लसीकरणाचे शतकोटी उड्डाण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2021
Total Views |

vaccination_1  
 
 
मागासलेली आरोग्य व्यवस्था, मर्यादित संसाधने असूनही भारताने १०० कोटी लसमात्रा देण्याची कामगिरी केली कशी, हा जगाच्या कुतुहलाचा विषय आहे. अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार, आरोग्य कर्मचारी आणि जनतेने प्रकट केलेल्या एकत्रित सामर्थ्यामुळेच देशाला १०० कोटी लसमात्रांचा टप्पा गाठता आला आणि या नव्या भारतावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त जगाकडे अन्य पर्याय नाही.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारताने बुधवारी कोरोनाविरोधी लसीकरण अभियानात १०० कोटी लसमात्रा देत ऐतिहासिक कामगिरी केली. १६ जानेवारी रोजी कोरोनाविरोधी लसीकरण अभियान सुरू केल्यानंतर केवळ नऊ महिन्यांतच भारताने १०० कोटी लसमात्रांचा विक्रम रचला. भारताच्या लसीकरण अभियानातील उत्कृष्ट कामगिरीने देशवासीयांनाही आनंद-अभिमान वाटत आहे, त्याची झलक समाज माध्यमांतून पाहायला मिळते. मात्र, भारताने पार केलेल्या १०० कोटी लसमात्रांच्या पल्ल्याने उर्वरित जग आश्चर्यचकित झाले आहे. कारण, भारताने विकसनशील देश असूनही जगातील प्रमुख विकसित देशांपेक्षाही लसीकरणात आघाडी मिळवली. जगातील सर्वाधिक वेगवान लसीकरण अभियानाद्वारे भारतात दर तासाला १५.६२ लाख, दर मिनिटाला २६ हजार, दर सेकंदाला ४३४ लसमात्रा देण्यात आल्या. भारतात दिवसाला सरासरी ३५ लाख, तर अमेरिकेत १३ लाख, जपानमध्ये सात लाख, जर्मनीत चार लाख, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी तीन लाख, कॅनडात दोन लाख आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक लाख लसमात्रा दिल्या गेल्या. इतकेच नव्हे, तर भारताने विविध खंडांनाही लसीकरण अभियानात मागे सोडले. एकट्या भारतात १०० कोटी लसमात्रा, तर युरोपात ८३ कोटी, उत्तर अमेरिकेत ६६ कोटी, दक्षिण अमेरिकेत ४८.१ कोटी, आफ्रिकेत १७.६ कोटी, ओशिनियात ४.१ कोटी लसमात्रा दिल्या गेल्या. परिणामी, विकसित देशांच्या तुलनेत मागासलेली आरोग्य व्यवस्था, मर्यादित संसाधने असूनही भारताने १०० कोटी लसमात्रा देण्याची कामगिरी केली कशी, हा त्यांच्या कुतुहलाचा विषय झाला आहे. अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार, आरोग्य कर्मचारी आणि जनतेने प्रकट केलेल्या एकत्रित सामर्थ्यामुळेच देशाला १०० कोटी लसमात्रांचा टप्पा गाठता आला आणि या नव्या भारतावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त जगाकडे अन्य पर्याय नाही.
 
