‘ही’ मानसिकता कधी मरेल?

23 Oct 2021 12:46:49

america_1  H x
 
 
 
ती ट्रेनमध्ये चढली. तिच्या पाठोपाठ तोही ट्रेनमध्ये चढला. तिच्या बाजूच्या सीटवरच बसला. दोघांचं जुजबी बोलणं सुरू झाले. अचानक तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने निकराचा प्रयत्न केला. ४० मिनिटे हे सगळे सुरू होते. शेवटी त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. संताप आणि दुःखाची गोष्ट त्यावेळी तो नराधम किंवा पीडिता एकटी नव्हती. तर आजूबाजूला मोजून दोन डझन प्रवासी होते. पण, कुणीही त्या पीडितेच्या मदतीला आले नाही. कुणीही त्या गुन्हेगाराला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. या ४० मिनिटांदरम्यान अनेक स्थानकं आली. प्रवासी उतरले. नव्याने प्रवासी डब्यात चढले. मात्र, तरीही त्या महिलेवर होणारा अत्याचार त्यांनी निमूटपणे पाहिला. उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ किंवा लाईव्हही केले असावे. ही घटना आहे अमेरिकेच्या फिलिडेल्फिया भागातली. व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि हक्काचा डंका पिटणाऱ्या अमेरिकेमध्ये हे २० ऑक्टोबर रोजी घडले. बलात्कार करणारा गुन्हेगार फिस्टन नीगॉय याला पोलिसांनी पकडले. पोलिसांना दिलेल्या जबानीत त्याने म्हटले की, “महिलेशी केव्हा तरी एकदा त्याची ओळख झाली होती. तिच्याशी बोलत असताना त्याला वाटले की, त्याला बलात्कार करण्यासाठी उद्युक्त करत आहे.” पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले, तेव्हा लक्षात आले की, महिला या गुन्हेगाराला प्रतिकार करत होती.
 
 
 
अमेरिकेतील समाजमानसिकता कुठे चालली आहे? भारतामध्ये सामाजिक रीतिरिवाज आणि नियमांचा पगडा आजही समाज मानसिकतेवर आहे. त्यामुळे आपल्या देशात परस्पर अनोळखी गटासमोर एखाद्या महिलेवर अत्याचार करताना गुन्हेगार दचकतोच. पण, अमेरिकेत ट्रेनमध्ये लोकांनी उघड्या डोळ्यांनी ही घटना पाहिली. गुन्हेगाराला विरोध करायला भीती वाटू शकते. मात्र, ते पोलिसांनी दिलेल्या सुविधांचा वापर तर करू शकत होते. त्याबाबतही लोक उदासीन कसे? की, मरू दे, आपल्याला काय करायचे? ही मानसिकता तिथल्या समाजात रुजूनच गेली आहे. लोकांच्या मनातली आणि डोळ्यातली शरम, लाज मेली असेलही कदाचित; पण एका महिलेवर होणारा अत्याचार इतक्या शांतपणे या लोकांनी पाहिला. इथे माणुसकी मेल्यातच जमा झाली का?
 
 
 
अमेरिकेच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर पकिस्तानमध्ये जुलै २०२१ला घडलेली घटना पाहूया. पाकिस्तानी अमेरिकन वंशाच्या जहिर जाफर याने नुर मुकादम या तरुणीवर बलात्कार केला. नंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या, मग तिचे शिर कापले, ही घटनाही भयंकरच. दक्षिण कोरिया आणि कझाकिस्तानमध्ये पाकिस्तानी राजदूत म्हणून महत्त्वाची जबाबदारी भूषविलेल्या महत्त्वाच्या व्यक्तीची नुर मुकादम मुलगी. नूरने जहिरशी संबंध ठेवण्यास नकार दिला, याचा राग येऊन जहिरने हा गुन्हा केला, असे जहिरचे म्हणणे. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये महिला सुरक्षिततेसाठी तालिबान्यांनी अफगाणी महिलांनाच सांगितले की, “घराबाहेर पडू नका. कारण तालिबान्यांना महिलांशी कसे वागावे याची माहिती नाही. त्यांनी तुमच्याशी दृष्कृत्य केले तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार.” इशारा स्पष्ट आहे की, महिलांनी घराबाहेर पडूच नये. त्यांनी चार भिंतीत तालिबान्यांच्या दहशतीमध्ये राहायचेे. असो. अमेरिका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशातल्या तीन घटना महिलावंरील अत्याचाराची साक्ष देतात. मात्र, तिन्ही ठिकाणी गुन्हेगारांनी गुन्हा घडण्यासाठी दोषी पीडित महिलेलाच ठरवले. अमेरिकेत ट्रेनमध्ये बलात्कार झाला, कारण गुन्हेगाराला पीडित महिलेच्या बोलण्यातून तिच्यावर बलात्कार करावासा वाटला. पाकिस्तानमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीचा क्रूर खून झाला. कारण, तिने गुन्हेगाराला प्रेमसंबंध किंवा विवाहास नकार दिला होता. त्या नकारामुळे रागाने म्हणे ते कृत्य केले. तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानी तर साधे आहेत. त्यामुळे महिलासंदर्भात काय केल्यावर त्याला अत्याचार म्हटले जाते, हे त्यांना माहिती नाही, असे खुद्द तालिबानी सरकारने जाहीर केले आहे. थोडक्यात, अत्याचार झाल्यावरही अत्याचार घडवून आणण्यास दुर्दैवी पीडित महिलाच कारणीभूत होती, हे गुन्हेगार सांगत सुटले आहेत.
 
 
या गुन्हेगारांना शासन मिळेलच; पण पीडित महिलेलाच अपराधी ठरवणाऱ्या त्यांच्या मानसिकतेचे काय? कोणत्याही गुन्ह्यात गुन्हेगारापेक्षा पीडितेचा दोष शोधणारी ही मानिसकता जगभरात सर्वत्रच थोड्याफार स्वरूपात दिसतेच दिसते. ही मानसिकता कधी मरेल?
 
 
 
Powered By Sangraha 9.0