‘फकिरा’ कादंबरीतील सामाजिक ताणाबाणा

    23-Oct-2021
Total Views |

fakira 2_1  H x



मराठी माणसाच्या मनावर गारुड करणारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची अप्रतिम कादंबरी म्हणजे ‘फकिरा!’ कादंबरीची पहिली आवृत्ती १९५९ साली आली होती आणि आज ६० वर्षांनंतरही फकिरा वाचण्याची मराठी माणसाची ओढ कमी झालेली नाही. गेल्या ६० वर्षांत ‘फकिरा’ कादंबरीच्या तब्बल सव्वा लाख प्रतींची विक्री झाली असून मागणी अजिबात कमी झालेली नाही. त्यानिमित्ताने सामाजिक ताणाबाणा जपणार्‍या याच कादंबरीचे रसग्रहण...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी बहुतेक सर्व मराठी वाचकांनी वाचलेली असते. वाचली नसेल तर निदान त्या कादंबरीविषयी थोडी-बहूत माहिती तरी असतेच. अण्णाभाऊंनी आपली ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली होती आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही या कादंबरीला मिळाला होता. याच कादंबरीवर आधारित ‘फकिरा’ हा चित्रपटही निर्माण झाला होता आणि त्यात स्वतः अण्णाभाऊंनी सावळ्या मांगाची भूमिका साकारली होती. या कादंबरीला वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली होती.स्वातंत्र्यपूर्व काळात वाटेगाव आणि आसपासच्या परिसरात घडलेल्या रोमहर्षक कालखंडाला अण्णाभाऊंनी कादंबरीतून शब्दबद्ध केले आहे. “ही कांदबरी म्हणजे कल्पनाविलास नाही. कारण, ‘फकिरा’ने दिलेल्या सुरती नाण्यातून खरेदी केलेली बाळगुटी मी खाल्ली आहे. ‘फकिरा’च्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे,” असे अण्णाभाऊंनी नमूद करून ठेवले आहे. याचा अर्थ ‘फकिरा’ कादंबरीच्या पटावर दिसणारी प्रत्येक व्यक्तिरेखा वास्तवातील आहे. ‘फकिरा’ कादंबरीतून दिसणारा समाज आणि सामाजिक ताणाबाणा वास्तवातील आहे. सामाजिक जीवनात दिसणारा संघर्ष, जातभावना यांचे चित्रण या कादंबरीत होताना दिसते. त्याहीपेक्षा जोरकसपणे सामाजिक सलोखा, परस्परावरचा विश्वास, दुःख-दैन्य आणि निसर्गनिर्मित संकटातून बाहेर पडण्यासाठी जात विसरून एकमेकांना केलेली मदत, माणूसपणा जपण्याचा आटोकाट प्रयत्न अण्णाभाऊंनी साकार केला आहे आणि त्यामुळे असे समाजवास्तव त्या काळात अस्तित्वात होते, हे नाकारता येत नाही.




‘फकिरा’ कादंबरीचे कथानक थोडक्यात सांगायचे, तर गावाच्या इभ्रतीसाठी राणोजी मांग शिगावची जोगणी वाटेगावात आणतो आणि वाटेगावच्या हद्दीत मारला जातो. राणोजीच्या बलिदानाने वाटेगावात जत्रा सुरू होते. गावात चैतन्य येते. हे चैतन्य आणि इभ्रत टिकवण्यासाठी वाटेगावकर प्रयत्नशील राहतात. शिगावही जोगणी परत मिळवण्यासाठी टपून असते. दोन गावातला हा इभ्रतीचा संघर्ष अनेक वर्षं चालू राहतो. राणोजीचा मुलगा फकिरा मोठा होतो आणि जोगणीच्या रक्षणासाठी हाती तलवार घेऊन जत्रेत सामील होतो. गुन्हेगार म्हणून तिहेरी हजेरीची सक्ती मांगवाड्यावर पर्यायाने फकिरावर होते. पुढे गावात दुष्काळ पडतो. मांगवाडा, महारवाडा जगवण्यासाठी फकिरा माळवाडीचा मठ लुटतो. जोगणीवरून डूख धरून असलेले फकिराचे विरोधक इंग्रजांशी संगनमत करतात. फकिरा इंग्रजांचा खजिना लुटतो. फकिरा शरण यावा म्हणून इंग्रज सार्‍या मांगवाड्याला ओलीस ठेवतात.आपल्या माणसांच्या मुक्ततेसाठी फकिरा शस्त्र खाली ठेवतो. हे झाले ‘फकिरा’ कादंबरीचे कथानक. या कादंबरीच्या रूपाने अण्णाभाऊंनी मांग समाजातील उमदा नायक रेखाटला आहे.



