चायबागान(भाग-१)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

tea plantation 2_1 &


दोन वर्षांपूर्वी नवरात्रीच्या दिवसांत आसाममधील चहामळ्यांत भरपूर म्हणजे २२ दिवस भटकायची संधी मिळाली होती. गुवाहाटीपासून जो प्रवास सुरु झाला तो नागांव, तेजपूर, गोलाघाट, जोरहाट, तिनसुकियावरून परत गुवाहाटीत येऊन संपला. हिरव्या हिरव्या चहामळ्यांत करपलेली आयुष्यं बघताना कुठे-कुठे आशेचे ‘ओएसिस’ही नजरेला पडत होते. या प्रकल्पाचे काम करताना माझ्या रोजनिशीत शब्दबद्ध केलेले छोटेखानी अनुभव या लेखात मांडत आहे. पुढच्या लेखात या समाजाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ...

प्रसंग १

आज अशीच नेहमीप्रमाणे एका चहामळा मजुरांच्या वस्तीतून भटकंती चालू होती. डोक्यातल्या आणि पायाच्या दोन्ही भिंगर्‍या वेगात गरगरत होत्या आणि नजरेने तिला ‘नोटीस’ केलं. ‘शॉक’ बसावा, तसा पावलांना कचकन ‘ब्रेक’ लागला.माझ्याबरोबरच्या आसामी बोलणार्‍या ताईला म्हटलं, “हिला विचार, लग्न कधी झालं?” केवळ १३ वर्षांची होती. कुणाच्या तरी तान्ह्या मुलाला घेऊन घराच्या कुंपणाशी बसली होती. जुनीच पण साडी नेसली होती. नेसली कसली, त्या छोट्या कुडीवर साडीचे वेढे घेऊन गुंडाळली होती.जरा थांबून चौकशी केली. तिचे ‘सो कॉल्ड’ सासरेबुवा, सासूबाई बाहेर आले. नवरा (नवरा म्हणावं का? अजून लग्न झालेलं नाही. पळून आली. तीन महिने झाले आहेत.) २० वर्षांचा. इथे अशा मुलीची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरच त्यांचं लग्न लावून देतात. नाहीतर पोलीस पकडतात. मग त्यानंतर त्या मुलीला ‘सिंदूर लगाना अलाऊड’ असतं. पण, तोवर हे असेच राहत असतात एकत्र बिनलग्नाचे. काय भारी सोय करून ठेवली आहे ना!इकडे आईबाप पण अशा मुलींना परत घरात घेत नाहीत. वर्षभरात एखादं बाळंतपण आलं, तर पोर (म्हणजे ही आई होऊ घातलेली पोर) जगेल की नाही, याची शाश्वती नसते.मुलगी आपल्या घरी गेली, ‘नया पैशाचा खर्च नाही,’ म्हणून आईबाप सुटकेचा श्वास टाकतात. सासू-सासर्‍यांना आयती कमावणारी (हो ही बालमजूर असूनही चहाच्या मळ्यात मजुरीवर जाते), घरकाम करणारी सून मिळते. या सर्रास घडणार्‍या गोष्टी आहेत. चिक्कार, मागाल तितकी उदाहरणं! पळून जाऊन लग्न करण्याचं पेव फुटलंय इथे. म्हणजे लग्न करण्याची हीच रूढ, लोकमान्य पद्धत होऊ लागली आहे. ’‘यहाँ सब ऐसाही करते हैं दीदी...” दुसर्‍या वस्तीवर एका १६ वर्षांच्या पळून आलेल्या मुलीला जाब विचारल्यावर हे उत्तर मिळालं.प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतो. बारीकशा मूर्खपणात खरं नुकसान कोणाचं होतं?मरे! कसले मानवाधिकार आणि कसला डोंबलाचा स्त्रीवाद!



