गोवा आणि शिव-शंभू छत्रपती भाग - १

23 Oct 2021 22:23:40

csm 2_1  H x W:

अनेक वर्षे पोर्तुगीज अंमलाखाली राहिलेल्या तळ कोकणापलीकडच्या भूमीला आज गोवा म्हणून ओळखले जाते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याच्या भूमीला धर्मांध पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते, ते कसे? शिव-शंभू छत्रपतींच्या शौर्याच्या खाणाखुणा आज गोव्यात कुठे पाहायला मिळतात? याचीच माहिती देणारा हा लेख...



गोमंतक, आताचा गोवा! हे नाव उच्चारताच आपल्या नजरेसमोर येतो तो तेथील निळाशार समुद्र, निसर्गरम्य चंदेरी-सोनेरी वाळूचे किनारे अन् झिंग आणणारी पेयं. पण, या पलीकडेही गोव्याला अनेक घटनांचा इतिहास व भूगोल लाभला आहे, हे मात्र आपण नेहमीच विसरतो. नक्की काय सहन केले आहे या भूमीने? किती अत्याचार आपल्या उरात साठवत ही भूमी आता सुंदर दिसत आहे? याचा विचार कधीतरी केलाच पाहिजे. या भूमीला त्या धर्मांध पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी शिव-शंभू छत्रपतींनी केलेले धाडस, त्यांच्या मावळ्यांचे अपरिमित शौर्य आपल्या नजरेआड होते. आता आपण याच खुणांचा मागोवा या लेखप्रपंचात घ्यायचा आहे.ऐतिहासिक काळात गोव्याला अपरांत, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी विविध नावे आढळतात. पण, या सर्वांपेक्षा सर्वांत जुने अन् सहज जिभेवर रेंगाळणारे नाव म्हणजे गोंय.





१९ डिसेंबर, १९६१ रोजी स्वतंत्र होईपर्यंत गोव्यावर एकछत्री असा कोणाचाच अंमल नव्हता. मगधचे नंद, महान सम्राट अशोक, सातवाहन, दक्षिण भारतातील चुळू, हाळसीचे कदंब, कोल्हापूरचे कुरा, यादवकाळातील भोज, कोकण मौर्य, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार व त्यानंतर कदंब राजवट गोव्यात पुन्हा सुरु झाली. भोज राजानंतर हा कदंब काळ गोव्याच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून मानला जातो. त्यानंतही या भूमीने अनेक संकटे पाहिली. अनेक स्थित्यंतरे होऊनही इथल्या हिंदू जनतेचा वनवास मात्र कायम राहिला. प्रभू श्रीरामांचा वनवास, पांडवांचा अज्ञातवास काही अध्यायांनी समाप्त झाला. पण, या पुण्यभूमीवरील लोकांच्या वेदनेला अंतच नव्हता.हा पवित्र गोमंतक इस्लामी राजवटीखाली असताना येथील नायटे लोकांचा स्थानिक जनतेस फार त्रास होई. हे नायटे म्हणजेच हिंदू स्त्रिया अन् मुस्लीम पुरुष यांपासून पैदा झालेली मिश्र संतती होय. ‘टोटल कॉम्बो’! त्या नायट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वेर्णा येथील सरदेसायांनी विजयनगरच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या तिमाजी गरसप्पा (तिमय्या/तिमाजी नाईक) याच्याकडे मदत मागितली. त्यांनी आपली धूर्त कल्पना मनात ठेवून होन्नावर येथील फ्रान्सिस आलमेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉयची भेट घेऊन मदतीची याचना केली. आपल्या देशासाठी अन् धर्मासाठी या धर्मांध पोर्तुगिजांना अशी संधी पाहिजेच होती. त्यांना हा प्रस्ताव अगदी सोनेरी संधीच वाटली.