अण्णाभाऊंच्या या कादंबरीचे मूल्यमापन करताना अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या पद्धतीने विवेचन केले आहे. बहुतेकांनी या कादंबरीतून अण्णाभाऊंनी मार्क्सचा विचार प्रसारित केला, अशी भूमिका मांडली. उपेक्षित, वंचित समूहाला बळ मिळाले पाहिजे आणि त्यासाठी संघर्ष अटळ आहे, तो केला किंवा घडवून आणला पाहिजे, अशी धारणा समोर ठेवून मार्क्सवाद मांडला जातो. अण्णाभाऊ जरी या चळवळीशी जोडले गेले होते, तरी या कादंबरीत तोच विचार मांडला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण, फकिराची बंडखोरी हा त्याचा स्वभाव नाही. परिस्थितीने त्याला बंडखोर बनवले आहे. तो कायम संघर्षाचा पवित्रा घेऊन उभा नाही, तर परिस्थिती बदलण्याचा शेवटचा पर्याय म्हणून त्याने शस्त्र हाती घेतले आहे. त्याचा झगडा परिस्थितीशी आहे आणि झगडा संपावा, वैर, दुष्टावा समाप्त व्हावा, ही त्याची धारणा नाही. फकिरा जरी बंडखोर असला तरी तो वर्गविग्रहाची भूमिका घेत नाही किंवा जातजाणीव प्रबळ करत नाही. कारण, राणोजीची आणि फकिराची पाठराखण करण्यात विष्णुपंत कुलकर्णी व शंकर पाटील आघाडीवर आहेत, तर बापू खोताच्या बाजूने गजा माळी, रामज्या लोहार उभे आहेत. त्यामुळे ‘फकिरा’ कादंबरीतील संघर्ष जातकेंद्री नाही. हा संघर्ष दोन गावांतील असून, परंपरा आणि गावची इभ्रत या केंद्राभोवती फिरणारा आहे. जोगणीची मालकी व रक्षण हा स्वाभिमानाचा विषय सोडला, तर कादंबरीत माणूस जगला पाहिजे, ही भूमिका अधोरेखित केलेली आहे. फकिराच्या लढ्याचे केंद्रस्थान माणूस आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टीची परिपूर्ती झाली पाहिजे, हीच त्यांची माफक अपेक्षा आहे.



मुळात ‘फकिरा’ कादंबरीचा सारा पटच माणूसकेंद्री आहे. माणूस म्हटला की, गुण-अवगुण, नैतिकता-अनैतिकता यांच्या अटळ संघर्षाशी सामना करावा लागतोच. अण्णाभाऊंनी हा संघर्ष साकारताना माणूसपण जपले आहे. गावाच्या इभ्रतीसाठी बलिदान देणार्‍या राणोजीची बायको मोलमजुरीला जाते, हे जेव्हा पाटलाला कळते, तेव्हा तो धान्याने भरलेली गाडी घेऊन येतो. अण्णाभाऊंनी हा प्रसंग खूप हळव्या शैलीत रेखाटला आहे. ते लिहितात,“मी आताच सोनाटकीतनं परत आलो शिंगरू न्यायला ठीक, दौलती, पण हे बरं नाही,” पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला.“राधा मजुरी करीत आहे, हे जर कळालं, तर तो राणोजी परत खाली येऊन माझं शिर मारील. हिला रोजगाराला कधीच पाठवू नको. तुला दाणे हवेत, हे घे,” असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली लोटू लागला. एक, दोन, तीन... ही सारी गाडी इथं रिकामी करतो की काय, असं वाटून दौलती म्हणाला, “गावकर, पुरं, पुरं.”




