मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर : दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांबद्दल एक शब्द नाही!

20 Oct 2021 12:22:37

Uddhav Thackeray _1 
 
 

 
नागपूर : वर्षभरात हजारहून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकही शब्द न उच्चारल्याने शिवसेना नेत्यांनी घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत, ग्रामीण भागांतील नैराश्यात वाढ झाली आहे. कोरोना काळात अधिकारी-कर्मचारी गावात जातच नव्हते, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक गावात जातच नाहीत, नोकरशाहीच्या उदासिन धोरणांमुळे विदर्भ, मराठवाडा वाऱ्यावर सोडण्यात आला आहे, अशी खंत शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली.
 
 
"प्रशासकीय उदासिनता आहे, सरकारने आदेश काढला आहे की, शेतकरी आत्महत्या झाली तर अधिकाऱ्यांनी दारावर जायचं, आत्महत्या का झाली याची नोंद घ्यायची. याबद्दल उदासिनता दिसते. शेतकरी आणि राज्य सरकारच्या उदासीन धोरणेही याला कारणीभूत आहेत. नापिकी, पीक विमा पैसे मिळत नसणे, याबद्दल जबाबदारी कोण घेणार?, कोरोना काळातील सुन्न असलेली प्रशासन व्यवस्थाच याला कारणीभूत आहे.", असा आरोपही त्यांनी केला.
 
 
"शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला की, नापिकी झाली, ओला दुष्काळ आला, पूरग्रस्तांचे नुकसान झाले याबद्दल दसरा मेळाव्यात एक जरी शब्द मुख्यमंत्र्यांनी उच्चारला असता तरी आम्हाला बरं वाटलं असतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून शेतकऱ्यांना काही आधार मिळाला नाही, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला, अशा तक्रारी मला आल्या. याबद्दल मी त्यांना सांगितलं की, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहेत. सीएम जोपर्यंत आहेत, तोपर्यंत तुम्हाला दिलासा नक्की मिळेल.", असे आश्वासन त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
१० हजार कोटींचे पॅकेज नुसते आश्वासन!
 
जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पंचनामेच झाले नाहीत. शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार, आत्तापर्यंत १० हजार कोटींच्या मदतीची नुसती घोषणा झाली. जिल्हाधिकारी इतके माजले आहेत, त्यांना मस्ती किती आहे ते पहा, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. गेल्या वर्षात झालेल्या नुकसानीची मदत अद्याप पोहोचलेली नाही. इथल्या पालकमंत्र्यांनी, आमदारांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मतदारांना आपले दायित्व आहे, या भावनेने काम करायला हवं, असे खडेबलोही त्यांनी सुनावले. 'टीव्ही 9'शी बोलतांना त्यांनी याबद्दल आपले मत नोंदविले आहे.



Powered By Sangraha 9.0