व्रतस्थ पत्रकार, उमदा माणूस!

20 Oct 2021 11:37:36

DV Gokhle_1  H
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली असताना त्याविरोधात आणि आणीबाणीत लोकशाहीवर गदा आली असताना त्याविरोधातील लढ्यात सहभागी होणारे दिवि. हा त्यांच्या कर्तृत्वाचा आणखी एक लखलखता पैलू. दिविंच्या निधनाला २५ वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्या या बहुआयामी व्यक्तित्वाचा आढावा घेणे समयोचित ठरेल.
दिनकर विनायक तथा दि. वि. गोखले यांच्या निधनाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत (निधन : २० ऑक्टोबर, १९९६). २५ वर्षांचा कालावधी याचा अर्थ दीडएक पिढी असा होतो. पिढीबदलाबरोबर अगोदरच्या पिढीतील घटना-प्रसंग-व्यक्ती विस्मरणात जाऊ लागतात. मात्र, काही व्यक्ती आणि काही प्रसंग त्यास अपवाद ठरतात. दि. वि. गोखले त्याच वर्गातले. वास्तविक हिंदुत्ववादी विचारसरणीचे म्हणून वृत्तपत्रांतील सर्वोच्चपदाने त्यांना हुलकावणी दिली. पण, त्याविषयी कोणताही खेद अथवा खंत न बाळगता आपल्या जीवननिष्ठांशी तडजोड न करता मात्र पत्रकार म्हणून काम करताना आपली विचारधारा आड न येऊ देता वस्तुनिष्ठेला प्राधान्य देणारे ‘दिवि’ अनोखे रसायन होते. मराठी वृत्तपत्रांचे स्वरूप बदलत गेले असले, तरी त्याचा एक आराखडा कसा असावा, याची घडी बसविण्याचे श्रेय दिविंकडे जाते आणि अद्याप त्यात मूलभूत फरक झालेला नाही. हे योगदान विसरता न येणारे. पण, पत्रकार म्हणून लौकिक मिळवितानाच दिविंच्या अन्य काही पैलूंचा वेध घेणे तितकेच आवश्यक. याचे कारण पत्रकार म्हणून असणारा धबडगा मोठा असतो. त्यातून वेळ काढून त्यांनी केलेले ग्रंथलेखन हा त्यांचा मोठा विशेष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली असताना त्याविरोधात आणि आणीबाणीत लोकशाहीवर गदा आली असताना त्याविरोधातील लढ्यात सहभागी होणारे दिवि. हा त्यांच्या कर्तृत्वाचा आणखी एक लखलखता पैलू. दिविंच्या निधनाला २५ वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्या या बहुआयामी व्यक्तित्वाचा आढावा घेणे समयोचित ठरेल.
 
दिविंचा पिंड कार्यकर्त्याचा होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी ते भारलेले होते, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते आणि काही काळ प्रचारक होते. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली आणि संघाने सत्याग्रह सुरू केला. त्यावेळी दिवि ‘नवशक्ती’ दैनिकात कार्यरत होते. परंतु, संघाने केलेल्या सत्याग्रहात त्यांनी आपल्या नोकरीची चिंता न करता भाग घेतला. दिविंचे हे वेगळेपण होते. आपल्या जीवननिष्ठांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आणि जेव्हा काळाची गरज होती, तेव्हा वैयक्तिक लाभ-हानीची चिंता न करता त्यांनी त्या चळवळीत उडी घेतली. आणीबाणीत वृत्तपत्रांवर निर्बंध होते. मात्र, त्या सेन्सॉरशिपला विरोध करणाऱ्यांत पत्रकार अगदी अल्पप्रमाणात होते. किंबहुना, ‘सरकारने पत्रकारांना वाकायला सांगितले, तर पत्रकार रांगायला लागले’ हे अडवाणी यांचे विधान सर्वश्रुत आहे आणि एकूण पत्रकारांनी आणीबाणीसमोर कशी नांगी टाकली होती, याचे निदर्शक आहे. मात्र, ज्यांनी निर्धाराने आणीबाणीला विरोध केला, त्यात दिवि होते. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला. मात्र, गांधीहत्येनंतर केलेला सत्याग्रह असो किंवा आणीबाणीत भोगलेला तुरुंगवास असो; त्याचे भांडवल त्यांनी कधी केले नाही, ना वाजपेयी यांच्यापासून सर्व दिग्गजांशी असणारा परिचय मिरविला. ‘स्वतःविषयी जो बोलत राहतो तो समोरच्याला कंटाळा आणतो’ असे ते म्हणत आणि तीच त्यांची स्वतःविषयी अबोल राहण्यामागील धारणा होती. त्यांच्या मोठेपणाचे म्हणूनच समोरच्यावर दडपण येत नसे. पण, दरारा अवश्य वाटत असे.
 
