शासकीय योजनांची तळागाळापर्यंत यशस्वी अंमलबजावणी; पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य!

21 Oct 2021 13:19:46

rmp _1  H x W:


नवी दिल्ली : “सुशासनाद्वारे लोकशाहीस बळकटी देणे आणि शासकीय योजनांची तळागाळापर्यंत यशस्वी अंमलबजावणी करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. पंतप्रधानांच्या २० वर्षांच्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीचे मूल्यमापन भारतीय लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे,” असे कौतुगोद्गार भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत काढले.
 
 
‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे देशाची राजधानी दिल्ली येथे दि. २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीतील विविध आयामांचा अभ्यास करणार्‍या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन दि. २७ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तसेच ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. परिषदेचा समारोप २९ ऑक्टोबर रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थित होईल. नवी दिल्ली येथील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ही परिषद होणार आहे.
 
 
परिषदेमध्ये ‘मुख्यमंत्री ते पंतप्रधान’ या प्रवासातील वैशिष्ट्ये, योजनांची यशस्वी अंमलबजावणी, मोदी सरकार आणि सामाजिक, शैक्षणिक विकास, ‘मोदीनॉमिक्स’ संकल्पनेची वैशिष्ट्ये, नवीन शिक्षण धोरण, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पर्यावरणीय समस्यांविषयी मोदी सरकारची दृष्टी, परराष्ट्र धोरणातील यश, कृषी क्षेत्रातील सुधारणा, सामाजिक न्याय व महिला सक्षमीकरण आदी विषयांवर चर्चा तसेच ‘पेपर प्रेझेंटेशन’ होणार आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ, लेखक, विविध माजी राजदूत, सनदी अधिकारी यांचा समावेश आहे.




Powered By Sangraha 9.0