साखर उद्योग क्षेत्रात आपल्या अफाट बुद्धिमत्तेतून, व्यवस्थापनेतून, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात ‘नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज’ सारखा पहिला खासगी कारखाना उभारून साखर, पोलाद, दूध आणि जलसंधारणाच्या कामातून ज्यांनी कृषिक्रांती घडवून आणली, असे कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांना नुकताच प्रतिष्ठित असा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शेतकर्यांच्या उन्नतीसाठी सतत धडपडणार्या एका भगीरथाची म्हणजे कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांची ही एक गोष्ट आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या, जिद्दीने शिक्षण पूर्ण केलेल्या, अनेक नोकर्यांचे अनुभव घेतलेल्या, घरात उद्योगाचा कोणताही वारसा नसताना, ज्या ओसाड माळरानावर एकेकाळी आपली जनावरे राखली, त्या मातीत स्वतःचा साखर कारखाना सुरू करणार, या उराशी बाळगलेल्या स्वप्नासाठी अहोरात्र मेहनत घेतो. एक दिवस अफाट हिमतीवर, महाराष्ट्रातला पहिला खासगी साखर कारखाना उभा राहतो. हा सगळा प्रवास, सर्वांना थक्क करणारा आहे, प्रेरणा देणारा आहे. ही कहाणी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी येथील ‘नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज’चे संस्थापक चेअरमन कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांची.
जीवनपट
भैरवनाथ भगवानराव ठोंबरे यांचा जन्म २४ एप्रिल, १९५३ रोजी कळंब तालुक्यातील रांजणी येथे झाला. भगवान ठोंबरे यांना तीन मुले व चार मुली. यातील भैरवनाथ सर्वात ज्येष्ठ चिरंजीव. स्वभावातील प्रामाणिपणा, आशादायी विचार, स्वतःवरची निष्ठा, चिवट विजिगिषू वृत्ती, कठोर परिश्रम करण्याची तयारी ही त्यांची गुणवैशिष्ट्ये. ठोंबरे यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण आजोळी म्हणजे कडकनाथवाडी येथे झाले, तर पुढील शिक्षण बार्शी येथील शिक्षण महर्षी मामासाहेब जगदाळे यांच्या शिक्षण संस्थेत झाले. ‘एसएससी’ परीक्षेत ते ७५ टक्के गुण मिळवत बोर्डात तिसरे आले. शाळेच्या सुट्टीत काही महिने त्यांनी गुरे राखण्याचे काम केले. ‘बी.कॉम.’च्या परीक्षेत भैरवनाथ शिवाजी विद्यापीठातून तिसरे आले. १९७२च्या दुष्काळात ठोंबरे कुटुंबीयांनी खडी फोडण्याचे काम केले. भैरवनाथ यांनीदेखील एका विहिरीच्या कामावर मुकादम म्हणून काम केले. त्यानंतर कोल्हापूर येथून ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांना ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ कंपनीत डेपो अधीक्षक म्हणून नोकरी मिळाली. येथील वातावरणात ते जास्त काळ रमू शकले नाहीत.
कुशल प्रशासक
अंबेजोगाई येथील साखर कारखान्यात लेखापाल, माजी केंद्रीय गृहमंंत्री शिवराज पाटील चाकूरकर मुख्य प्रवर्तक असलेल्या नळेगाव येथील ‘जय जवान, जय किसान’ कारखान्यात मुख्य लेखापाल म्हणून नोकरी पत्करली. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंंत्री विलासराव देशमुख यांच्या ‘मांजरा’ साखर कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक (एम.डी) म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद आहे. मांजरा कारखाना ‘लो झोन’मधून ‘मध्यम झोन’मध्ये आणून, कारखान्याला १२.५० टक्के उतारा मिळवून देण्यात ठोंबरे यांनी महत्त्वपूर्ण वाटा उचलला. युती शासनाच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याची निर्मिती केली. कारखान्याच्या विकासासाठी मुंडे यांना ठोंबरेंसारखा कुशल प्रशासक होता. तेव्हा मुंडे यांनी ‘कारखाना उभारणीसाठी ठोंबरे यांना पाठवा,’ अशी विलासराव देशमुख यांना विनंती केली. तेव्हा मोठ्या मनाने त्यांनी ठोंबरे यांना कार्यमुक्त केले. या कारखान्याने ‘ट्रायल सिजन’मध्ये सुमारे पाच लाख टन उसाचे गाळप करून सहा लाख क्विंटल साखरेचेउत्पादन केले. हा आशिया खंडातला विक्रम ठरला. ठोंबरे यांच्या व्यवस्थापन कौशल्याची ही एक पावतीच!
