मुंब्र्यातील मुस्लीम मतदारांची नावे यादीतून गायब, आव्हाड संतापले

19 Oct 2021 17:16:31

Jitendra Awhad _1 &n
 
 
 
ठाणे : राज्य सरकार चालविताना उठसुट केंद्र सरकार आणि भाजपच्या नावाने शिमगा करणाऱ्या ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना आपल्या प्रशासनावरही विश्वास नाही. मुस्लीम आणि दलितांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांतून कापण्याला जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे सरकारमधील मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
 
 
मतदार वगळण्याला थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच आरोपीच्या पिजऱ्यात उभे केल्याने सरकारचा प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याचे दिसुन येत आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांचा तिळपापड झाला आहे.
 
 
आव्हाड यांनी सांगितले की, "महापालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. मुंब्रा येथे २० ते ३० हजार मतदारांची नावे कापण्यात आली आहेत. त्यासाठी स्थलांतरण (शिफ्टेड) असा शेरा मारण्यात आलेला असला तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत."
 
 
"ही नावे गाळण्याला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर जबाबदार आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली हे काम होत असते. तेव्हा,मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहेत. ते स्थलांतरण रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान,संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत असुन खासकरुन मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत, असा आरोपही आव्हाड यांनी केला.





Powered By Sangraha 9.0