मायेची पखरण करणार्‍या शिक्षिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2021   
Total Views |

manse_1  H x W:



कडोंमपा शाळेतील शिक्षिका तन्वी मोर्ये-बागवे यांना नुकतेच ‘स्वाभिमान शिक्षकरत्न राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीचा घेतलेला आढावा...



तन्वी यांचा जन्म मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात झाला. त्यांनी सुरुवातीला बोरिवलीतील महापालिकेच्या शाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्यांचे वडील मनोहर गिरणी कामगार होते. १९८१ साली गिरणी कामगारांचा संप झाला आणि त्यांच्या आई माधवी यांनी आपल्या मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे पहिली ते दुसरीपर्यंतचे शिक्षण बोरिवलीत झाले असले, तरी त्यापुढील बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी आपल्या मूळगावी बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल येथून पूर्ण केले. दहावीनंतर त्यांनी विज्ञान शाखेची निवड केली. बांदा येथे शिक्षण घेतल्यानंतर चारचौघांसारखे आपले नशीब आजमावण्यासाठी त्या मायानगरी मुंबईत आल्या. बारावीनंतर त्यांनी मुंबईत येऊन विनिता येथून १९९३ मध्ये ‘डी.एड.’ केले. माहेरी त्यांच्या घरात अनेक जण शिक्षकी पेशात आहेत. त्यामुळे शिक्षक होऊन ती परंपरा तन्वी यांनीदेखील कायम ठेवली. शालेय जीवनापासूनच त्यांना शिक्षकी पेशाची आवड होती. मुलांना समजून घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांना कायम प्राथमिक वर्गाची जबाबदारी दिली जात होती. आता त्या सातवीला शिकवत असून प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांच्याकडे 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. विद्यादानासोबत सरकारी सेवेतील शिक्षकांना अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. त्यासदेखील कर्तव्य समजून तन्वी यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेत जवळपास तीन दशके अविरत सेवा दिली. “भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सत्कार होणे म्हणजे मी आजपर्यंत केलेल्या कामांची पोचपावतीच आहे,” असे तन्वी सांगतात.






शालेय जीवनात तन्वी या हुशार विद्यार्थिनी होत्या. अनेक वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा यात त्यांनी शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. केवळ त्या शाळेचे प्रतिनिधित्व करीत नव्हत्या, तर त्यांनी अनेक बक्षिसेही पटकाविली आहेत. गोरेगावच्या ‘गुरुकुल स्कूल’मध्ये दोन वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. त्याचदरम्यान वडिलांचे छत्र हरपले आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे घेता यावी, याकरिता त्यांनी कोकण भवनची परीक्षा दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेतही दोन वर्षे त्यांनी काम केले होते. जिल्हा परिषदेच्या मुरबाड या दुर्गम तालुक्यात ‘असिस्टंट टीचर्स’ म्हणून काम करावे लागले. मुरबाड तालुक्यातील प्रवास तन्वी यांच्या मनाला कणखर करून गेला. याच काळात त्यांनी आपले अपूर्ण राहिलेले शिक्षणही जिद्दीने पूर्ण केले. ‘बीए’ (मराठी) या विषयात पदवी संपादन केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवा दिल्यानंतर त्यांची नेमणूक कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेत झाली. त्यासाठी त्यांनी परीक्षा दिली. त्यात त्यांना उत्तम यश मिळाले. खरंतर त्यांची नेमणूक २७ गावांसाठीच झाली होती. हाजिमलंग रोडवर शाळा होती. पत्रीपूल हा एकच होता. प्रवासाच्या फारशा त्यावेळी सुविधा नव्हत्या. सातवीपर्यंत शाळा होती. ग्रामीण भागातील मुले असली तरी हुशार होती. पटसंख्याही चांगली होती. गावांचा बदलाला विरोध होता. पण, शाळेतील शिक्षिकांनी मिळून प्रयत्न करून शाळेत बदल घडवून आणले. त्यानंतर गावकर्‍यांनीही बदल स्वीकारले. मुलांसाठी विविध उपक्रम राबविले. विद्यार्थी गावातील पोस्टमन, डॉक्टरांना पत्रलेखन घेण्यास लावायचे.






त्यांच्या मुलाखतीचा उपक्रम राबविला होता. वसार येथील शाळेत माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार केला होता. ते विद्यार्थी गुरुपौर्णिमेला येऊन शाळेला भेट देत होते. काही काळ महापालिकेच्या शाळा क्रमांक २० मोठागाव-ठाकुर्ली येथे काम केले आहे. त्या २०१२ पासून संत नामदेव प्राथमिक विद्यालय येथे काम करीत आहेत. प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असत. त्यामुळे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही अनेक बक्षिसे मिळविली आहेत. महापालिकेच्या शाळेमध्ये सध्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावताना दिसत आहे. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी त्या प्रयत्न करतात. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचेकाम त्यांनी केले आहे. त्यात त्या समाधानीदेखील आहे. त्यांनी अनेक वेळा स्वखर्चाने विद्यार्थी विकास साधला आहे. कोरोनाकाळात ‘कोविड योद्ध्या’ची भूमिकाही त्यांनी समर्थपणे पार पाडली. कोरोनाकाळातही सामाजिक भान ठेवत त्यांनी आपली उत्तम सेवा दिली. ‘रोटरी क्लब’तर्फे त्यांना ‘नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.विद्यार्थिप्रिय शिक्षिका, सांस्कृतिक क्षेत्रात शाळेस नावारूपाला आणणार्‍या, उत्कृष्ट निवेदिका, मनमिळाऊ आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या तन्वी बागवे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.






@@AUTHORINFO_V1@@