कारखानदारीचे नवीन ‘नॅचरल’ मॉडेल
बी. बी. ठोंबरे यांच्या मनात आयुष्यात काही तरी अफाट नावीन्यपूर्ण काम करून दाखविण्याची जिद्द व महत्त्वाकांक्षा होती. त्याच जोरावर त्यांनी स्वतःचा साखर कारखाना सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रित केले. योगायोगाने केंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार होते. वाजपेयी यांनी नव्या आर्थिक धोरणांनुसार साखर कारखान्यावरील निर्बंध हटवले. या क्रांतिकारक निर्णयामुळे ठोंबरे यांच्या स्वप्नास गती मिळाली. १९९८ साली त्यांना साखर कारखान्याचा परवाना मिळाला. १९९९ साली ‘नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड’चे भूमिपूजन झाले. २०००मध्ये प्रकल्प पूर्ण होऊन रांजणीच्या माळरानावर उभा राहिलेला ‘नॅचरल शुगर’ हा महाराष्ट्रातील पहिला खासगी कारखाना आहे. १९ कोटी भांडवलात उभ्या राहिलेल्या कारखान्यात शेतकर्यांचा ११ कोटी रुपयांचा वाटा आहे.ठोंबरे हे उत्तम प्रशासक असले तरी ते प्रथम शेतकरी आहेत. त्यामुळे कृषी अर्थशास्त्राचे बारकावे त्यांना अवगत आहेत. त्यामुळे पहिल्या तीन वर्षांतच कारखान्यांचे उत्पादन हे १,२५० मे. टनापर्यंत नेले. तीन वर्षांतच बँकाकडून घेतलेले संपूर्ण कर्ज फेडले. शेतकर्यांच्या उसाला चांगला दर देऊन कारखाना अल्पावधीत कर्जमुक्त करता येतो, हे ठोंबरे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. आज या कारखान्याची सहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता आहे. कारखान्याचे सुमारे १२ हजार शेतकरी सभासद आहेत. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी ‘नॅचरल’ हा हक्काचा कारखाना बनला आहे. गुरुवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी यंदाची गळीत हंगाम सर्वसाधारण बैठक कारखान्याच्या कार्यालयात पार पडली. यावेळी चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी ठिबकवरील उसास २,७०१ इतका उच्चांकी भाव जाहीर केला आहे, तर बिगर ठिबकवरील उसास २,६५१ रुपये दर जाहीर केला. सध्याच्या अडचणीच्या काळात हजारो ऊस उत्पादक शेतकर्यांना योग्य भाव दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उसाखालील क्षेत्रात आणि उत्पादकतेत स्थिरता येण्यास मदत होणार आहे.
उसामधील पाण्याचा पुनर्वापर
मराठवाड्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. उस्मानाबाद व बीड हे त्यातील आणखीन अतिदुष्काळी जिल्हे. २००३-०४ मध्ये दुष्काळ पडला होता. पाण्याअभावी साखर कारखाने अडचणीत सापडले होते. साखर कारखाना चालवण्यासाठी आवश्यक असणारे पाणी उसातून मिळू शकते, याचा अभ्यास करून ठोंबरे यांनी आपल्या सहकार्यांबरोबर ‘उसामधील पाण्याचा पुनर्वापर’ हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले. तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे साडेबारा लाख लीटर पाणी उपलब्ध केले. कारखाना चालवण्यासाठी केवळ पाच लाख लीटर पाण्याची गरज होती. त्यामुळे कारखाना तीन महिने सुरळीत चालला. ठोंबरे यांनी विकसित केलेले ‘ऊस पाणी तंत्र’ पाहण्यासाठी देशभरातून अनेक मंडळी कारखान्यात आली. महाराष्ट्र सरकारने या तंत्राची दखल घेऊन हे तंत्रज्ञान सर्व साखर कारखान्यांना वापरण्याचे बंधन घातले.आज कारखाना कार्यक्षेत्रातील ६० टक्के ऊस हा ठिबक पद्धतीला आहे. जास्तीत जास्त शेतकरी उसाची ठिबक पद्धतीने लागवड करावी, यासाठी कारखान्याकडून शेतकर्यांना ठिबकसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर उसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीने लागवड करणे, यासह विविध बाबीचे शास्त्रोक्त पद्धतीने कारखान्यातर्फे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे उसाचे एकरी ६० ते १०८ मे. टनापर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी पाहायला मिळतात.
