'ने मुंबईकरांचा प्रवास कसा अधिकाधिक सुखकर होईल, यासाठी तातडीने पावले उचलावीत, हीच अपेक्षा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@