भारतीयांना दिशादिग्दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

RSS_1  H x W: 0
 
 
 
सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात केवळ रा. स्व. संघाचे स्वयंसेवकच नव्हे, तर सर्व भारतीयांना दिशादिग्दर्शन केल्याचे स्पष्ट होते. येत्या काळात संबंधित मुद्द्यांवर सरकारसह समाजाकडूनही आवश्यक ती पावले नक्कीच उचलली जातील, असा विश्वास वाटतो.
 
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रतिवर्षाप्रमाणे रा. स्व. संघ मुख्यालय, रेशीमबागेतून विजयादशमीला उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. रा. स्व. संघाच्या स्थापनादिनी सरसंघचालकांचे संबोधन स्वयंसेवकांसाठीच नव्हे, तर तमाम भारतीयांसाठीही उद्बोधकच असते, तसे यंदाचेही होते. डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या मार्गदर्शनात सामाजिक समरसता, स्वातंत्र्य आणि एकात्मता, कुटुंब प्रबोधन, कोरोनाशी संघर्ष, आरोग्यासंदर्भात आपला दृष्टिकोन, आपली आर्थिक दृष्टी, लोकसंख्या धोरण, वायव्य सीमेपलीकडची परिस्थिती, हिंदू मंदिरांचा प्रश्न, आपल्या एकात्मतेचे सूत्र आणि संघटित हिंदू समाज आदी मुद्द्यांवर रा. स्व. संघाची भूमिका मांडली. त्याचे वृत्त व संपूर्ण भाषण आजच्या अंकात दिलेले आहेच. त्यामुळे त्यातील निवडक मुद्द्यांवर येथे भाष्य करणे उचित ठरेल.
 
 
“भारतात सनातन मानवतेच्या मूल्यांवर आधारित विश्वाची धारणा करणारा धर्म प्रभावी झाल्यास स्वार्थी तत्त्वांचे कुत्सित खेळ बंद होतील. हे सर्व होऊ नये म्हणून भारतातील जनता, भारताची सद्यःस्थिती, भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, भारतात राष्ट्रीय नव्या उदयाचा आधार ठरू शकणार्‍या शक्ती या सर्वांच्या विरोधात असत्य, कुत्सित प्रचार करून जगास आणि भारतीय जनतेला संभ्रमित करण्याचे काम केले जात आहे,” असे सरसंघचालक म्हणाले. विकसनशील भारतात आर्थिक, सुरक्षा, ऊर्जा, वैद्यकीय, माहिती-तंत्रज्ञान, पायाभूत सोयी-सुविधा, रोजगार, वस्तुनिर्मितीसह विविध क्षेत्रांत अनेक विकसित देशांना पछाडण्याची क्षमता आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार गेल्या सात वर्षांपासून भारताच्या याच क्षमता संवर्धनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. पण, त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत व भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन व्हावी, असे देशांतर्गत व देशाबाहेरील स्वार्थी तत्त्वांना वाटते. त्यातूनच भारताच्या बदनामीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न केले गेले. गेल्या सात वर्षांत देशात उद्भवलेली विविध निरर्थक आंदोलने, निदर्शने, दंगली, कोरोनाकाळातील अपप्रचाराच्या बातम्या, जम्मू-काश्मीरविषयी केलेले निराधार वार्तांकन, कथित शेतकर्‍यांनी दिल्लीभोवती घातलेला वेढा वगैरेंचा त्यात समावेश होतो. यातून भारतात मजबूत सरकार नाही, भारतात अस्थिरतेचे वातावरण आहे, भारतात मानवाधिकाराचे रक्षण केले जात नाही, असे ठसवण्याचा उद्योग देशविरोधी स्वार्थी घटकांनी केला. कारण, तसे न केल्यास भारताची जागतिक पटलावरील प्रतिमा उजळ होईल व त्यातून आपले स्वार्थ साधले जाणार नाहीत, अशी भीती त्यांना होती. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे विधान तसेच स्वार्थी तत्त्वांपासून सावध, सजग राहून स्वत:स व समाजास वाचवण्याचा दिलेला इशारा महत्त्वाचा, विचारणीय व कृतिप्रवण करणारा.
 
 
 
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “आपल्या समाजामध्ये ‘स्व’संदर्भातील अज्ञान, अस्पष्टता आणि अश्रद्धा याच्या जोडीने आजकाल जगात अत्यंत वेगाने प्रचारित होत असलेल्या गोष्टी या स्वार्थी शक्तींच्या कुटील खेळांसाठी सोयीच्या झालेल्या आहेत. ‘बिटकॉईन’सारखे निर्बंध नसलेले चलन मुक्त आर्थिक स्वैराचाराचे माध्यम होऊन सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेपुढे आव्हान म्हणून उभे राहू शकते. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरून काहीही प्रदर्शित होते आणि कोणीही ते पाहते, अशी अवस्था आहे.” सरसंघचालकांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहायला हवे. कारण, आभासी किंवा ‘क्रिप्टो करन्सी’मुळे पारंपरिक अर्थव्यवस्थेपुढे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी अजूनही ‘क्रिप्टो करन्सी’ला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. तर भारताने सरकारनियंत्रित ‘क्रिप्टो करन्सी’ सादर करणार असल्याची घोषणा केली होती. कारण, कोणत्याही देशाला अनियंत्रित ‘क्रिप्टो करन्सी’ नको आहे, त्यातून देशादेशांपुढे, समाजापुढे संकटाची रांग लागू शकते, म्हणूनच ‘क्रिप्टो करन्सी’वर एकतर बंदी घातल्याचे वा सरकारनेच त्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते, तर ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर समाज व देशविरोधी मजकूर मोठ्या प्रमाणावर दाखवला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारताचे, भारत सरकारचे व प्रामुख्याने हिंदू समाजाचे प्रतिमाहनन करण्याचे कितीतरी उद्योग ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरून केले गेले. विशिष्ट हेतूने, लक्ष्य करून केल्या गेलेल्या मजकूर प्रसारणाने देशासह ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म जिथे जिथे उपस्थित आहे, तिथे तिथे नकारात्मकताच पोहोचली. त्यामुळे ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मसारख्या नव्या व बहुसंख्येला हाताळता येणार्‍या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर झाल्यास ते समाज व देशासाठीच उपयुक्त ठरेल.
 
