समाजकार्याची सेवा‘वर्षा’

26 Oct 2021 12:40:41

Varsha Patil_1  
 
 
 
शोषित, वंचित समाजासाठी अखंड सेवाकार्य करणाऱ्या संभाजीनगरच्या वर्षा प्रसन्न पाटील. त्यांच्या कार्याचा आणि जीवनाचा घेतलेला हा मागोवा...
 
 
कर्मठ ब्राह्मण कुटुंबातली अगदी सोवळ्या-ओवळ्यात राहणारी मुलगी लग्न होऊन सासरी आली. तिचे आयुष्य इतके बदलले की, सामाजिक कार्यात तळागाळातील समाजाने आपल्याला मनापासून स्वीकारावे म्हणून मग ती बुद्धवंदना शिकली. घरची वास्तुशांती तिने खास बुद्ध प्रतिमेचे पूजन आणि वंदनेने केली. का? तर ज्या समाजाच्या कल्याणासाठी काम करायचे, तो समाज, त्याच्या प्रथा आपल्यालाही आत्मसात करायलाच हव्यात. शोषित-पीडित समाजबांधवांच्या सोबत धार्मिक भावानेही जोडले गेले पाहिजे. हे सांगणारी कहाणी आहे वर्षा पाटील या अगदी मनस्वी सामाजिक कार्यकर्तीची!
 
 
समाजशीलता ही शिकवावी लागत नाही, तर ती आतूनच हृदयात असते, हे वर्षा यांच्या जगण्याचा मागोवा घेतल्यावर जाणवते. ‘माझे-तुझे नाही, तर आपण सगळ्या एकच’ या जाणिवेतून त्यांनी बांधलेली महिलाशक्तीची मोट महत्त्वाची आहे. त्या ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या विभागप्रमुख आहेत. राष्ट्र सेविका समिती आणि ‘मेघालय छात्रावास’च्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे.
 
 
‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या माध्यमातून त्यांनी शेकडो महिलांना साक्षर केले. संभाजीनगरच्या सेवावस्तीतील पाच हजार किशोरवयीन मुलींसाठी शिक्षण, आरोग्य, स्वसंरक्षण आणि नेतृत्व विकासासाठी काम केले, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांनी अनेकविध उपक्रम राबविले. महिलांचे शिक्षण, आरोग्य, अल्पबचतगटाच्या माध्यमातून महिला संघटन व महिलांचे नेतृत्व उभे केले. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून १२,४०० महिलांना प्रशिक्षण दिले, तर ७,४०३ महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला. पाच हजार महिलांची कायदेविषयक जाणीवजागृती केली. ५००हून अधिक महिलांचा कौटुंबिक प्रश्न न्यायकेंद्राच्या माध्यमातून सोडवला. नवीन दाम्पत्यांना आरोग्यविषयक व कौटुंबिक जीवन आनंदी व परस्पर विश्वास निर्माण होण्यासाठी ‘मार्गदर्शन व संवाद साधणं’ या माध्यमातून दोन हजार नवीन जोडीदारांना कामाशी जोडले.
 
 
हजारो लोकांना थेट मदत करताना आणि जागृत करताना अनेक समस्या उद्भवतात. मात्र, वर्षा यांनी आपलेपणाच्या, स्नेहाच्या माध्यमातून या समस्यांना सोडवले. सरकारी योजना, समाजाला मदत करू शकणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्था यांच्याशी संपर्क केला. संभाजीनगर-मुकुंदवाडी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी गवंडीकाम करून रोजंदारी करणारे बहुसंख्य लोक आहेत. त्यामुळेच की काय, कौशल्य विकास केंद्रामध्ये गवंडीकामाचे प्रशिक्षणही दिले जाते. हे प्रशिक्षण महिलांसाठीही आहे. या केंद्राद्वारे इलेक्ट्रिशिअन संगणक प्रज्ञा, टेलरिंग, अन्नपूर्णा प्रकल्प, ब्यूटिशिअन इत्यादी स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाते. वर्षा पाटील यांच्या प्रशिक्षणाचे वेगळेपण हेच की, त्यांनी नुसते स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले नाही, तर प्रत्येक प्रशिक्षणार्थीमध्ये नैतिक आणि शाश्वत मानवी मूल्ये कशी रुजतील याचा प्रयत्न केला. मानवी नैतिक, शाश्वत मूल्ये जपण्याचे व्रत वर्षा यांनी आयाबायांमध्ये रुजवले, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदर्श महिला बचतगटाची ‘ती’ घटना!
 
