ग्रामीण भावविश्व जिवंत करणारे दमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2021
Total Views |

book 2_1  H x W



अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष, आपल्या कथांतून ग्रामीण भावविश्व जिवंत करणारे प्रख्यात ज्येष्ठ विनोदी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार दत्ताराम मारुती उर्फ द. मा. मिरासदार तथा दादा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वार्धक्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीस आदरांजली देणारी मिरासदारी लेखमाला प्रकाशित करत आहोत. त्यातील आजचा तिसरा लेख...




द. मा. मिरासदार म्हणजेच दत्ताराम मारुती मिरासदार. त्यांचा जन्म अकलूजला झाला, अशी त्यांच्याबद्दलची व्यक्तिगत माहिती आपल्याला आता सगळीकडे उपलब्ध आहे. त्यांनी दैनिकांत आणि लेखनाच्या क्षेत्रात केलेली मुशाफिरीही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण, त्याच वेळी आपल्या सगळ्यांना ‘त्यांनी एक ‘मिरासदारी’ ठसा स्वतःच्या प्रत्येक कामावर उमटवला’, हेही माहिती आहे. हे वाक्य फार बुकीश असलं तरी ते खरं आहे. म्हणूनच त्यांच्या कामाचा प्रभाव आमच्या पिढीवर पडला नसेल, असं कसं होईल? अर्थात, ते आमच्याही पिढीला भावले. त्यांच्या साहित्यातल्या अनेक गोष्टी भावत, पटत गेल्या आणि आठवणीच्या कप्प्यात कायमच्या बंदिस्त झाल्या.



खरं तर द. मा. मिरासदार यांच्या साहित्यातलं पहिलं पात्र आमच्या पिढीला भेटलं, ते दूरदर्शनवरच्या ‘सोनपावलं’ या मालिकेतल्या ‘व्यंकूची शिकवणी’ या भागात. मोठ्या वयाचा विद्यार्थी आणि त्याचे मास्तर, त्यांच्यातला खुमासदारपणा आणि प्रचलित शिक्षक-विद्यार्थी नातं नाकारून त्या नात्याला मिळालेलं विनोदी वळण पाहताना हसून हसून पुरेवाट झाली होती, तेव्हा आणि ते हसणं कायमचं लक्षात राहिलं. दमांच्या कथेचा विषय निघाला की, व्यंकू आणि मास्तर हे न विसरता येण्याजोगं मिश्रण, या पात्रांच्या जीवंतपणामुळे मनात घर करून आहे. अर्थात, त्यांच्या कथेतील इतर खुसखुशीत आणि हरहुन्नरी पात्रही हळूहळू ओळखीची होत गेली. कधी ती सिनेमातून आमच्यापर्यंत पोहोचली आणि मग ती पोहोचताना नकळतच इतर पात्र कशी असतील, अशी एक उत्सुकता दाटत गेली. ती दाटलेली असतानाच ‘गप्पागोष्टी’, ‘गंमतगोष्टी’, ‘हसणावळ’, ‘माकडमेवा’, ‘गुदगुल्या’, ‘चकाट्या’, ‘ताजवा’, ‘भोजनभाऊ’, ‘माझ्या बापाची पेंड’, ‘विरंगुळा’, ‘भुताचा जन्म’, ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या आणि यांसारख्या २४  कथासंग्रहातून एक-एक इरसाल नमुने भेटत गेले. त्यातूनच त्यांच्या कथांची काही वैशिष्ट्यं मनात साठत गेली आणि पात्रांची नानाविध रूपं समोर येत गेली.



मूलतः दमांच्या कथा या ग्रामीण भावविश्व मांडणार्‍या आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगती, त्यातला जगण्याचा बाज, अतिशयोक्तीयुक्त बडेजाव करण्याची वृत्ती, माणसांमधल्या नानाविध ऊर्मी त्यांच्या कथेत आहेत आणि हे सगळं मांडायला तितकीच सक्षम पात्रंही आहेत. हे सगळं मांडण्यासाठी येणारी विनोदी, खुमासदार शैली वाचकांना हसवत ठेवणारी, सतत कथेची मजा घ्यायला लावणारी आहे. व्यक्तिचित्र उभं करण्याची दमांची हातोटीही विलक्षण आहे. त्यांच्या कथेमध्ये येणारी वातावरणनिर्मिती, घटना-प्रसंग, पात्रचित्रण आणि कथानकाला साजेशी असणारी आहे, अधिक खुलवणारी आहे. त्यांच्या कथांचा आणखीन एक विशेष म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. घटना- प्रसंग हुबेहूब उभे करणं, त्या-त्या पात्राला जीवंत करणं आणि वाचकांना त्यात खिळवून ठेवणं, त्यांना फारच सहजसाध्य होतं. त्यांच्या कथेतली व्यंकू, पाटील, नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, ज्ञानू वाघमोडे अशी व्यक्तिचित्रं जेव्हा वाचनातून समोर येतात, तेव्हा ती फारच ओळखीची वाटत राहतात. काही वेळेस वाह्यातपणा करणारी, तर काही वेळेस खट्याळपणे समोरच्या व्यक्तीला टोकणारी त्यांची पात्रं कथाकथन ऐकताना श्रोत्यांना खळखळून हसवतात, अंतर्मुख करतात आणि सहजपणे माणसातल्या विक्षिप्तपणाला स्वीकारायला भाग पाडतात. खरं तर त्यांच्या कथांनी शहरात राहणार्‍या लोकांना ग्रामीण विनोदाची ओळख करून दिली. त्यांच्या कथेतून जेव्हा दैनंदिन ग्रामीण जीवनात घडणारा विनोद लक्षात येतो, तेव्हा तर या कथा तुमच्या-आमच्या सगळ्यांच्या आहेत, हे लक्षात येत जातं. भाषा बदलली तरी विनोद तोच आणि जगणं तसंच. फरक असेल तो फक्त संदर्भांचा, हे कथा वाचनाच्या ओघात कळत जाणारं वास्तव आहे.
दमांच्या कथेत विविध वयाची पुरुष मंडळी लीलया वावरत असतात. त्या प्रत्येक वयातल्या पुरुषाचं भावविश्व या कथेत येत असतानाच त्यातून अस्सल ग्रामीण जीवनानुभव समोर येत राहतो आणि तो येत असतानाच या कथांमधली भाषा वाचकांना हसवतानाच चिमटे काढत राहते. आपण तर नाही ना असं वागत? असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत राहते आणि आपल्याला जागं ठेवते. अस्सल ग्रामीण जीवनातील विसंगती दिसत असतानाच, ग्रामीण जीवनातली एकमेकांप्रति असणारी आपुलकी, काळजी आणि प्रेमही तितक्याच ममत्वाने आपल्यासमोर येते. म्हणूनच ‘नव्याणव बादची एक सफर’मधल्या नानाचं लग्न न होणं आणि त्या पार्श्वभूमीवर त्याच्या मनातली सल समोर येताना त्यांच्याबद्दलची एक करुणा मनात दाटून राहते आणि आजच्या काळात तर असे कितीतरी नाना आपल्या आजूबाजूला आहेत, याचं भानही येतं. गावातल्या पस्तिशी पार केलेल्या आणि एकट्या पडलेल्या तरुणाचं विनोदी चित्रही क्षणभर आपल्याला वाचक म्हणून व्याकूळ करतं, तर ‘व्यंकूची शिकवणी’मधल्या व्यंकूची कथा संपताना होणारी फजिती वाचकांना आनंद देऊन जाते आणि मुलांनी त्या-त्या वयात शिकलंच पाहिजे, असा मूल्यसंस्कारही आपल्या मनावर करून जाते.



