गुंतवणुकीतून श्रीमंतीचा संदेश देणारा बाप माणूस : राकेश झुनझुनवाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

rakesh 2_1  H x

स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे नाव गुंतवणूक क्षेत्रासाठी सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे. अगदी आता आतापर्यंत ‘शेअर बाजार’ या विषयाशी सामान्य भारतीयांचा फारसा संबंध नव्हताच. जेमतेम दोन-तीन टक्के भारतीय शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी राकेश झुनझुनवाला हा देवमाणूस! फक्त गुंतवणूक करुन चिक्कार पैसा कमावता येतो, श्रीमंत होता येते, तसेच कंपन्या मोठ्या करता येतात, हे झुनझुनवालांनी सिद्ध करून दाखवले. जागतिक स्तरावर वॅारेन बफे यांचे नाव गुंतवणूक क्षेत्रात ज्या आदराने घेतले जाते, तोच आदर भारतात राकेश झुनझुनवाला यांना आहे. गुंतवणूक क्षेत्रात भारतीयांसाठी हा ‘बाप माणूस’ असेच म्हणावे लागेल. पंतप्रधानांच्या भेटीनंतर चर्चेत आलेल्या झुनझुनवाला यांच्याविषयी...
एक गुंतवणूकदार आणि पंतप्रधान



भारतीय अतिशय सावध पवित्रा घेणारे आहेत. त्यामुळेच गुंतवणूक करताना शेअर बाजारापासून बरेच दूर आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही भारतीयांनी नवा पायंडा पाडला, तसेच इतिहासही रचला. धीरूभाई अंबानी, राधाकृष्ण दमानी, नारायण मूर्ती, रामदेव अग्रवाल यांनी भारतीय शेअर बाजाराला एक नवा दृष्टिकोन दिला. राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजाराकडे भारतीयांना आकर्षित केले. त्यांनी फक्त गुंतवणूक करून स्वतःला इतके मोठे केले की, देशाच्या पंतप्रधानांना त्यांची दखल घ्यावी लागली. दहा दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राकेश झुनझुनवालांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि देशात एक नवीन विषय सुरू झाला. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे बाहेर आले नाही. मात्र, त्यासंदर्भात अनेक चर्चांना प्रारंभ झाला, हे निश्चित. देशाच्या अर्थकारणात एक गुंतवणूकदार म्हणून सामान्य व्यक्तीची किंमत आहे, हेच यातून अधोरेखित झाले.देशाच्या प्रगतीमध्ये अर्थकारणाची खूप महत्त्वाची भूमिका असते. त्यात शेअर बाजारही येतो. कोरोना काळात केंद्र सरकारने ‘आर्थिक पॅकेज’ जाहीर केले आणि ‘जीडीपी’ हा शब्द सर्वत्र परिचित झाला. त्या पार्श्वभूमीवर ‘जीडीपी’ आणि शेअर बाजार यांचा संबंध अधोरेखित झाला. मार्च २०२० मध्ये शेअर बाजार कोसळला आणि भारतीय गुंतवणूकदार हादरला. तसे पाहता ती एक चांगली गुंतवणूक संधी होती. मात्र, सामान्य गुंतवणूकदार दूर पळाला आणि संधीचा फायदा घेऊ शकला नाही. राकेश झुनझुनवाला यांनी त्या संधीचे सोने केले. ते म्हणतात, “गुंतवणूक संधी असेल तर प्रसंगी मी पत्नीच्या बांगड्या गहाण ठेवूनही गुंतवणूक करीन.” जोपर्यंत आपला अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत नाही, त्याशिवाय असा आत्मविश्वास निर्माण होत नाही. गुंतवणूक करुन श्रीमंत होता येऊ शकते, हे राकेशजींनी स्वतःच्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यामुळे ते भारतीयांचे आदर्श आहेत. प्रत्येक गुंतवणूकदारांनी राकेश झुनझुनवाला यांचा आदर्श ठेवण्याची गरज आहे. आज जागतिक गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात. मात्र, भारतीय आपण तेवढा विश्वास ठेवला नाही. राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजाराचे भारतीयांसाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ आहेत. त्यांची भूमिका प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.