“पुरं? तर ऐक. राधाला कष्ट देऊ नको.तिच्या कुंकवाने डोंगराएवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्याच शब्दावर भोगलं. मी पाटील! मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं. इथं या पांढरीत जत्रा भरावी, गावावर उपकार करावा म्हणून तो दोन पोरं आणि ही राधा मागं टाकून गेला. त्याच्या उपकारांची फेड अशी झाली, तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेरावं, तेच उगवतं!”“पाटील, असं कसं म्हणता?”“बरोबर म्हणत आहे मी. दाण्याची पोती देणे आणि शिर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शिरं पिकत नाहीत, दौलती!खोताशी झगडत ज्याने प्राण दिला, त्याची ही अब्रू आहे. ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही.”राणोजीच्या पत्नीला राधेला आलेले वैधव्य गावाच्या प्रतिष्ठेशी जोडलेले असून, तिच्या जगण्याची तजवीज आपण केली पाहिजे, ही माणूसकेंद्री संवेदना अण्णाभाऊ साठे मांडताना मांग-मराठा या जातीच्या पलीकडे जातात. केवळ माणूस आणि माणुसकी हेच त्यांचे ऊर्जाकेंद्र होते. दुष्काळ आणि रोगराईमुळे माणसं टाचा घासून मरू लागतात. काहीतरी करून माणसं जगवली पाहिजेत, हा विचार मनाशी घेऊन फकिरा विष्णुपंत कुलकर्णींना भेटतो. तेव्हा माणसाच्या जगण्याचा विषय आणि परिस्थितीतून निर्माण झालेली हताशा यांचे प्रत्ययकारी चित्रण करताना अण्णाभाऊ ‘काहीही करा; पण जगा’ हा मंत्र देताना दिसतात. अण्णाभाऊ साठेंनी तो प्रसंग पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केला आहे.



मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललं आहे? त्यांच्या करारी नेत्रात चिंतेचा भाव तरळला. देवळीत जळणार्‍या निरंजनाकडे पाहत फकिरा म्हणाला, “मांगा-म्हारांचा वंश उरत न्हाय, आबा!”

“आतापर्यंत किती माणसं दगावली?”


“चार दिसांत बारीक-मोठी ईस,” फकिरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चडफडत गेले.

“मग तुझं काय म्हणणं आहे?” पंतांनी पुन्हा प्रश्न केला.


फकिरा ओठांवरून कोरडी जीभ फिरवीत म्हणाला,


 “भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्यानं ऐकवेना. ढेकळावाणी काळीज इरगाळंत माझं,” फकिराच्या पापणीत देवळीतील त्या निरांजनाच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्याने गरकन मान फिरवून आसू दडवले.


“तसं नाही,” पंत समजावणीच्या सुरात म्हणाले.


“धीरानं घ्यायला पाहिजे आता, फकिरा.”


“आबा,” फकिरा काळजातून कण्हत बोलू लागला, “मांग-महार भोपळीचा नि करडूचा पाला खाऊन जगतोय. पण जमंना, नुसती उपासमार असती, तर पोट बांधून काळीज शाबूत ठिवलं असतं. पण, या साथीने कडेलोट केलाय आमचा.”