मग अशा प्रकारे दि. २७ फेब्रुवारी, १५१० रोजी गोव्यात पोर्तुगिजांचे आगमन झाले. मी तर म्हणेन की, आमच्या छाताडावर थया-थया नाचून आमचा श्वास कोंडायला आम्हीच त्यांना आमंत्रण दिले. त्या संधिसाधू फिरंग्यांचे गोरे पाय त्या सप्तकोटीश्वराच्या भूमीला लागले आणि सुरुवात झाली प्रचंड क्रूरतेची...आपल्या सत्तेचा वचक दाखविण्यासाठी इथल्या उरल्या-सुरल्या मुसलमान रहिवाशांची व निरपराध बालकांची सर्रास कत्तल करून दिल्लीच्या नादिरशहालाही लाज वाटेल, अशा कृत्यांनी कळस गाठला. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अनाथ, मुसलमान विधवांची पोर्तुगीज पुरुषांबरोबर बळजबरीने लग्न करून गोव्यात हाफकास्ट पोर्तुगीज प्रजा निर्माण केली. एका हाती तलवार तर दुसर्‍या हाती क्रॉस घेऊन आलेल्या या धूर्त पोर्तुगिजांनी आपले दोन्ही मनसुबे फत्ते करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा होते धर्मकारण, मगच सत्ताकारण अन् राजकारण!या सार्‍या प्रकारावर १७ व्या शतकात शिवाजी महाराज लक्ष ठेवून होतेच. पोर्तुगिजांचा मुघल- मराठा संघर्षाचा होईल तितका फायदा करून घ्यायचा हाच त्यांचा प्रयत्न होता. या धामधुमीचा फायदा घेण्यात आणखी एक घरभेदी सामील होते ते म्हणजे सुंदरवाडीकर सावंत-भोसले; परंतु शिवाजी महाराजांच्या तळकोकणावरील स्वारीने यांच्या पापाचा घडा भरला. मुधोळचे बाजी घोरपडे यांना कर्माची सजा देऊन आदिलशाही सरदार खवासखान याला कुडाळातून थेट विजापूरपर्यंत पिटाळून लावल्यानंतर महाराज थेट वाडीकर सावंत-भोसल्यांवर चालून गेले. त्यावेळी सावंत गोवेकर फिरंग्यांच्या आश्रयाला गेले. पण, शिवरायांचा रुद्रावतार पाहून सावंतांना त्यांनी आश्रय नाकारला व तह झाला.






सावंतांवर मिळालेल्या विजयानंतर महाराजांनी आपला मोर्चा गोव्यातील आदिलशाही किल्ल्याकडे वळवला. सभोवताली खोल खंदक असलेला मातब्बर असा हा भुईकोट, किल्ला फोंडा/फोंडे होय.महाराजांनी घातलेल्या वेढ्यातही गडाचा किल्लेदार महाबतखान नेटाने लढला. आदिलशाही फौज स्वराज्यावर हल्ला करण्याची शक्यता असल्यामुळे हा वेढा आटोपता घेऊ, अशी राजकीय चाल महाराजांनी खेळली. मराठ्यांचा उठणारा वेढा पाहण्यासाठी कोटातील कित्येक लोक तटबुरुजावर उभे राहिले. त्याचदरम्यान तोफखान्याच्या लोकांनी किल्ल्याच्या तटाखाली ठासलेल्या सुरुंगाचा भडका उडाला आणि कित्येक लोक ठार झाले. या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी निकराचा हल्ला चढवला आणि कोट फत्ते केला.





मग आता तो कोट कुठे आहे? व महाराजांनी त्याचा वापर कसा केला?