 
“कोरोनाच्या दोन लाटांमधील ‘लॉकडाऊन’मुळे देशाच्या आर्थिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. ते नुकसान भरून काढून देशाचे अर्थचक्र पहिल्यापेक्षा अधिक वेगाने गतिमान करण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे,” असे सरसंघचालक म्हणाले. कोरोनाचे संकट व पहिल्या ‘लॉकडाऊन’नंतर केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची घोषणा करत 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतरही विविध क्षेत्रांना आधार देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली. त्यातून देशातील अर्थक्षेत्र वेगाने सावरत असल्याचे दिसून येते. देशाच्या निर्यातीत सातत्याने होत असलेली वाढ, परकीय गुंतवणूकदारांनी दाखवलेला उत्साह, शेअर बाजाराने घेतलेली विक्रमी झेप यातून भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसते. तथापि, दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट कोसळल्याने देशाला पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने प्रगती साधावी लागेल, नुकसान भरून काढावे लागेल. अर्थात, कोरोना संकटाचा सामना करण्याचा आत्मविश्वास व सामर्थ्य भारतात आहेच व त्याची प्रचिती दिसूनही येत आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने संकटाचा सामना करून भारतीय अर्थचक्र नक्कीच सुरळीत होईल, यात शंका नाही.
 
 
दरम्यान, देशाच्या लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही सरसंघचालक म्हणाले. भारत प्रारंभापासून हिंदूबहुल म्हणून ओळखला जातो. पण, मुस्लीम लांगुलचालन, बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरी, ख्रिश्चन मिशनर्‍यांना विना आडकाठी धर्मांतराची संधी मिळाल्याने देशातील अनेक राज्यातील लोकसंख्येत उलटफेर झाल्याचे दिसते. पश्चिम बंगाल, आसाम व बिहारच्या सीमावर्ती प्रदेशातील अनेक जिल्हे मुस्लीमबहुल झाले असून, त्याचा उपद्रव स्थानिकांना, हिंदूंना होत आहे. पूर्वोत्तरातील अनेक राज्यांत ख्रिश्चनांची संख्या वारेमाप वाढली असून, संघटित धर्मांतराचा तो परिणाम आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे; अन्यथा पुण्यभू व पितृभू भारत नसलेल्यांची लोकसंख्या वाढल्यास त्याचे दुष्परिणाम राष्ट्रविखंडनाच्या रूपात इतिहासकाळापासून भारताने भोगलेले आहेत. डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रतिपादित केलेला लोकसंख्या धोरण पुनर्विचाराचा मुद्दा त्यामुळेच महत्त्वाचा व देशाच्या एकता-अखंडतेच्या दृष्टीने गंभीर ठरतो.
 
 
 
सोबतच अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट आणि पाकिस्तान, चीन व तुर्कस्तानच्या हातमिळवणीने भारताच्या वायव्य सीमेवर उद्भवलेल्या आव्हानाकडेही सरसंघचालकांनी लक्ष वेधले. त्यातच “जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ठरवून केलेली हिंदू नागरिकांची हत्या पाहता या संकटाच्या समूळ उच्चाटनासाठी गतिमान प्रयत्न करायला हवेत,” असेही ते म्हणाले. तसेच “हिंदू मंदिरांचे संचालन हिंदू भक्तांच्याच हाती राहील आणि हिंदू मंदिरांच्या संपत्तीचा उपयोग देवाच्या पूजेसाठी व हिंदू समाजाच्या सेवा व कल्याणासाठीच व्हावा,” असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. तसेच देशातील वाढत्या ‘ड्रग्ज’च्या व्यसनावर चिंता व्यक्त करत, “त्याचे पूर्ण निर्मूलन करावे लागेल,” असे ते म्हणाले. एकूणच सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात केवळ रा. स्व. संघाचे स्वयंसेवकच नव्हे, तर सर्व भारतीयांना दिशादिग्दर्शन केल्याचे स्पष्ट होते. येत्या काळात संबंधित मुद्द्यांवर सरकारसह समाजाकडूनही आवश्यक ती पावले नक्कीच उचलली जातील, असा विश्वास वाटतो.
 
@@AUTHORINFO_V1@@