राज्यात दोन लाख ६३ हजार ३२२ अवैध वृक्षतोड

20 Oct 2021 16:51:47

tree_1  H x W:
मुंबई : राज्यात गेल्या चार वर्षांत एक लाख नऊ हजार सागांसह दोन लाख ६३ हजार ३२२ वृक्षांची अवैध तोड झाली आहे. त्यामुळे राज्याचे सुमारे २० कोटी ४३ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सागाच्या एक लाख नऊ हजार ९११ वृक्षांची कत्तल केल्यामुळे १५ कोटी ३६ लाख ७९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
 
 
राज्यात दोन वर्षापूर्वी तत्कालीन वन मंत्र्यांनी ५० कोटी वृक्ष लागवड करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. त्यातील किती वृक्ष जिवंत आहेत याबद्दल वन विभागही मोजकी माहिती देऊन काढता हात घेत आहे. आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार ही आकडेवारी असल्याचे ते सांगत असताना विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वृक्ष लागवडीपेक्षाही वृक्षतोडीवर निर्बंध आणणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी राज्याच्या वनखात्याकडे माहिती अधिकाराअंतर्गत याबाबत माहिती मागितली होती. यामुळे अवैध वृक्षतोडीची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. यामध्ये त्यांनी अवैध वृक्षतोडीमुळे झालेले नुकसान आणि काही प्रमाणात झालेल्या वसुलीची माहिती दिली आहे. मात्र, ही वसुली पैशांची आहे. प्रत्यक्षात तोडण्यात आलेली झाडे परत येणार नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. जगभरात पर्यावरण व वन संवर्धनावर कार्यशाळा आणि चिंता व्यक्त केली जात असताना सुरू असलेली वृक्षतोड ही मानवासाठी घातक ठरणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0