परिचय आणि गुंतवणुकीचा श्रीगणेशा


राकेश झुनझुनवाला यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते. त्यांच्या घरी अनेक मोठे अधिकारी येत असत आणि त्यांच्या वडिलांसोबत ‘शेअर मार्केट’ संबंधी विषयांवर चर्चा करीत असत. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या मनामध्ये शेअर मार्केटसंदर्भात आकर्षण निर्माण झाले होते. प्रारंभिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सीए होण्याचे ठरविले आणि त्यांनी आपले सीए पूर्ण केले. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याला प्रारंभ केला होता. १९८५ मध्ये शेअर मार्केटचा श्रीगणेशा फक्त पाच हजार रुपयांच्या भांडवलासह झाला. दरम्यान त्यांनी शेअर बाजारातीलच ‘ट्रेडर’ असणार्‍या रेखा यांच्याशी लग्न केले. दोघेही गुंतवणूक करत होते. साधारणपणे २००२ मध्ये ’RARE Enterprises’ नामक एका कंपनीची सुरुवात केली. त्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सुरू झालेला प्रवास आज धगधगते यज्ञकुंड बनला आहे. एक सामान्य व्यक्ती स्वत:च्या हिमतीवर गुंतवणूक करुन श्रीमंत तर होऊच शकतो, सोबत देशात चर्चेचा विषय होऊ शकतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राकेश झुनझुनवाला!



शेअर बाजारातील राकेश झुनझुनवाला नावाचा हा बाप माणूस अगदीच जमिनीवर आहे. दरम्यानच्या काळात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते व्हिलचेअरवर बसून नाचण्याचे हावभाव करीत होते. त्यांना चालता येत नाही. त्यामुळे ते नेहमीच व्हिलचेअरवरच असतात. तसाच फोटो पंतप्रधानांसोबतचाही आला. ‘व्हायरल’ झालेल्या चित्रफितीत ते ‘कजरा रे कजरा रे’ या गाण्यावर नाचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय निराळा आहे. ते म्हणतात, “जीवनात जोखीम घेतलीच पाहिजे.” त्यांच्यांच भाषेत सांगायचे तर, 'Risk is the essence of Life. If you don’t take risk, you are nothing.' याचा प्रत्येक विचार आजघडीला आपल्यासारख्या सामान्यांनी अंमलात आणण्यासारखा आहे. प्रचंड आशावाद, भारतीय अर्थव्यवस्था आणि भाकित ‘डी-मार्ट’ या भारतातील ब्रॅण्डचे मालक राधाकृष्ण दमानी यांना राकेश झुनझुनवाला आपले गुरु मानतात. पण, त्या यादीत सर्वात वरचे नाव त्यांच्या वडिलांचे येते. १९८५ पासूनच्या प्रवासात अनेकदा शेअर बाजार कोसळला. सर्वप्रथम ज्यावेळेस २००२ मध्ये कोसळला, त्यावेळी अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यावेळी राकेश झुनझुनवाला यांनी खर्‍या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवत अनेकांना नव्याने गुंतवणूक करीत मंदीचा फायदा घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांचा सल्ला ज्यांनी मानला, ते आज कोट्यधीश आहेत. त्यावेळेस ते म्हणाले होते, “मार्केट अगले २० -२५ सालोमे ३५ हजार- ४० हजार तक जायेगा। मार्केट तीन हजार से झिरो नही होनेवाला हैं। अभी टाईम हैं ‘बुल’ बनने का। ‘बेअर’ बनके मुंगफल्ली खानेका समय गया। अगर मेरा दाव सही निकला तो क्या पता अगला ‘बिग बुल’ मैं बनूंगा।’ भारतीय अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि स्वत:चे संशोधन याआधारे ते गुंतवणूक करीत राहिले आणि आज ते भारतीयांसाठी आदर्श ठरले आहेत.


राकेश झुनझुनवाला यांचा बाजारातील प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. १९८५ मध्ये फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणूक करुन हा प्रवास सुरु झाला. त्यावेळी मुंबई शेअर बाजार जेमतेम १५० अंकाच्या घरात होता. आज तो ६१ हजारांच्या घरात पोहोचला आहे. राकेश झुनझुनवालांची संपत्ती ४४ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. पाच हजार रुपयांचे ४४ हजार कोटी रुपये व्हायला ३७ वर्षे लागली. अनेक चढउतार पाहिले. राकेश झुनझुनवाला यांचा भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. त्यांनी २००३ मध्ये वर्तविलेले भाकीत शेअर बाजाराने कधीचेच खरे करुन दाखविले आहे. २० वर्षांत ४० हजारांचा टप्पा पाहणार्‍यांना आज बाजार ६० हजारांच्या वर गेल्यामुळे प्रचंड आनंद होत आहे. यामुळेच भारतीय गुंतवणूकदाराची जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. फक्त चर्चाच नाही, तर ‘फोब्स’च्या श्रीमंतांच्या यादीत राकेशजींचे नाव नोंदविले गेले आहे. शेअर बाजारातील एक तज्ज्ञ, अभ्यासक असलेले रामदेव अग्रवाल यांनी आपल्या यावर्षीच्या अभ्यासानंतर येत्या दहा वर्षांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ दोन लाख अंकांच्या घरात जाईल, असे भाकीत केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था नव्या रुपाने आकार घेत आहे आणि भारत देश सर्वार्थाने प्रगती करीत आहे, या आत्मविश्वासावर हे आकलन आहे.


