तत्त्वहीन कसरती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2021
Total Views |

savrkar_1  H x


संजय राऊतांच्या, “सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली,” याला जोडून, “तीच पिढी राज्याच्या सत्तेसाठी सावरकरविरोधकांसमोर झुकली,” असे का म्हणू नये? त्यातूनच शिवसेनेच्या स्वातंत्र्यवीरांचे कौतुक तर करायचे; पण त्यांच्यावर विखारी टीका करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अलगद जपायचे, असल्या तत्त्वहीन कसरती सुरू झाल्या.




स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेसशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खेटर बोलायचे. आज मात्र सत्तेच्या हव्यासापायी उद्धव ठाकरेंनी त्याच काँग्रेसचे खेटर डोक्यावर घेतले आणि नितीन राऊतांसारखा टुकार माणूस महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झाला, सावरकरांचा अपमान करू लागला. पण, त्यावरून नितीन राऊतांना सुनावण्याचे, खडसावण्याचे धाडस ना उद्धव ठाकरेंमध्ये आहे, ना तोंडाची वाफ दवडणार्‍या संजय राऊतांमध्ये. म्हणूनच, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आम्हीच खरे पाईक असल्याचे सांगणारा लेख त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त लिहिला, पण सावरकरविरोधी माकडचाळे करणार्‍या नितीन राऊतांचा साधा उल्लेख करण्याचेही धैर्य संजय राऊतांना झाले नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांच्या अपमानावरून एकेकाळी काँग्रेसनेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला चपलेने बडवले होते, शिवसेनेत, उद्धव ठाकरेंमध्ये वा संजय राऊतांमध्ये अजूनही तशी हिंमत असेल तर त्यांनीही नितीन राऊतांचा पुतळा उभारून त्याला भर चौकात जोड्याने मारून दाखवावे. तसे करता येत नसेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील बेगडी प्रेमाचे प्रदर्शन करण्याचा उद्योग करू नये. कारण, सावरकर क्रांतीचा, हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा धगधगता अंगार आहेत आणि सत्तेसाठी गांधी-पवारांपुढे लाळघोटेपणा करणार्‍या आताच्या पुचाट शिवसेनेला तो झेपणार नाही.




“गांधीजींच्या सांगण्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफी मागितली,” असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटल्याचे संजय राऊतांनी लिहिले. पण, राजनाथ सिंह यांच्या वाक्यात ‘मर्सी पिटीशन-दया याचिके’चा उल्लेख होता, ‘माफी’चा नव्हे, दोन्ही बाबी भिन्न आहेत आणि हे तथ्य तपासून पाहण्याचेही संजय राऊतांना सुचले नाही. पुढे ते म्हणाले की, “ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंगावर एक चरोटाही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा करतात.” या विधानातून त्यांना रा. स्व. संघाला, भाजपला, राजनाथ सिंह यांना लक्ष्य करायचे आहे. पण, संजय राऊतांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास पुन्हा एकदा अभ्यासावा. शरीरावर ओरखडाही न आलेल्या, राजमहाली तुरुंगवास भोगलेल्या कोणाकोणाचा आणि कोणी राष्ट्रनायक, महानायक म्हणून गौरव केला, ते पाहावे आणि तेच लोक आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नायकत्व मलीन करण्याचे हिणकस प्रयत्न करत आले. तरीही, मुख्यमंत्रिपदासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्यहनन करणार्‍यांच्याच दाराशी बसण्याचे उद्योग संजय राऊतांनी केले. राहुल गांधींनी तर अनेकदा ट्विटरवरून आणि जाहीर वक्तव्यांतून सावरकरांची यथेच्छ निंदानालस्ती केली, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावरकरांची मानहानी करण्याची संधी सोडलेली नाही. तेव्हा संजय राऊतांनी, सावरकरभक्तीचे फारच भरते आले असेल, तर स्वातंत्र्यवीरांना माफीवीर ठरवण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्‍या गांधी-पवारांविरोधात उभे ठाकावे.