 
वर्षा यांनी संस्थेच्या माध्यमातून शेकडो बचतगट सुरु केले. त्यापैकीच एक म्हणजे आदर्श महिला बचतगट. महिलांनीच सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायचे, हे त्यांनी कटाक्षाने सांगितले. काही महिन्यांनंतर या बचतगटाच्या बँकेच्या अकाऊंटमध्ये २५ हजार रुपये जमा दाखवले गेले. महिला बँकेचे पासबुक घेऊन वर्षाकडे आल्या. म्हणाल्या, “ताई, हे पैसे आपले नाहीत. ताई, विनाकष्टाचा दुसऱ्याचा एक रुपयाही घेऊ नये, हे तुम्हीच शिकवले.” हे ऐकून वर्षांना खूप समाधान मिळाले. त्यानंतर बँकेच्या मॅनेजरना भेटून महिलांनी ते पैसे आमचे नाहीत, परत घ्या, सांगितले.
 
 
संस्थेच्या माध्यमातून सेवाकार्याचा डोंगर उभ्या करणाऱ्या वर्षा प्रसन्न पाटील यांच्या जीवनपटाकडे पाहिले तर जाणवते की, त्यांचे वडील रामराव वाढवणकर आणि आई प्रमिला हे अत्यंत कर्मठ ब्राह्मण कुटुंबातले. दोघेही पेशाने शिक्षक. त्यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक वर्षा. घरात स्पृश्य-अस्पृश्य, सोवळे-ओवळे पाळले जाई. जातीय विषमता पाहून लहापणीही वर्षा यांना वाईट वाटे. सगळ्यांशी समानतेने वागायला हवे, असे वर्षांना वाटे. किशोरवयात त्यांनी आईसोबत दोन वर्षे साक्षरतावर्गही घेतले. या दोन वर्षांत ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न त्यांना समजले.
 
वर्षा या १६ वर्षांच्या झाल्या आणि नातेवाइकांनी टोमणे सुरू केले की, “मुलगी मोठी झाली. बस करा शिकवणे, लग्न करा.” त्यावेळी वर्षांच्या आईना राग येई. पण, वडील म्हणत, “प्रत्युत्तर करू नकोस. आपल्या लेकीला खूप शिकवायचे!” आई-वडील वर्षाच्या पाठी ठाम उभे राहिले. वर्षा यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचा विवाह डॉ. प्रसन्न पाटील यांच्याशी झाला. विवाहापूर्वी प्रसन्न म्हणाले, “बघ, मी सेवावस्ती समाजबांधवांसाठी काम करतो. तुला ऐषाराम देऊ शकणार नाही. कारण, ज्या समाजासाठी मी करणार, मी त्यांच्यासारखेच राहतो. त्यामुळे विचार करा आणि तुमचा निर्णय कळवा.” त्यावेळी सधन ब्राह्मण कुटुंबात राहणाऱ्या वर्षा यांना कळाले नाही की, समाजबांधवांसारखे राहणे म्हणजे कसे राहणे? प्रसन्न आणि वर्षा यांचा विवाह झाला. प्रसन्न यांचे कुटुंब म्हणजे रा.स्व. संघसमर्पित समाजकार्याला वाहिलेले कुटुंब. प्रसन्न यांच्यासोबत राहून काही महिन्यांतच वर्षा डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या उपक्रमांशी जोडल्या गेल्या. वर्षा म्हणतात की, “कामाच्या पुढील टप्प्यात अन्य जिल्ह्यातील 25 हजार महिला व युवकांसाठी सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, तयार वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करणे, महिला विकासाचे कामदेखील अन्य ठिकाणी सुरू करणार आहोत.” वर्षा यांच्या संकल्पाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0