अनिल परबांविरोधात ईडी कारवाईसाठी रामदास कदमांनी पुरवली रसद?

कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

    02-Oct-2021
Total Views |

ramdas kadam_1  


ठाकरे सरकारला मुद्दाम अडचणीत आणण्याचा रामदास कदमांचा प्रयत्न?


मुंबई:
शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदास कदम यांच्यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे.



खेडचे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि माजी आमदार संजय कदम यांची संयुक्त पत्रकार परिषद आज खेड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप करत पुराव्यासाठी एक मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिपच पत्रकार परिषदेत सादर केली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, 'आमच्या महाविकास आघाडीत काही सुर्याजी पिसाळ तयार झाले आहेत. तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच पुरवली. महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम माजी मंत्री आणि विधानपरिषदचे आमदार रामदास कदम करत आहेत, आम्ही या सगळ्याचे पुरावे आमच्या नेत्यांकडे दिले आहेत,' अशीही माहिती दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.


मात्र या कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नसल्याचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. संजय कदमला माझ्या मुलानेच पडले आहे त्यामुळे ते माझ्या विरोधात गरळ ओकत आहेत. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पुष्कळशी प्रकरणं मी माहितीच्या अधिकारातून काढली. ती न्यायालयात प्रलंबित आहेत. मागच्या तीन महिन्यात त्यांनी ६ पत्रकार परिषद घेतल्या आहेत. अशा खोट्या क्लिप दाखवून माझी बदनामी केली जात आहे, दापोलीचा प्रसाद कर्वे हा माझा पीए नाही. मी कडवा शिवसैनिक आहे कालचा शिवसैनिक नाही. पक्षात बदनामी करण्यासाठी हे दोघे एकत्र आले आहेत. प्रसाद कर्वेचा मुलगा मनसेचा कार्यकर्ता आहे. प्रसाद कर्वेशी माझा काहीएक संबंध नाही, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.