 
पण, ते तसे करणार नाहीत आणि त्याचे उत्तर त्यांनीच दिले आहे. “सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले,” असे संजय राऊतांनी लिहिले. पण, त्यांना, उद्धव ठाकरेंना, शिवसेनेला मिळालेली स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा, लढवय्या वृत्ती गेली कुठे? आज शिवसेनेचे, ठाकरेंचे सरकार असूनही त्याच सरकारमधला एक मंत्री सावरकरांचा अवमान करतो, तरी त्याविरोधात संजय राऊत, उद्धव ठाकरे वा शिवसैनिकांचे रक्त उसळत नाही, हे कोणते तत्त्व? आणि असे पहिल्यांदाच नाही, गेल्या दोन वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वाट्टेल ती चिखलफेक केली गेली. आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाम कार्यकर्त्यांनी भरलेल्या समाजमाध्यमी व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकी समूहांत सावरकरविरोधी पोस्ट, फॉरवर्ड, कमेंट्सची घाण वाहताना दिसते. पण, ना नितीन राऊत, ना राहुल गांधी, ना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून माफी मागण्याची वा सत्तेतून बेदखल करण्याची धमक शिवसेनेने दाखवली. कारण गांधी-पवारांची खुर्चीसाठीची कृपा आडवी आली. म्हणूनच संजय राऊतांच्या, “सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली,” याला जोडून, “तीच पिढी राज्याच्या सत्तेसाठी सावरकरविरोधकांसमोर झुकली,” असे का म्हणू नये? त्यातूनच शिवसेनेच्या स्वातंत्र्यवीरांचे कौतुक तर करायचे; पण त्यांच्यावर विखारी टीका करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अलगद जपायचे, असल्या तत्त्वहीन कसरती सुरू झाल्या.





स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श मानतो, असे म्हणायचे; पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यवीरांवर खालच्या पातळीवर टीका करणार्‍यांच्याच पंगतीत बसायचे, असा प्रकार शिवसेनेकडून सुरू आहे. म्हणजे, सावरकरांनाही सोडता येत नाही आणि काँग्रेसलाही सोडता येत नाही, अशी तृतीयावस्था. पण, त्यातूनच शिवसेनेचा पारंपरिक मतदार दुरावत चालला आहे. कारण, शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व सत्तेच्या अट्टाहासापायी गुंडाळून ठेवले व सावरकरांचा अपमान करणार्‍यांना डोक्यावर घेतले. पण, त्याने नाराज होणार्‍या मतदारांची जागा भरून कशी काढायची? तर गमावलेल्या मतांची तजवीज मुस्लिमांच्या मतांतून करायची, असे दोन्ही काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी शिवसेनेला सांगितलेले आहे. म्हणजेच, कधीकाळी कडवट हिंदुत्वाची प्रतिमा धारण केलेल्या शिवसेनेला व त्या पक्षाच्या नेतृत्वातील आघाडीला मुस्लिमांची एकगठ्ठा मते हवी आहेत. त्यातूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सावरकरांची कितीही टिंगल-टवाळी केली तरी स्वतःला सावरकरप्रेमी म्हणत त्यांचीच तळी उचलण्याच्या कसरती शिवसेनेकडून सुरू आहेत. पण, जनता शिवसेनेच्या असलियत आणि नियतपासून अनभिज्ञ नाही. शिवसेनेची सावरकर-हिंदुत्वनिष्ठा कचकड्याची आहे, म्हणूनच नितीन राऊत अजूनही मंत्री असून शिवसेना नेतृत्वाने त्यांनी केलेल्या सावरकरांच्या अपमानावरून शब्दही काढलेला नाही. पण, हे किती काळ चालणार? तर जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत आणि नंतर मात्र सत्तेसाठी लाचार झालेल्या, निरर्थक कसरती करणार्‍या शिवसेनेला मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीच.





@@AUTHORINFO_V1@@