या संवादातून व निवेदनातून फकिराचा पंतांवरचा विश्वास व्यक्त होतो. दुष्काळ आणि साथीच्या रोगात मांगाची माणसं पटापट मरताना पंत कोणता उपाय सांगणार?पंतांनी ‘काहीही करा; पण जगा’ असा सल्ला फकिराला दिला. कारण दुष्काळाच्या दाढेत गाव असल्याची अधिकृत माहिती पंतांनी सरकारला कळवलेली होती. पण, सरकारने काहीही केले नव्हतं. पंत फक्त मृतांच्या नोंदीचे काम करणारे सरकारी प्रतिनिधी उरले होते, म्हणून काहीही करून जगण्याचा सल्ला त्यांनी फकिराला दिला. “उकिरडाही पांग फेडतो, तुम्ही तर माणसं आहात,” असे सांगत पंत फकिराला मरण्यापेक्षा जगणे महत्त्वाचे असल्याचा संदेश देतात. ‘जगण्यासाठी काहीही करा’ या पंतांच्या आदेशाला मानून फकिरा माळवाडीचा मठ लुटतो. मठात भरलेल्या धान्याच्या कणगी फोडून ती लूट गावात आणतो.ही लूट मांगवाडा जगवण्यासाठी होती. हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. ‘माणूस जगला पाहिजे’ या अटळ सत्यासाठी होती. माणसं जगली तर गाव जगेल आणि जगला तर गावाची इभ्रत जपली जाईल, हा विचार या लुटीमागे होता. माळवाडीच्या मठातून लुटून आणलेले धान्य सार्‍या मांग-महारवाड्यात वाटून झाल्यावरही काही धान्य शिल्लक राहिले. ते मापानं वाटता येत नाही, म्हणून मुरा फकिराला विचारतो, “दाजी ह्ये दानं कसं वाटावं?” फकिरा म्हणाला, “एक दाना गैर वाटू नगं. डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा.” या प्रसंगातून अण्णाभाऊ फकिराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. केवळ ‘मी आणि माझे कुटुंब’ या संकुचित विचारापेक्षा ‘आपण आणि आपला समाज’ अशी व्यापक भूमिका घेणारा नायक ते उभा करतात. ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ अशी जनरीत इथल्या मातीत खूप खोलवर रुजली आहे. फकिराची ही कृती त्याची साक्ष देते.




अण्णाभाऊ माणसांचे साहित्य लिहितात. त्यामुळे शील, नीती ही तत्त्वं त्यांच्या साहित्यातून विपुल प्रमाणात आढळून येतात. ‘फकिरा’ कादंबरीतही असे प्रसंग अण्णाभाऊ साठे यांनी रेखाटले आहेत.बेडसगावचा खजिना लुटण्यासाठी गेल्यावर ज्या खोलीत खजिना आहे, त्या खोलीचे रक्षण न करता रघू बामन दुसर्‍याच खोलीसमोर बंदूक घेऊन उभा ठाकल्यामुळे फकिराला आश्चर्य वाटते. तेव्हा फकिरा त्या बामनाला विचारतो, “तू तिथं का उभा?” बामन म्हणतो, “या खोलीत माझी बायको, आई, भावजय आणि दोन अविवाहित मुली आहेत.” तेव्हा फकिरा म्हणतो, “बामना, तूच तेवढा बायका-पोरांचा धनी हाईस नि आम्ही काय जोगतं पाळल्याती? चल उघड ते दार...” दार उघडल्याबरोबर रघू बामनाची बायको समोर येते आणि फकिराला म्हणते, “बाबा, हा वाडा धुऊन घेऊन जा. पण, या दोन मुलींची लग्न झालेली नाहीत. मी पदर पसरून भीक मागते आमची अब्रू....,” असं म्हणून सर्व स्त्रिया आपल्या अंगावरचे दागिने काढून देऊ लागल्या. तेव्हा फकिरा म्हणतो, “आई थांबा! मी इंग्रजाचा खजिना न्हेणार हाय. तुमास्नी ओरबडाय मी आलो न्हाय. कारन, आब्रू खाऊन उपाशी मानसं जगत नसत्यात.जावा, आपल्या घरात बसा.” फकिराची कृती भारतीय संस्कार आणि नीतिमत्तेची साक्ष देते. हाच संस्कार आणि नीती अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबर्‍यातून विपुल प्रमाणात पाहण्यास मिळते.