वर्तमानकाळात या कोटाचे अवशेष फोंडा बाजाराच्या वरच्या बाजूला दिसतात. कोटाचा खंदक नजरेस पडतो. पण, तो सध्या प्रमुख गटाराच्या रूपात अस्तित्वात आहे. कोटातील पाण्याचे प्रमुख स्रोत असलेली एक विहीर आणि काही भग्न अवशेष तर काही ढासळलेले चिरे दृष्टीस पडतात. सर्वभक्षी काळाने हे सारे आपल्या उदरात गडप करायच्या अगोदरच शिवरायांचा पदस्पर्श झालेल्या या गोव्यातील वास्तू आपण नजरेत सामावून घेतल्या पाहिजेत.आता मात्र महाराजांचे लक्ष फिरंगी गोव्यावर वळले. गोव्याच्या गव्हर्नरने मान झुकवली. त्याने आपला वकील नजराणे घेऊन तहासाठी पाठवला. महाराजांनी कुडाळपासून फोंड्यापर्यंत धडक मारली. पण, फिरंगी रक्तपिपासू जळवा चुरगळण्याचे काम मात्र त्यांनी तूर्तास थांबवले.यानंतरच्या कालखंडात पुरंदरचा तह, आग्रा भेट-सुटका अशी लहान-मोठी अनेक संकटे हिंदवी स्वराज्याच्या राजाने झेलली. साहजिकच स्वराज्याच्या ज्योतीचा आता भयंकर वणवा झाला होता. धर्माच्या, देवांच्या अन् स्वराज्यदेशाच्या आड आलेल्या शत्रूंना तो होरपळून काढत होता. परदेशातून आलेल्या इंग्रज, पोर्तुगीज आदी सत्तांना हा तापदायक शिवाजी नकोच होता. त्यांचा विनाश कधी अन् कसा होईल, याचीच ते वाट पाहत होते. गोव्याच्या फिरंग्यांनी तर मोगल बादशाहाला पत्रही लिहिले की, शिवाजीचा नाश करण्यासाठी आम्ही तुम्हाला आरमारासह मदत करू. महाराजांनासुद्धा ही गोव्याची जुलमी अन् पाशवी सत्ता फारच त्रासदायक व तापदायक वाटत होती. पण, लढून गोवा फत्ते करायचा म्हटला तर वेळ, पैसा, सैन्य आणि सामग्रीच्या बाबतीत मोहीम फारच खर्चिक होती, त्यामुळे दुसरी युक्ती अमलात आणण्याचे ठरले.






आपल्या धाडसी युक्तीच्या पूर्णतेसाठी स्वतः महाराजच कोकणात उतरले. स्वराज्य आणि फिरंगाण यांच्या सीमेवरील लहान-मोठ्या देसायांचा सफाया करून मगच गोव्यावर निकराची झुंज द्यायचा मनसुबा केला. पुण्यपावन पवित्र गोमंतक या धर्मांध, जुलमी पोर्तुगिजांच्या तावडीतून सोडवायलाच पाहिजे, याची तळमळ शिवाजी महाराजांना लागून राहिली होती.हाच बेत सफल करण्याची सुरुवात म्हणून शिवाजी महाराजांनी भतग्राम म्हणजे आताचे डिचोली अथवा, बिचोलीम महालाच्या खळो शेणई (खेळो शेणवी) नामक देसाई जमीनदारावर झडप घालून त्याची सर्व जहागीर जिंकली, तेव्हा तो देसाई आग्वादला पोर्तुगिजांच्या आश्रयास गेला. त्याच्या पाठलागाचे निमित्त करून महाराज बारदेशात, फिरंग्यांच्या हद्दीत सहा हजार लोकांनिशी नऊ मैलांपर्यंत आत घुसले. त्यामुळे घाबरलेल्या विजरई जुवावं नूनिस द कुंज कोंदीद सां व्हिसेती याने आपला वकील पाठवून तह केला. यानुसार विजरईने आपल्या आश्रयास असलेल्या सर्व जमीनदारांना गोव्यातून हद्दपार केले. फिरंग्यांना गाफील ठेवण्यासाठी महाराजही माघारी फिरले व डिचोलीस मुक्कामी राहिले. सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या आसपास त्यांचा तळ पडला होता. या मैदानावर सैनिक काही शारीरिक कसरती तथा युद्धाभ्यास करत असत, असे आता तेथील स्थानिक अभिमानाने सांगतात.याच वेळी महाराजांचे लक्ष एका पुण्यपवित्र, रम्य अन् प्राचीन शिवालयाकडे गेले. या शिवाचे त्या शिवावर प्रेम तर अगणित होतेच. निष्ठा तर अपरंपार! गोव्यातील पोर्तुगिजांच्या प्रदेशाला लागून असलेल्या भतग्राम महालाचे सरदेसाई विजापूरचे मांडलिक होते. पण, इ.स. १६६४ साली मराठ्यांनी हा प्रदेश जिंकल्यामुळे आता हे सप्तकोटीश्वराचे क्षेत्र हिंदवी स्वराज्यात होते. सरदेसाई नारायण शेणवी सूर्यराव यांनी इस १५४९ साली दिवाडी बेटाच्या उत्तरेस पंचगंगेच्या (पंचनदीच्या) डाव्या तीरावर या शिवलिंगाची स्थापना केली व त्या स्थानास हिंदळे असे संबोधित केले. तरीही पूर्वीचेच नावाजलेल्या क्षेत्राचे नाव चालू ठेवण्यासाठी नवे नार्वे, कोकण नार्वे, किंवा नार्वे असे ओळखले जाऊ लागले, मूळचे हिंदळे गाव एका लहानशा भागापुरतेच मर्यादित राहिले.