 
 
‘नवशक्ती’तून ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये पहिले वृत्तसंपादक म्हणून रुजू झाल्यावर दिविंना आपले प्रयोग राबविण्यासाठी मोठा पैस मिळाला. वृत्तपत्राची घडी बसविण्यात वृत्तसंपादकाचा मोठा सहभाग असतो. ‘मटा’ला द्वा. भ. कर्णिक आणि नंतर गोविंद तळवलकर यांच्यासारखे संपादक लाभले आणि ते ‘मटा’चे चेहरे होते हे खरे; पण वृत्तपत्र संघटनशक्तीवर चालत असते आणि त्याचे नेतृत्व दिविंकडे होते. वाचकांच्या पत्रव्यवहाराला दिविंनी प्रतिष्ठा मिळवून दिली आणि अनेक दिग्गज मंडळींची पत्रे ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होऊ लागली. क्रीडा आणि त्यातही भारतीय खेळांत दिविंना विशेष रस होता आणि वृत्तपत्राचे शेवटचे पान क्रीडाविषयक बातम्यांना वाहिलेले असावे, ही कल्पना मराठी वृत्तपत्रांत राबविणारे आणि ती दिशा अन्य वृत्तपत्रांनाही अप्रत्यक्षरीत्या देणारे दिविच होते. वृत्तसंपादक म्हणून त्यांचा ठसा ‘मटा’वर उमटलेला दिसे. अर्थात, त्याच वेळी व्यासंग करणे त्यांनी चुकविले नाही. युद्ध हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. १९६२ सालच्या चीन-भारत युद्धाच्या वेळी ‘मटा’मध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांनी वाचकांचे प्रबोधन केले. उल्लेखनीय भाग हा की, आतासारखे तेव्हा तंत्रज्ञान पुढारलेले नव्हते. पण, संदर्भांनी युक्त आणि भविष्यवेधी पद्धतीने लेख ते सिद्ध करीत. त्यातील भाषा ओघवती आणि वाचकांना आपण जणू युद्धभूमीवर आहोत, असा प्रत्यय देणारी असे. ते लेख इतके गाजले की, पुढे त्याचे ‘माओचे लष्करी आव्हान’ हे पुस्तक जयंत साळगावकरांनी काढले आणि ते पुस्तकही हातोहात खपले. त्या पुस्तकाला पु. ल. देशपांडे यांची दीर्घ प्रस्तावना होती आणि पुलंनी दिविंच्या लेखनाचे तोंडभरून कौतुक केले होते. वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तक झाले, तरी गंभीर ग्रंथलेखन हा वेगळाच भाग असतो. रोजच्या धबडग्यातून वेळ काढून, वाचन, चिंतन, मनन करून संदर्भांची जुळवाजुळव करून ग्रंथ सिद्ध करणे हे सोपे नाही आणि सहजसाध्य नाही. पण, ‘युद्धनेतृत्व’ हा ग्रंथ असो; ‘पहिले महायुद्ध’ हा ग्रंथ असो किंवा क्लॉसविट्झच्या महाग्रंथाचा व शंकरराव थोरात यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद असो, हे व्यासंग आणि मेहनत याशिवाय शक्य नाही. राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी दिविंच्या लेखणीस धार चढली आणि साप्ताहिक ‘विवेक’मध्ये त्यांनी लिहिलेले लेख गाजले. युद्धविषयक पत्रकार मराठीत हाताच्या बोटांवर मोजावेत इतकेच. त्यांचे शिलेदार दिवि होते.
 