२० वर्षांत ३१ सहप्रकल्पाची उभारणी
शेतकरी हा मालक झाला पाहिजे, हे ठोंबरे यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ‘नॅचरल शुगर’च्या माध्यमातून गेल्या २० वर्षांत ३१ सहप्रकल्पाची निर्मिती केली आहे. सहवीज निर्मिती, मिश्र पोलाद, इथेनॉल, रिफायनरी, बायोकंपोस्ट, बायोपॉवर, बायोगॅस, दूध डेअरी, दूध प्रक्रिया उद्योग, पशुखाद्य निर्मिती, पतसंस्था, मल्टिटेस्ट बँक, संगणक महाविद्यालय, हॉस्पिटल आदी प्रकल्पांची जोड देऊन हा साखर उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. केवळ उपपदार्थांची निर्मिती न करता उपपदार्थ निर्मितीसाठी आवश्यक असणार्या बाजारपेठेत त्याबाबत स्वतःचा (नॅचरल) ब्रॅण्ड तयार करून चांगले मार्केटिंग करून कारखान्याची आर्थिक बाजू सक्षम केली आहे. व्यावसायिक वृत्तीचे दर्शन घडवत ‘नॅचरल शुगर’ कारखान्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षांत ८.२४ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.ठोंबरे यांनी आपल्या उद्यमशीलतेने व्यवसायाची उलाढाल आज ५०० कोटींच्या घरात नेली आहे. साखर व पोलाद ही उत्पादने रांजणीसारख्या छोट्या गावातून निर्यात होतात, ही एक मोठी जमेची बाजू आहे.जागतिकीकरणामुळे ऊस शेती व साखर कारखानदारांपुढे अनेक प्रश्न व समस्या उभ्या राहिल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळले की, त्याचा परिणाम ऊस उत्पादक व साखर कारखानदारांना मोठा फटका बसतो. दुसर्या बाजूने कारखानदारांनी यशस्वी कारखाना करण्यासाठी उपाययोजनांची तयारी करणे आवश्यक आहे. साखरेसोबत उपपदार्थांची निर्मिती करणे आवश्यक आहे. व्यावसायिक वृत्तीचे व्यवस्थान करून अडचणीच्या काळातही साखर कारखाना सक्षमपणे कसा उभा राहू शकतो, याचे महाराष्ट्रातील उत्तम उदाहरण म्हणजे ‘नॅचरल शुगर’ होय.
अतिशुद्ध साखरेची निर्मिती
ठोंबरे गावखेड्यात राहत असले तरी त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि वैश्विक आहे. जागतिक बाजारपेठेत गंधकविरहित साखरेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी २००७ साली महाराष्ट्रातील पहिली ‘शुगर रिफायनरी’ उभी करून अतिशुद्ध साखरेचे उत्पादन सुरू केले. या रिफायनरीद्वारे दिवसाला २,५०० क्विंटल अतिशुद्ध साखर तयार केली जाते. या साखरेला भारतीय व युरोपीय देशांतून मागणी आहे.
सहवीजनिर्मितीला चालना
ठोंबरे यांनी २००३ मध्ये बगॅसवर चालणारा वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला. सहा मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेल्या या उद्योगातून कारखान्याची गरज भागून वीज शिल्लक राहू लागली. विजेची वाढीव गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी २००८ साली १३ मेगावॅट वीजनिर्मितीचा स्वतंंत्र प्रकल्प सुरू केला. त्यानंतरही बगॅस कमतरतेची उणीव भरून काढली. त्यासाठी स्वतंत्र बॉयलरची उभारणी केली. त्यासाठी शेतकर्यांकडून गव्हाचे काड, तुरट्या अशा टाकाऊ वस्तूपासून शेतकर्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत मिळाला. दरवर्षी कचर्याच्या माध्यमातून सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपये शेतकर्यांना मिळतात. ‘नॅचरल’ने उभारलेला ६०४ किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले, तर या प्रकल्पासाठी प्लेट्स या सदैव सूर्याच्या दिशेने फिरणार्या आहेत.
मिश्र पोलाद निर्मिती
ठोंबरे यांच्या कामाचे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे मिश्र पोलाद निर्मिती होय. ठोंबरे यांनी उपलब्ध विजेचा विचार करून मिश्र पोलाद निर्मिती प्रकल्पाची कल्पना सत्यात उतरवली. या प्रकल्पातही त्यांनी शेतकर्यांचे सहकार्य घेतले. शेतकरी सभासदांनी तीन कोटी रुपयांचे भाग भांडवल जमा केले. आज इथे उत्पादित होणारा पोला पाकिस्तान, दुबई, बेल्जियम, मेक्सिको, दक्षिण कोरियात निर्यात होऊ लागला आहे.
दररोज दीड लाख लीटर इथेनॉलची निर्मिती
‘नॅचरल शुगर’ने २००५ साली उसापासून तयार होणार्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पातून दररोज दीड लाख लीटर इथेनॉलची निर्मिती होत असते. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे.