शिवरायांचे लक्ष गोवा जिंकून पोर्तुगिजांचे उच्चाटन करण्यावर होते. पण, पोर्तुगिजांच्या आरमारासोबत टक्कर देऊन आपला हेतू साध्य करणे सोपे नाही, याचीही जाणीव होतीच. त्यासाठी एखादे राजकारण करणेच सोपे होते.गोवे शहर म्हणजे आताचे जुने गोवे हे सप्तकोटीश्वराच्या देवालयापासून दावजेमार्गे एका तासापेक्षाही कमी अंतरावर असल्यामुळे तेथेच राहून तयारी करावी म्हणजे पोर्तुगिजांना आपल्या हेतूचा किंवा हालचालींचा संशयही येणार नाही. महाराजांनी यासाठी श्री सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले.श्री सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार चालू असतानाच महाराजांनी आपल्या सैनिकांपैकी निवडक ४०० ते ५०० सैनिकांना गुप्तपणे गोव्यात म्हणजेच आताच्या ओल्ड गोवा परिसरात धाडले. ही संख्या हजारभर होताच, एखाद्या रात्री उठाव करून एखादा दरवाजा ताब्यात घ्यायचा. जास्तीत जास्त सैन्य आत घेऊन एका झडपेतच गोवा काबीज करायचा. साळसूदपणे मराठा सैनिक गोव्यात शिरून त्यांनी पोर्तुगीज राज्यव्यवस्था पोखरली होती. पण, स्थानिक बोलीभाषेतील फरकामुळे व्हाईसरॉयच्या खबर्‍यांच्या लक्षात आले. व्हाईसरॉयने महाराजांच्या वकिलाला बोलावून तीन मुस्काटात लगावल्या व त्याला गोव्याबाहेर हाकलून दिले. ५०० सैनिकांना जेरबंद करून धूर्तपणे महाराजांच्या स्वाधीन केले आणि हा एक डाव फसला. महाराजांनी मोठ्या सैन्यानिशी लगेच गोव्यावर स्वारी करण्याचे योजले. पण, गोष्ट फार अवघड होती. मराठ्यांच्या फसलेल्या डावाचा कावा लक्षात घेऊन त्या धूर्त व्हाईसरॉयने तोफा, सैन्य व आरमार सज्ज करून गोव्याचा कडक बंदोबस्त केला. आपल्या लोकांना कायमचे बंधमुक्त करण्याची धडपड सध्यातरी अयशस्वी ठरली. ही सल मनात ठेवून महाराजांनी तूर्तास तरी गोवा मोहीम आटोपती घेतली. (क्रमशः)






Powered By Sangraha 9.0