प्रसंग २

काल अशीच एका चहामजुरांच्या वस्तीतून भटकत होते. ‘लाईन’ म्हणतात या वस्त्यांना! अजूनही ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी ठेवलेल्या नावांनीच या जागा ओळखल्या जातात. म्हणजे उदा. ’लाईन नं. १४ .’ हे वस्तीचं नाव आहे बरं! कसलीही सांस्कृतिक, सामाजिक ओळख नसलेलं. जास्तीत जास्त छान नाव ऐकलं ते ’नतून लाईन’ म्हणजे ’नवी लाईन किंवा वस्ती.’ बाकी ओळख तर चहामळ्यांच्या नावाने असते. म्हणजे ‘एबीसी लाईन’, ‘एक्सवायझेड टी इस्टेट’ हाच पत्ता कागदपत्री लिहिला जातो.या गावाची एकच ऐतिहासिक ओळख. भारतातल्या विविध राज्यांतून जे मजुरांचे गट हाकारत, ताबडवत आणले त्यातला १४नंबरचा गट या चहामळ्यात वसवला. बस्स! अजून काही वेगळी ओळख निर्माण होण्याची गरजच काय यांना?



अशीच अजून एक गंमत!


इथे वर्षाचे १२ महिने चहाच्या मळ्यात काम करणार्‍या कामगारांना ‘पर्मनंट वर्कर’ म्हणतात आणि मुख्य ‘सिझन’मध्ये जेव्हा जास्त काम असतं तेव्हा जास्तीचे जे मजूर ‘एम्प्लॉय’ केले जातात आणि जे ’पर्मनंट ऑर रजिस्टर्ड एम्प्लॉई ऑफ द इस्टेट’ नसतात, अशा सगळ्या लोकांना ’फालतू’ असे म्हटले जाते.हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की कोणालाच याचा काही राग येत नाही.
मी जेव्हा म्हटलं, ”जे पर्मनंट नाहीत ते ’स्वतंत्र आहेत, स्वतःच्या मनाचे राजे’ आहेत, फालतू नाहीत, तेव्हा समोरच्यांच्या डोळ्यात उजळणार्‍या ज्योती, एकमुखाने बाहेर पडणारा ‘हाँ...’ असा उद्गार मला या जुनाट, चिखल, खड्डे, शेण, प्लास्टिकने भरलेल्या रस्त्यांमधून चालायला ताकद देतो.ती ’'Moment of liberation’ पकडायला मी आज परत नव्या वस्तीत भटकणार असते.

प्रसंग ३
गावाचं समग्र निरीक्षण हा माझ्या कामाचा भाग आहे. मग यात खूप गोष्टी येतात. इथे दुर्गापूजा ‘बड़ी धुमधामसे’ साजरी करतात. देवीचा मोठा मंडप, डेकोरेशन, थाट असतो एकदम. चार दिवस चहामळा, कारखाना, शाळा सगळ्याला सुट्टी होती. विजयादशमीला शेवटची सुट्टी झाली मग आज आता शाळा सुरू झाल्या असणार, शिक्षक, मुलं सहज भेटतील, अशा आशेने घाईघाईने आम्ही एका गावातल्या शाळेजवळ गेलो. पाहतो तर शाळेला कुलूप! मग घर शोधत मुख्याध्यापकांकडे पोहोचलो. तिथे कळलं आज शाळेत दोन-तीन मुलंच आली होती. मग एक वर्ग घेऊन शाळा सोडून दिली. मी आश्चर्याने थक्क! असं काही अजून भारताच्या कुठल्या भागात होत असेल, यावर मला विश्वास होईना!आपण शहरी माणसं. शाळा, अभ्यास, तेथील ‘परफॉर्मन्स’ या गोष्टी आपल्या सामान्य कौटुंबिक जीवनाचा मोठा भाग व्यापून टाकत असतात. पण, भारतात अजूनही अशी अनेक खेडी, जागा आहेत, ज्यांना शाळा, अभ्यास, शिक्षण या गोष्टींचं कणभरही महत्त्व वाटत नाही. मी रोज नव्या गावात दुपारचं जेवण घेते. प्रत्येक गावात हीच कहाणी. पाचवीपर्यंत मुलं कशीबशी शाळेत जातात. मग सहावीपासूनच वर्गसंख्या कमी होऊ लागते. मुलं शाळा सोडून देतात. विशेषतः मुली! बहुतांश ठिकाणी आईबापच पोरींनी घरी बसवतात. हे बाहेर कामावर गेले की, घरकाम करायला लहान भावडांना सांभाळायला घरात कोणीतरी हवं म्हणून...