भारतीय वॉरेन बफे


श्रीमंत होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. शेअर बाजारात तर दररोज कमी-अधिक होत राहणार. तेव्हा आपल्याला शांत राहण्याचा सल्ला राकेश झुनझुनवाला देतात. शेअर बाजारात ‘मंदी’ आणि ‘तेजी’ असे दोन शब्द प्रचलित आहेत. मंदी असेल तेव्हा गुंतवणुकीची संधी शोधलीच पाहिजे आणि तेजी असेल, तर सावधगिरी बाळगली पाहिजे. शेअर बाजाराच्या बाबतीत ‘पेशन्स’ अत्यंत आवश्यक आहे. जागतिक स्तरावर वॉरेन बफे आणि भारतात राकेश झुनझुनवाला असले, तरी दोघांमध्येहीखूप साम्य आहे. दोघांनीही आपल्या आयुष्यात शेअर बाजारातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले, त्यातून पैसा कमावला, श्रीमंतीचे अत्युच्च शिखर गाठले आणि प्रचंड दानधर्म केला. आपल्या उत्पन्नातील ठराविक भाग दरवर्षी समाजोपयोगी कार्यामध्येदोघेही आवर्जून खर्च करतात. दोघांचाही हा प्रवास खडतर होता. मात्र, त्यांनी गुंतवणुकीसाठी आलेल्या प्रत्येक संधीचे सोन केले. शेअर बाजाराच्या संदर्भात एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे, “Corrections are temporary, whereas Growth is permanent.” मंदीमुळे घाबरायचे नाही आणि तेजीत अधिक उत्तेजित व्हायचे नाही, हे ध्यानात ठेवले तर शेअर बाजार एक उत्तम गुंतवणूक माध्यम आहे. त्यासाठी पाच हजार रुपये ते ४४ हजार कोटी रुपये हा प्रवास करणार्‍या राकेशजींना आपण आदर्श मानले पाहिजे.


आजच्या स्थितीत शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक पर्यांयांशिवाय गुंतवणूकदारांना चांगले ‘रिटर्न’ देणारा मार्ग दुसरा नाही. त्यामुळे आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावत याकडे सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे. आपल्या देशाची प्रगती जितक्या वेगाने होईल, तितका व्याजाचा दर कमी होत जाणार आहेत. त्यामुळे भारताच्या प्रगतीवर विश्वास ठेवत देशांतर्गत गुंतवणूक करण्याचा आग्रह राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केला आहे. तसेही जागतिक गुंतवणूकदार भारताकडे एक आश्वासक गुंतवणूक केंद्र म्हणून पाहतात आणि गेल्या एक दीड वर्षांत भारतीयांचा कल शेअर बाजाराकडे वाढलेला दिसत आहे. त्या सर्वांसाठी राकेश झुनझुनवाला एक आदर्श आहेत. तसेही अनेक मुरलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला कोणते शेअर घेतात, यावर लक्ष ठेवतात आणि त्याप्रमाणे प्रसंगी गुंतवणूकही करतात.


माझे योगदान

येणार्‍या काळात शेअर बाजारात प्रचंड पैसा येणार आहे. भारतीयांना त्याशिवाय पर्याय नाही. राकेश झुनझुनवाला असो की, रामदेव अग्रवाल असो, यांच्यासारख्या गुंतवणूकदारांचे तसेच अभ्यासकांचे भाकीत भारताची प्रगती अधोरेखित आहे. ‘माझा देश प्रगती करतो आहे,’ असा अभिमान बाळगत, त्यामध्ये माझा सहभाग गुंतवणुकीच्या माध्यमातून कसा राहील, याचा विचार प्रत्येक भारतीयाने करण्याची गरज आहे. राकेश झुनझुनवाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने एक आश्वासक वातावरण तयार झाले आहे, त्याचा लाभ प्रत्येक भारतीय गुंतवणूकदाराने घेण्याची गरज आहे. राकेश झुनझुनवालांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत स्वत:च्या श्रीमंतीचे स्वप्न उराशी बाळगत भारतीयांनी गुंतवणूक केली, तर शेअर बाजार नवीन उच्चांक स्थापित करेल यात शंका नाही. चला, राकेश झुनझुनवालांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या गुंतवणूक प्रवासाला प्रारंभ करुया!



- प्रसाद फडणवीस




@@AUTHORINFO_V1@@