ज्यांच्याकडे ड्रग्ज सापडले त्यांच्याबद्दल बोला ना!

17 Oct 2021 18:06:09

Nawab Malik _1  
 
 
 
 
मुंबई : "ज्यांच्याकडे ड्रग्ज आढळले त्यांच्याबद्दल एकही शब्द राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक का बोलत नाहीत?, एनसीबीच्या कोठडीतून गेल्या महिन्यात नवाब मलिकांचा कोण नातेवाईक बाहेर आला आहे. १७ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त झाले त्याबद्दल तुमच्या सरकारने काय कारवाई केली?", अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती लावत बेछूट आरोप करणाऱ्या मलिकांचा माजी सैनिक आणि ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार फ्लेचर पटेल यांनी समाचार घेतला.
 
 
 
नवाब मलिकांनी फ्लेचर पटेल आणि मुंबई एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. दोघांचे संबंध काय?, पटेल हे तीन तीन प्रकरणांमध्ये साक्षीदार कसे काय?, ले़डी डॉन कोण आहे?, मुंबईत कुठले रॅकेट सुरू आहे?, फ्लेचर पटेल लेडी डॉनसह काय दहशत निर्माण करत आहेत?, बॉलीवुडमध्ये दहशत निर्माण करून हे सर्वजण पैसे उकळण्याचे काम करत नाहीत ना?, असे प्रश्न विचारत याबद्दल पत्रकार परिषद घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
 
 
 
पटेल यांनी नवाब मलिक यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. पटेल आणि त्यांची बहिण हे या प्रकरणात महत्वाचे साक्षीदार आहेत. ते म्हणाले, "मलिक साहेब तुमचे धन्यवाद, तुमच्यामुळे मला माध्यमांपुढे येण्याची संधी मिळाली. मुंबई सैनिक फेडरेशनचा मी अध्यक्ष आहे. मी एक निवृत्त सैनिक आहे. काही दिवसांपूर्वी नाना पाटेकरांचा एक चित्रपट आला होता. ज्यात दाखविण्यात आले होते की, सैनिक निवृत्त झाला तरीही देशसेवा तो शेवटच्या श्वासापर्यंत करतो. त्यासाठी मला नवाब मलिकांची परवानगी घ्यावी लागणार आहे का?, माझ्या देशातील पीढी जर नशेच्या आहारी जात असेल तिला रोखण्यासाठी मला जर साक्ष द्यावी लागली तर त्यासाठी मलिक तुमची परवनागी घ्यावी लागणार आहे का?"
 
 
 
"तुम्हाला असं वाटत नाही का, नवाब मलिक साहेब आता काही दिवसांपूर्वी त्यांचे नातेवाईक एनसीबीच्या कोठडीतून बाहेर आल्यावर जरा जास्तच पत्रकार परिषदा घेत सुटले आहेत. स्वतःची जाहिरातबाजी करतायतं, वानखेडेंवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आमचं प्रशासन काय करतंयं तर अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहे. बोटीवर ड्रग्ज पार्टी करणाऱ्यांना पकडले त्यांच्याबद्दल कुणीही बोलत नाही. उलट अधिकारी साक्षीदारांना धारेवर धरण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या पीढीला काय संदेश देऊ इच्छीता, जर अशाप्रकारे 'उडता पंजाब' (हिंदी सिनेमातील संदर्भ) बनविण्याचे मनसुबे असतील तर माजी सैनिक ही एक मोठी तादक आहे, ती या विरोधात उभी राहील."






 
Powered By Sangraha 9.0