समाजातली विसंगती या कथेत आहेच. पण, त्याच बरोबरीने ग्रामीण जीवनातल्या समस्या, तिथले प्रश्न, तिथला तिरकसपणा, तिथली आपुलकी, तिथल्या समजुती, रूढी परंपराही या कथेतून वाचायला मिळतात आणि वाचकांना अनुभवसमृद्ध झाल्याचं समाधानही मिळतं.खरं तर दमांच्या कथा वाचत असताना फक्त ‘विनोदी कथा’ म्हणून याकडे पाहता येत नाही. तर या विनोदाच्या आड जगण्याचे अनेक पदर या कथांमध्ये दडलेले आहेत. तिथे शिक्षणक्षेत्रातली विसंगती येते. तिथे माणसाच्या स्वभावाचे इरसाल नमुने येतात. तिथे माणसाच्या आयुष्यातले अनेक गंभीर प्रसंग येतात आणि त्याच बरोबरीने गप्पांचा फडही येतो. द. मा. मिरासदार यांच्या कथा विनोदी कथा म्हणून सरसकट वाचल्या जात असल्या, तरी त्यात एक कारुण्याची झाक येते. कथा वाचताना विनोद मनात तरंगत असला तरी त्यातून निर्माण होणारं कारुण्य आपल्या आजूबाजूला घडणार्‍या तत्सम सगळ्या घटना-प्रसंगांबद्दल विचार करायला भाग पाडते.दमांच्या गंभीर प्रवृत्तीच्या कथाही तितक्याच हृदय हेलावणार्‍या आहेत. त्यातले माणसामाणसांचे स्वभाव, प्रवृत्ती आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण मानवतावादी आहे, हेच लक्षात घ्यायला लावणार्‍या आहेत. ‘गवत’सारख्या कथेत त्यांनी बाबू महाराचं मांडलेलं दु:ख आणि त्यातलं कारुण्य वाचकांना हेलावून सोडतं; ‘स्पर्श’सारख्या कथेतून त्यांनी कौटुंबिक वास्तवावर, आईच्या मरणानंतर तिच्या चिंतांनी व्यापलेल्या मनावर जो प्रकाश टाकला आहे, ते चित्रण मुळातून वाचताना वाचकांच्या मनालाही घरं पडतात.




त्यांच्या कथांमधील सखोल वातावरणनिर्मिती, पात्रचित्रणातील विस्तृतपणा आणि जीवंत व्यक्तिचित्र कथा वाचत असतानाच वाचकांमध्ये मुरायला लागतात. म्हणजे होतं काय की, त्या कथा वाचल्या की, साधारण आपणही आपल्या समोर येणार्‍या माणसांचं अगदी बारकाईने निरीक्षण करायला लागतो. त्याचे कपडे, त्याचं बसणं-उठणं-चालणं, बोलण्याची ढब आणि त्यातून येणारी त्या-त्या माणसाची सगळी वैशिष्ट्यं आपण हेरतो आणि एकाक्षणी असं लक्षात येतं की, ‘अरे, हे तर दमांच्या कथेमध्ये असलेलं अमुक अमुक पात्रच आहे की....’ आणि खरं सांगायचं तर निरीक्षणाचा हाच वारसा आपण वाचक म्हणून त्यांच्या कथांमधून उचलतो आणि त्यांची कथा पुस्तकात वाचून संपते आणि वाचकांच्या मनात सुरू होते.



आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कथा आपल्याला त्यांच्या असण्याचा दिलासा देत आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मनात दमा कायम तसेच आहेत, त्यांच्या कथेतल्या पात्रांनी घडवून आणलेल्या विनोदासारखे...




- डॉ. अर्चना कुडतरकर







@@AUTHORINFO_V1@@