जम्मू – काश्मीरच्या विकासात युवकांची भुमिका सर्वांत महत्वाची – गृहमंत्री अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2021
Total Views |
shah_1  H x W:

आता ३ कुटुंबांना जाब विचारण्याची वेळ
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरमधील युवा पिढी आज विकासाच्या आणि लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आली आहे. त्यांच्यामध्ये प्रदेशात परिवर्तन घडविण्याची क्षमता आहे. गेल्या सत्तर वर्षांत तरुणांची माथी भडकविण्याचे काम केलेल्या तीन कुटुंबांना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी श्रीनगर येथे केले.
 
 
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह हे शुक्रवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी जम्मू – काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी प्रदेशातील युथ क्लबच्या सदस्यांसोबत संवाद साधला. यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते.
 
 
जम्मू – काश्मीरमध्ये परिवर्तनाची सुरूवात ५ ऑगस्ट, २०१९ रोजी झाली. मात्र, या परिवर्तनाला गती देण्याची जबाबदारी प्रदेशातील तरूणाईची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नव्या काश्मीरच्या निर्माणामध्ये युवकांची भुमिका अतिशय महत्वाची आहे. काश्मीरमधून अडिच वर्षांपूर्वीपर्यंत दररोज केवळ दहशतवाद, हिंसाचार आणि दगडफेकीच्या बातम्या येत असत, मात्र आज येथील तरुण शिक्षण, रोजगार आणि उद्योग – व्यवसायाची भाषा बोलत आहे. जम्मू – काश्मीरमध्ये सुरू झालेल्या या परिवर्तनास रोखण्याची क्षमता आज कोणामध्येही नाही. तरीही तसा कोणी प्रयत्न केल्यास त्यास सडेतोड उत्तर देणारे नेतृत्व आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
 
 
 
 
 
काश्मीरच्या इतिहासात ५ ऑगस्ट, २०१९ हा दिवस सुवर्णाक्षरात नोंदविला गेल्याचे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, दहशतवाद, हिंसाचार आणि घराणेशाहीच्या युगाचा अंत होऊन विकासाच्या युगास प्रारंभ झाला आहे. प्रदेशातील युवक २०१९ पूर्वी देशाचा अर्थमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती होण्याचा विचारही करू शकत नव्हता. कारण, गेल्या सत्तर वर्षात केवळ ८७ आमदार, ६ खासदार आणि तीन कुटुंबांचेच येथे वर्चस्व होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी येथे त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था लागू केली, निवडणुका घेतल्या आणि ३० हजार लोकप्रतिनिधी आज काम करीत आहेत. त्यामुळे आज काश्मीरी तरुण – तरुणी पंचायत सदस्य, जिल्हा विकास परिषद सदस्य, आमदार, खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री बनू शकतात. मात्र, केवळ ३ कुटुंबापुरती मर्यादित लोकशाही पंतप्रधानांनी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविली. आपले राजकारण बंद होण्याती भिती असल्यानेच ती तीन कुटुंबे डिलीमीटेशनलाही विरोध करीत असल्याचा टोला शाह यांनी लगाविला. त्याचप्रमाणे जम्मू – काश्मीरमध्ये सध्या डिलीमीटेशनची प्रक्रिया सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर येथे तातडीने निवडणुका होतील आणि पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा प्रदान करण्यात येईल. तसे करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचीही ग्वाही शाह यांनी यावेळी दिली.
 
 
गेल्या सत्तर वर्षांत तीन कुटुंबांनी प्रदेशासाठी नेमके काय केले, याचा जाब विचारण्याची वेळ आता आली असल्याचे शाह यांनी सांगितले. या कालावधीमध्ये प्रदेशात ४० हजार बळी गेले, काश्मीरी तरुणांची एक पिढी विकासापासून दूर गेली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या सहा महिन्यात प्रदेशात तब्बल १२ हजार कोटींची नवी गुंतवणूक आली आहे, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ११५० जागा निर्माण झाल्या असून आणखी ११०० जागा तयार होणार आहेत, आयआयटी, आयआयएम, एनआयटी, आयआयएमसी, कर्करोग संस्था आल्या आहेत. त्यामुळे जन्मू – काश्मीरच्या विकासरथाला रोखणे आता कोणालाही शक्य नसल्याचेही शाह यांनी यावेळी नमूद केले.
 
 
‘पीओके’मध्ये बघा, काय चाललंय...
 
 
जम्मू – काश्मीरमध्ये आता कुठे विकासाची सुरूवात झाली आहे, त्यामध्ये आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीची शेजारीच असलेल्या पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करून बघा, तेथे अद्यापही गरिबी आहे, बेरोजगारी आहे, विकासाची गंधही नाही. त्यामुळे विकासाच्या या चक्रास गती देण्याची जबाबदारी आता युवकांनीच पार पाडायची आहे.
 
 
‘युथ क्लब’ ही संकल्पना कमालीची यशस्वी
 
 
जम्मू – काश्मीरमधील युवकांना नव्या संधी उपलब्ध देण्यासाठी ‘युथ क्लब’ ही संकल्पना यशस्वी करण्यामागे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रयत्नांचे शाह यांनी कौतुक केले. जम्मू – काश्मीरमध्ये सध्या ४५०० युथ क्लब असून त्यांना शिक्षण, आरोग्य, क्रिडा, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन – प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य केले जात आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@