‘फकिरा’ कादंबरीचा पट खूप मोठा आहे. त्याला सत्तू भोसलेचे उपकथानक आहे. मराठा समाजातील हा नायक जेव्हा अडचणीत सापडतो, तेव्हा तो फकिराला मदतीसाठी साद देतो. फकिरा मदतीला पोहोचतो. तेव्हा सत्तू म्हणतो, “नाईक, तुम्ही आलात म्हणून सत्तू वाचला.” तेव्हा फकिरा म्हणतो, “दगडाला दगडाची गरज लागती अन् मी तर माणूस हाय.” अण्णाभाऊ अशा संवादातून माणुसकी उजागर करण्याचा प्रयत्न करतात. सत्तू काय? किंवा फकिरा काय? दोघांनीही अन्याय-अत्याचाराविरुद्ध शस्त्र हाती घेतले असले, तरी त्यांच्या समोर शत्रू म्हणून कोण उभे आहे? त्यांच्या विरोधात कोण कारवाया करते आहे? यांचा विचार केला तर फकिरासमोर खोत आणि सत्तूसमोर चौघुला उभा आहे. या वैराला जातीय रंग देता येत नाही. खोताला जोगणी परत हवी म्हणून तो इरेला पेटला आहे. तर चौघुल्याला आपल्या बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी ते इंग्रजाशी हात मिळवणी करत आहेत. फकिरा आणि सत्तूला साथसोबत करणारे सर्व जातीचे आहेत. हे लक्षात घेण्याची बाब आहे.फकिराच्या रूपाने अण्णाभाऊ साठेंनी सामाजिक ताणाबाणाच उलगडून दाखवला आहे. परस्पर पूरकता आणि परस्परावरील दृढविश्वास या सामाजिक ताणाबाण्याची आधारशीला असतात. समाज पर्यायाने माणसं एकमेकांशी कसा व्यवहार करतात त्यावर समाजाचे स्वास्थ अवलंबून असते. अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीतून दिसणारे समाजवास्तव हे केवळ परस्पर पूरक नाही, तर परस्पराविषयी वाटणारा कळवळा आणि आपलेपणांची जाणीव करून देणारे आहे आणि हेच या कादंबरीचे बलस्थान आहे.कादंबरीत दिसणारा सामाजिक कळवळासुद्धा या देशातील परंपरा आणि आध्यात्मिक जाणिवांतून निर्माण झाला आहे. व्यक्तिकेंद्री विचार न करता समाजकेंद्री विचार आणि त्यातून समाजाचे उत्थान अशा क्रमाने अण्णाभाऊ साठे ‘फकिरा’ची मांडणी करतात.एकूणच ‘फकिरा’ कादंबरीच्या रूपाने अण्णाभाऊंनी मांग जातीचा उमदा नायक साकार केला. त्याचबरोबर त्या काळातील दुष्काळाचे, रोगराईचे, एकात्म समाजाचे, सामाजिक कळवळ्याचे, परस्परावरील विश्वासाचे आणि गावची श्रद्धा, गावचा गौरव टिकवण्यासाठी प्राण पणाला लावून लढणार्‍या माणसांची कथा सांगितली आहे. ‘फकिरा’ प्रकाशित होऊन आता ६० वर्षांचा काळ उलटला आहे. कादंबरीतून मांडलेले समाजजीवन आणि परस्परपूरकता आज आपण अनुभवतो का? तसा अनुभव येत नसेल तर आपण काय चूक केली, हे शोधायला हवे.




- रवींद्र गोळे