उण्यापुऱ्या ५० वर्षांच्या पत्रकारितेत दिविंनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. पण, म्हणून ते कधी एकारलेलेही झाले नाहीत. सर्व पक्ष आणि विचारधारांच्या मंडळींशी त्यांचा निर्व्याज स्नेह होता आणि त्याला कारण होते ते त्यांच्या स्वभावातील उमदेपणा. संघाच्या कार्यपद्धतीशी मतभेद होऊन अप्पा पेंडसे, मधुकरराव देवल प्रभृती कार्यकर्ते १९४८नंतर संघापासून दुरावले आणि त्यांनी आपापली कार्ये उभी केली. दिवि हेही एका अर्थाने त्याच बंडखोरांमध्ये होते. देवलांनी म्हैसाळला समरसतेची प्रयोगशाळा बनविले. दिवि त्या प्रयोगाशी सुरुवातीपासून निगडित होते आणि वर्षाकाठी किमान दोन ते तीनदा ते म्हैसाळला जात असत. पण, म्हणून संघाच्या कार्यकर्त्यांशी दिविंचा स्नेह लोपला नाही. नाना पालकरांच्या लेख व प्रश्नोत्तरांच्या संकलनाच्या पुस्तकाला दिविंनी लिहिलेली प्रस्तावना जितकी मर्मग्राही तितकीच त्यांच्या पालकरांशी असणाऱ्या गाढ्या स्नेहाची साक्ष देणारी. जनसंघापासून समाजवाद्यांपर्यंत सर्वांशी दिविंचा स्नेह होता. विचारधारा वेगळी असली तरी संवादाची द्वारे कायम खुली असली पाहिजेत, या उमद्या धारणेने ते जगले. आपला एक ग्रंथ त्यांनी डॉ. आंबेडकर यांना समर्पित केला; तो एका राजकीय नेत्याला करावा म्हणजे खूप लाभ होईल, अशी सूचना त्यांना आली होती. पण, ती त्यांनी अमान्य केली. तेव्हा जीवननिष्ठांशी प्रामाणिक राहूनही विरोधी विचारधारेतील मंडळींशी जिव्हाळ्याचे संबंध राखता येतात, हे दिविंनी दाखवून दिले. असंख्य भाषणे त्यांनी दिली आणि ती अर्थातच अभ्यासपूर्ण असत. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ यावर दिविंचा विश्वास होता आणि त्याची साक्ष त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात, ग्रंथांत आणि भाषणांत आढळेल. सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते आणि रा. के. लेले स्मृती समितीपासून सावरकर स्मारकापर्यंत त्यांनी आपला ठसा उमटविला. हे करताना त्यांनी मनावर कोणतेही मळभ येऊ दिले नाही. याचा अर्थ त्यांच्यावर संकटे किंवा दुःखाचे प्रसंग आले नाहीत, असे नाही. पण, त्याने आपली प्रसन्नता त्यांनी कधी लोपू दिली नाही.
 
दिविंनी व्रतस्थ पत्रकार म्हणून आपले जीवन व्यतीत केले आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा सर्वदूर संचार होता. पुण्याला ते आले की, त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळे आणि तेथे गेल्यावर असे आढळे की, ते लोक दिविंची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सम ब्रिन्ग हॅपिनेस व्हेयरएव्हर दे गो, सम ब्रिन्ग हॅपिनेस व्हेनएव्हर दे गो’ अशी एक इंग्रजी शब्दचमत्कृती आहे. दिवि यातील पहिल्या वर्गात मोडणारे. ते जिथे जात, तेथे आनंद पेरीत असत. त्यांच्या सान्निध्यात कोणी दुर्मुखलेला राहणे शक्य नव्हते, कारण दिवि यांच्यात ते जातील तेथे चैतन्य निर्माण करण्याची हातोटी होती. पण, हे उसने अवसान नव्हते. अवसान काही काळ टिकू शकते. दिवि यांचा तो स्वभावच होता आणि जे स्वाभाविक असते, तेच सहज असते. त्यांच्या गप्पांनाही मैफिलीचे स्वरूप येई आणि त्यांनी बोलत राहावे, असेच ऐकणाऱ्याला वाटत असे. दिवि ५० वर्षे पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनात होते. त्यांच्या निधनाला २५ वर्षे पूर्ण होत असताना पत्रकार म्हणून त्यांनी दाखविलेली व्यवसायनिष्ठा, त्यांचा व्यासंग, निर्भीडता, एकारलेले होणे म्हणजेच विचारधारेशी निष्ठेचा पुरावा, या समजुतीला त्यांनी दिलेला छेद आणि तरीही निष्ठांशी तडजोड न करण्याची वृत्ती, त्यासाठी प्रसंगी केलेला, लागलेला त्याग आणि त्यांचा सर्वोत्तमाचा ध्यास यांचे स्मरण करणे आवश्यक. अखेरीस स्मरण हे व्यक्तीचे असते, तद्वत ते त्या व्यक्तीतील गुणसमुच्चयाचे असते. ते गुण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत असतात.
 
- राहुल गोखले
 
Powered By Sangraha 9.0