“पाकिस्तान नव्हे, आम्ही काश्मीरी तरुणांसोबत संवाद करणार” - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |
AS _1  H x W: 0

पंतप्रधान मोदींच्या ह्रदयात काश्मीर आणि काश्मीरी जनता
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी, केंद्र सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी असा सल्ला दिला. मात्र, मोदी सरकार पाकिस्तानशी नव्हे, तर काश्मीरी तरुणांशी संवाद करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे आता काश्मीरी तरुणांनी भय आणि अविश्वास बाजुला ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी श्रीनगर येथे केले.
 
 
 
 
 
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह शनिवारपासून जम्मू – काश्मीरच्या दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी श्रीनगर येथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन – पायाभरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी, मोदी सरकारने पाकिस्तानसोबत चर्चा करावी असा सल्ला दिल्याचे वर्तमानपत्रात वाचले. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही चर्चा अथवा संवाद केवळ काश्मीरी तरुणांशीच करणार आहोत. काश्मीरी तरुणांसोबत संवाद करण्यापासून आणि त्यांच्याशी मैत्री करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा टोलाही शाह यांनी लगाविला.
 
 
shah_1  H x W:
 
श्रीनगर येथील खीरभवानी मंदिरात शाह यांनी घेतले दर्शन 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्रदयात काश्मीरी आणि काश्मीरी जनता असल्याचे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काश्मीरी जनतेला देशाच्या अन्य राज्यांतील जनतेप्रमाणेच अधिकार मिळावेत, यासाठी मोदी सरकार कार्यरत आहे. कलम ३७९० संपुष्टात आणल्यामुळे प्रदेशाचा विकासाचा नवा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे आपले राजकारण संपुष्टात येईल, अशी भिती वाटणारेच जनतेची दिशाभूल करीत असल्याचेही शाह यांनी यावेळी नमूद केले.
 
 
बुलेटप्रुफ काचेशिवाय झाले शाहांचे संबोधन
 
 
श्रीनगर येथे आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बुलेटप्रुफ काचेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या संबोधनास प्रारंभ करण्यापूर्वी व्यासपीठावरील व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना ती बुलेटप्रुफ काच काढण्यास सांगितले. त्यानंतरच त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@