धवलक्रांतीतून ग्रमीण अर्थकारणाला चालना
कारखान्याचे कार्यक्षेत्र हे दुष्काळ भागात आहे. त्यामुळे ठोंबरे यांनी ग्रमीण भागाचा सर्वांगीण विकास हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून २०१२ साली ‘नॅचरल दूध डेअरी’ची स्थापना केली. या माध्यमातून दररोज ७५ हजार लीटर दूध संकलन होत असते. मराठवाड्यासह शेजारील सोलापूर व गुलबर्गा या शहरांना दूध पुरवले जाते. दुधापासून दही, श्रीखंड, लोणी, तूप, खवा, पेढा, बर्फी, गुलाबजामून, रसगुल्ला इत्यादी दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. यामुळे शेतकर्यांच्या दुधाला योग्य भाव आणि दहा दिवसाला पैसे मिळण्याची हमी आहे. दूध विक्री व दराची खात्री मिळाल्यामुळे जवळपास हजारो शेतकरी, शेतमजूर दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत.नवीन दुग्धव्यवसाय करणार्यांना नॅचरल संलग्नित असलेल्या ‘साई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था’ व ‘एनसाई मल्टिस्टेट बँके’च्या वतीने अर्थसाहाय्य देण्यात येते. दुग्ध व्यावसयिकांना गावात सकस पशुखाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी ‘नॅचरल’ने कारखाना परिसरात पशुखाद्य निर्मिती कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यातून दररोज ५० टन पशुखाद्य तयार होते. ‘नॅचरल शुगर उद्योग समूहा’च्या माध्यमातून ग्रमीण भागात रोजगारनिर्मिती झाली आहे. साखर कारखान्यामुळे शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या जीवनात एकप्रकारे क्रांती घडवून आणली आहे. एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची झाली तर उस्मानाबाद हा आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारखाना कार्यक्षेत्रात आतापर्यंत एकाही शेतकर्याने आत्महत्या केली नाही हे विशेष.
‘नॅचरल’च्या माध्यमातून जलक्रांती
सन २०१३-१४ या काळात साखर उद्योगामध्ये सर्वप्रथम ‘नॅचरल शुगर’ने प्रयोगिक तत्त्वावर दहा गावांत जलसंधारणाची कामे हाती घेऊन समतल पाझर कालवे, नाला सरळीकरण व रुंदीकरण इत्यादी कामे पूर्ण करून दुष्काळावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी रांजणी, सौंदना (अंबा), ताडगाव येथे केलेल्या कामाची पाहणी करून प्रशंसा केली. येथील कामांमुळे गावातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे शेतकर्यांना विविध शेती उत्पादन घेण्यास मदत मिळाली.कुशल व्यवस्थापन हे ठोंबरे यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यांच्या विचारांतून कारखान्यात एकाहून एक सरस प्रकल्प व योजना सुरू आहेत. ‘कोविड’काळात मराठवाड्यातील पहिल्या ‘ऑक्सिजन’ प्रकल्पाची उभारणी केली. या माध्यमातून दररोज ७० सिलिंडर ‘ऑक्सिजन’ तयार होत असतो. आज कारखान्याच्या माध्यमातून जवळपास १,२००हून अधिक जणांना कायमस्वरूपी व शाश्वत रोजगार मिळाला आहे. कर्मचार्यांना निवृत्तीनंतर भविष्याची चिंता नसावी म्हणून त्यांनी २००३ मध्ये ‘नॅचरल पाल्य पेन्शन योजना’ सुरू केली. या शिवाय ‘पेयजल योजना’, ग्रमीण रुग्णालय, कोल्ड स्टोअरेज, इंग्लिश मीडियम स्कूल, ई-लर्निंग, संगणक महाविद्यालय, रेशीम कोश धागा निर्मिती व खरेदी केंद्र, धान्य खरेदी केंद्र असे ‘नॅचरल शुगर’चे सर्व प्रकल्प राज्यातील नव्हे, तर देशभरातील साखर कारखान्यांनी आदर्श घ्यावा, असेच आहेत.
ठोंबरे हे ग्रमीण भागाशी नाळ जुळलेले व प्रचंड क्षमता असलेले उद्योजक-शेतकरी, साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक, खासगी कारखान्याचे प्रवर्तक आहेत. केवळ एका कारखान्याच्या माध्यमातून उस्मानाबाद, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील ग्रमीण भागाचा आर्थिकदृष्ट्या कायापलाट करून हजारो कुटुंबांना आर्थिक ऊब देणारे कृषिरत्न बी. बी. ठोंबरे हे खर्या अर्थांने मराठवाड्याचे भगीरथ ठरतात.
- विकास पांढरे