 
दरम्यान, भारतावर कोरोना महासाथीचे संकट कोसळल्यापासूनच न्यूनगंडी टोळक्याने नकारात्मक मते मांडायला सुरुवात केली. केंद्र सरकार, भारतातील आरोग्य यंत्रणा आणि एकूणच सामाजिक परिस्थितीमुळे देश कोरोना संकटाचा सामना करूच शकत नाही, लसीकरण तर दूरचीच बात, अशी नैराश्यवादी विचारपेरणी त्यांनी चालवली. ‘पीपीई किट’ही तयार न होणाऱ्या आणि सर्वच बाबतीत मागासलेल्या भारतात कोरोनामुळे कोट्यवधींचा मृत्यू होईल, कोट्यवधींना रुग्णालये-रुग्णशय्या मिळणार नाही आणि त्यातूनच देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जाईल, देश दिवाळखोर होईल, असे अंदाजाचे पतंग उडवण्याचे काम या लोकांनी केले. तथपि, सारीकडे अंधार अंधार दिसणाऱ्या; पण त्या अंधारात पणती पेटवण्याचीही धमक नसलेल्या या टोळक्याकडे ना पंतप्रधानांनी, ना आरोग्य व्यवस्थेने, ना जनतेने लक्ष दिले. त्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा कोरोना संकटावरील उत्तर शोधण्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले. त्यातूनच पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोनाविरोधी ‘कोव्हिशिल्ड’ तर बंगळुरूतील ‘भारत बायोटेक’मध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे उत्पादन सुरू झाले. पण, लस तर मिळाली, त्यावरही विरोधी विचार करणाऱ्यांनी भारताची लोकसंख्या, भारताची आरोग्य यंत्रणा आणि भारताची लसउत्पादन क्षमता, भारताची पुरवठा साखळी वगैरेची आकडेमोड करून ‘अशक्यमेव जयते’चाच पाढा लावला. भारताला आपल्या पात्र लोकसंख्येला कोरोनाविरोधी लस टोचण्यासाठी कित्येक वर्षे लागतील, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कालावधीत लसीकरण कधीच पूर्ण होणार नाही. परिणामी, कोरोनाच्या एकामागून एक लाटा येतच जातील आणि देश उद्ध्वस्त होईल, अशी भाकिते त्यांनी केली. त्यांच्या जोडीला विविध राजकीय पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी भारतात उत्पादित लसींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले, तर काहींनी लसीत गाईच्या नवजात बछड्याचे रक्त असते, असे म्हणत भावना भडकावण्याचा उद्योगही केला. पण, तथाकथित बुद्धिवाद्यांचे शहाजोग गणित आणि विरोधकांच्या गोंधळ पसरवण्यासाठीच्या अफवाही तोंडावर आपटल्या. कारण, विरोधी विचारवंत, पक्षनेते अजूनही जुन्या भारतात रमणारे आहेत, नवा भारत काय काय करू शकतो, याचे त्यांना भानच नाही, तशी कल्पनाही त्यांना करता येत नाही. छोटी-छोटी माणसे अतुलनीय कामगिरी करू शकतात, तर त्याच माणसांनी तयार झालेला देशही असामान्य कामगिरी करू शकतो, यावर विरोधकांनी कधी विश्वासच ठेवला नाही. असाच प्रकार पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पुलवामात जवानांवर हल्ला केला, त्यावेळी झाला होता. भारत काय उत्तर देणार, असे प्रश्न विचारत भारत काहीही करू शकत नाहीचा राग आळवला गेला होता. पण, भारताने करून दाखवले, दहशतवाद्यांना घरात घुसून मारले आणि आता १०० कोटी लसमात्राही दिल्या. त्यामागे भारताच्या एकतेसह ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’चाही विचार आहे.
 
 
 
दरम्यान, गुरुवारी भारताने १०० कोटी लसमात्रा देण्याची कामगिरी केली, त्यात ७० कोटी, ८३ लाख, १८ हजार, ७०३ प्रथम लसमात्रा आणि २९ कोटी, १६ लाख, ९७ हजार, ११ द्वितीय लसमात्रा आहेत. अर्थात, ७५ टक्के पात्र लोकसंख्येला किमान एक लसमात्रा मिळाली आहे, तर ३१ टक्के पात्र लोकसंख्येला दोन्ही लसमात्रा मिळाल्या आहेत. मात्र, १०० कोटी लसमात्रांचा आनंद साजरा करताना, अभिमान बाळगताना एका वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, तर त्यावर सरकार, आरोग्य यंत्रणेसह प्रामुख्याने जनतेलाच काम करावे लागेल. कारण, पहिली लसमात्रा घेतली पण, दुसरी लसमात्रा घेतली नाही व त्या व्यक्तींची त्याची कालमर्यादाही उलटून गेली, असे तब्बल दहा कोटी लोक आहेत. कारण, जसजसे लसीकरण होत आहे, कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात सापडत आहेत, तसतशी नागरिकांची, कोरोना साथ संपल्याची मानसिकता तयार होत आहे. त्यातूनच, एक लसमात्रा घेतल्यानंतर दुसरी लसमात्रा घेण्यासाठी लोक उत्साह दाखवत नाहीत, असे दिसते. म्हणजेच, लस उत्पादकांच्या बाजूने समस्या नाही, तर लस घेणाऱ्यांच्या बाजूने समस्या असल्याचे इथे स्पष्ट होते. त्यावर लवकरात लवकर उपाय शोधावा लागेल. आणखी एक मुद्दा म्हणजे देशात सर्वाधिक ‘कोव्हिशिल्ड’ लसी दिल्या आहेत व त्याची दुसरी मात्रा ८४ दिवसांनी देण्यात येते. त्यामुळेही दोन्ही लसमात्रा न घेतलेल्यांचे कमी प्रमाण दिसून येते. पण, तो तांत्रिक मुद्दा आहे व व्यक्तीची दुसऱ्या मात्रेची निर्धारित वेळ आली की, त्यांचेही लसीकरण होईल. मात्र, दुसऱ्या लसमात्रेची वेळ आल्यानंतर ती घेण्याचा उत्साह नक्कीच दाखवला पाहिजे. तेव्हा आज १०० कोटी लसमात्रांचा आनंद साजरा करणारा देश, नंतर २०० कोटींपेक्षाही अधिक लसमात्रांचाही आनंद साजरा करेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@