पोरगे तर एकदम टगे! दिवसेंदिवस ’जुवा’ (जुगार) खेळण्यात घालवतात. पण, शाळेत पाऊल टाकत नाहीत. याबद्दल त्यांना फारसं कोणी हटकतही नाही. त्यांचं काही चुकतंय हेच मुळात इथे कोणाला समजत नाही. चहामळ्यांच्या पलीकडे अजूनही काही जग आहे. आपण त्या मोठ्या जगाचा भाग आहोत, याची यत्किंचितही जाणीव नाही. मान्य आहे की, सुधारणा लगेच होत नसतात. पाच-दहा वर्षांपूर्वीपेक्षा परिस्थिती आता खूप चांगली आहे, असं इथले लोक सांगतात. पण, तरीही अशी अर्ध्यात शाळा सोडलेल्या मुलांचं प्रमाण जास्तीत जास्त ७० टक्के ते कमीत कमी ३० टक्के आहे. ही हादरवणारी गोष्ट नाही?( हे अंदाजे आकडे आहेत.)
’यहाँ ऐसाही चलता हैं दीदी’ माझ्या बरोबरची ताई मला समजावत म्हणाली.


प्रसंग ४

आज दुपारच्या शांत वेळी एका दुर्गापूजेच्या पंडालमध्ये एक बैठक ठरली होती. एका कार्यकर्त्याकडे नेहमीप्रमाणेच वरणभात, बटाट्याची भाजी आणि तळलेले पापड असं पोटभर जेवून जरा लवकरच बैठकीच्या जागी पोहोचलो. नुकत्याच चालू लागलेल्या बाळांपासून तरुण मुलं आणि अगदी म्हातार्‍यांपर्यंत सर्व गट तिथे हजर होते. ते आपापल्या वयोगटात वावरत होतेच, पण एकमेकांसोबतही खेळ चालू होते. दोन जाड पाच फुटी बांबूंना दीड फुटांवर एक आडवा बांबू बांधला होता आणि त्यांवर पाय ठेवून बांबूवरून चालण्याचे गमतीशीर उद्योग पोरं करीत होती. वडील मंडळी विड्या फुंकत, तंबाखू-मावा हातावर चोळत त्यांना प्रोत्साहन देत होती. आम्हालाही या खेळाची मजा वाटत होती. काही पोरं लपाछपी खेळत होती. परिसर बघताना सहज त्यांच्या लपायच्या जागी गेले, तर मला भडभडूनच आलं. गुटख्याच्या वासाने आणि पाकिटांच्या खचाने ती जागा भरली होती. तिरमिरीत बाहेर आले आणि चौकशी केली.अगदी सात-आठ वर्षांच्या मुलापासून सगळ्यांना इथे काही ना काही व्यसनं आहेत, असं लक्षात येत गेलं. ज्या ज्या शाळांना भेटी दिल्या, तिथे कटाक्षाने याविषयी चौकशी सुरू केली. अनेक समजूतदार शिक्षक भेटले. पण, या अमली पदार्थांच्या ‘लॉबीज्’ इतक्या सशक्त आहेत की, हे दुष्टचक्र भेदणे येरागबाळ्याचे काम नाही, हे मी समजून चुकले.
व्यसनांच्या अधीनतेने या समाजाचं एकूणच जीवनमान कमीच आहे. ४५-५०व्या वर्षी माणूस गेला तरी सगळं जीवन उपभोगून गेला, असा सार्वत्रिक समज आहे. हे सगळं कसं बदलायचं?

खूप काम पडलंय. कधी करायचं? कोणी करायचं? कसं करायचं? प्रश्नच प्रश्न आहेत... (क्रमश:)


- अमिता आपटे




@@AUTHORINFO_V1@@