नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? मनसेचा सवाल

21 Oct 2021 16:37:30

Jasmin Wankhede_1 &n
मुंबई : ड्रग्स प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांची बहिण जास्मिन वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याविरोधात आता मनसेने जास्मिन वानखेडे यांची पाठराखण करत, जास्मिन वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही, असे मनसेने स्पष्ट केले आहे. नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का?, असा सवाल मनसे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे.
 
 
जास्मिन वानखेडे, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. "जास्मिन वानखेडे या मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नवाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावं." असे आव्हान त्यांनी नवाब मालिकांना दिले आहे.
 
 
पुढे अमेय खोपकर यांनी टीका करताना म्हंटले की, "नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. त्यांनी एखाद्या महिलेला लेडी डॉन बोलणे चुकीचे आहे. जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. चांगल्या कामाच्या मागे मनसे नेहमीच उभी राहील. महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालते तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो त्यांना अटक करून दाखवा."
 
 
Powered By Sangraha 9.0