माझ्या जीविताला धोका, मला तुरुंगातही मारतील - के.पी.गोसावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |
k. p. gosai _1  


मुंबई - माझ्या जीविताला धोका असल्याने मी समाजासमोर येत नसून मला अटक झाल्यानंतर तुरुंगातही मारले जाऊ शकते, अशी भिती के.पी.गोसावी यांनी इंडिया टूडे या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे. आर्यन खान क्रूझ प्रकरणामध्ये के.पी.गोसावी आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप झाला आहे.
 
 
क्रूझमधील ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानला पकडण्यामध्ये के.पी.गोसावी यांनी एनसीबीला मदत केली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणामध्ये के.पी.गोसावी असण्याबाबत आक्षेप नोंदवून गोसावी फरार असल्याची माहिती दिली होती. दोन दिवसांपूर्वी के.पी.गोसावीचा चालक प्रभाकर साईल यांनी गोसावी आणि अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर इंडिया टूडे या वृत्तवाहिनीने गोसावी यांच्याशी संवाद साधला आहे.
 
 
 
गोसावी यांनी इंडिया टूडेला दिलेल्य़ा माहितीनुसार ते समीर वानखेडेला ओळखत नाहीत. गोसावी म्हणाले की, समीर वानखेडे यांना मी पूर्वीपासून ओळखत नसून मी त्यांना टिव्हीवर पाहिले आहे. मनीश भानुशाली यांना या पार्टीबद्दल मिळालेली माहिती सांगण्यासाठी आम्ही एनसीबीमध्ये गेलो. तिथे पी.व्ही.सिंग या अधिकाऱ्याला भेटलो. त्यानंतर समीर वानखेडे यांच्याशी ओळख झाली. मी यापूर्वी कधीही एनसीबीच्या छाप्यामध्ये सामील झालेलो नाही.
 
 
 
आर्यनच्या सांगण्यावरुन फोन केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या टि्वटरवरुन के.पी.गोसावी यांचा व्हिडीओ टि्वट केला होता. या व्हिडीओमध्ये गोसावी हे फोनवर आर्य़न खानचे कोणाशी तरी बोलणे करुन देत असल्याचे दिसते. याबद्दल गोसावी म्हणाले की, "सर्वांसोबत बोलत असताना आर्यन खानच्या विनंतीवरुन मी त्याचे बोलणे त्याच्या पूजा नामक सेक्रेटरीशी करुन दिले." 
 
 
साईल यांच्या आरोपाबद्दल गोसावी म्हणाले.....
प्रभाकर साईल हा माझ्यासाठी काम करत होता. माझे त्याच्याशी ११ आॅक्टोबरपासून बोलणे झालेले नाही. तो मला अप्रत्यक्षपणे बोलला होता की, मला पंच म्हणून सही केल्याचे पैसे मिळाले नाहीत, तर मी या विषयाबद्दल मी काहीही सांगेन.
 
 
धमकीचे फोन
के.पी.गोसावी यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे सांगितले आहे. मुंबईतील विविध मोबाईल नंबरवरुन मला धमकीचे फोन येत आहेत. मला तुरुंगातही मारुन टाकतील असे फोनवर बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यास मी तपासाला संपूर्ण सहकार्य करेन, असे गोसावी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@