‘दत्तघाटा’च्या पायरीवर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

da ma miradar 2_1 &n


अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रख्यात ज्येष्ठ विनोदी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, पंढरपूरचे सुपुत्र, पंढरीभूषण दत्ताराम मारुती उर्फ द. मा. मिरासदार तथा दादा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वार्धक्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.
वार्धक्याने’ हा शब्द खरंतर दमांच्या फक्त वयाला अन् शरीरालाच लागू आहे म्हणूनच म्हणायचा, नाहीतर त्यांच्यासारख्या उमद्या मनाच्या व्यक्तीचं वय अखंड तरुणच असतं. त्या तरुणपणाचं, दीर्घायुष्याचं गमक ते ज्या जिंदादिल वृत्तीने जगले त्यांनाच माहीत.
दीर्घायुष्याचे मर्म माझ्या समजणे सोपे नव्हे...‘मृत्यूसही वाटे याला हातही लावू नये...’ अशा पाटणकारांच्या ओळीत चपखल बसणारे दमा आज आपल्याला सोडून गेले!आमच्या पंढरीच्या चंद्रभागेला अनेक घाट आहेत. त्यात श्री विठ्ठल मंदिरासमोरील महाद्वार घाट व श्री दत्त मंदिराशेजारचा दत्तघाट हे दोन घाट जास्त वर्दळीचे आहेत. तसं येण्याजण्याच्या सोयीसाठी सगळे घाट वापरले जातात. पण गौरी-गणपती विसर्जनापासून ते पुराचं पाणी बघायच्या निमित्तानं म्हणा किंवा वाळवंटात खेळायला जाताना दोस्ताची वाट बघत बसण्यासाठी म्हणा प्रामुख्यानं दत्तघाटाच्या पायर्‍यांवर न विसावणारा पंढरपूरकर जसा दुर्मीळ तसं महाराष्ट्र साहित्य पंढरीतील विनोदाच्या खळाळणार्‍या लेखनप्रवाहाच्या कडेला बांधलेल्या अनेक घाटांपैकी आमच्या या ‘द.मा.’ नावाच्या दत्तघाटाच्या पायरीवर न बसता पुढं गेलेला वाचक दुर्मीळ,असं मी निक्षून सांगेन.दमांचं लहानपण पंढरपुरात ज्या ज्या ठिकाणी गेलं, त्या त्या प्रत्येक पावन ठिकाणी आम्हीही मुक्तपणे संचार केला. त्यांच्या आमच्या लहानपणात तशी ५०-५५वर्षांची तफावत. काळ बदलत गेला. देवळं फारच कडेकोट बंदिस्त झाली, तरीपण बर्‍यापैकी मोकळंढाकळं पंढरपूर आम्ही पाहिलं आणि जे जुनं पंढरपूर बघायचं राहिलं ते मिरासदारांच्या अनेक साहित्यातून पाहिलं. इयत्ता आठवीला आम्हाला दमांच्या वाचनाच्या जबरदस्त आवडीमुळे पंढरपूरच्या नगरवाचन मंदिरात अडकून पडल्यावरील अनुभव कथनाचा एक धडा होता. तो धडा वाचताना आपला गाव, आपला माणूस म्हणून नेहमी गदगदून यायचं. त्या १५० वर्षे जुन्या नगरवाचनच्या कट्ट्यावर कित्येक वर्षे दररोज पंढरपुरी भत्त्याचं भुस्कट पाडत आमच्या मित्रांची गप्पांची मैफील असायची. त्या प्रत्येक वेळी गॅलरीत वर बघताना दमा लहानपणी इथं अडकून बसले होते, या गोष्टीची आठवण जरूर व्हायची, अजूनही होते.
दमांनी आपल्या लिखाणातून मिश्किल पंढरपूर व परिसरातील अनेक पात्रे, अनेक गप्पांचे किस्से, पंढरपूरची फळी संस्कृती, चुरमुर्‍याचा भत्ता निवांत पंढरपुरीपणा अख्ख्या जगभर पसरविला. ‘माझी पहिली चोरी’, ‘भानांचं भूत’, ‘ड्रॉईंग मास्तरांचा तास’, ‘व्यंकूची शिकवणी’, ‘धोक्याचं वळण’, ‘माझ्या बापाची पेंड’ अशा कित्येक कथाकथनातून आमचं लहानपण, तरुणपण त्यांनी समृद्ध केलं. आमच्या पिढीने कोल्हटकर, गडकरी, आचार्य अत्रे, भालाकार भोपटकर, चिं. वि. जोशी पाहिले नाहीत, हे आमचं दुर्भाग्य, पण आम्ही दमा पाहिले, त्यांच्या पहिल्या रांगेत बसून पंढरपुरातील व्याख्यानातून, अनेक कॅसेट्सच्या माध्यमातून आम्ही त्यांना बघितलं, अनुभवलं, थोडा फार सहवास लाभला, हे आमचं परमभाग्यच! ही सगळी विनोदाच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि त्यांचे किस्से यावर त्यांचं एक स्वतंत्र व्याख्यान आहे, ते ऐकताना आम्ही या मंडळींच्या जणू सहवासातच आहोत, असंच भासलं. हल्ली आपल्याच क्षेत्रातील जुन्या-नव्या सहकार्‍यांचं मुक्त कंठाने कौतुक सहसा कुणी करत नाही. केलं तरी ते ओव्याचं रान तुडवल्यासारखं करतात, पण दमांच्या व्याख्यानातून नेहमी सकारात्मक विनोदी खेळकरपणाच दिसला. पंढरपूरच्या वारीत भेटणारा प्रत्येक वारकरी जसा समोरच्याच्या वयाची पर्वा न करता एकमेकांच्या पायावर डोकं ठेवतो, तीच सात्त्विक भावना ज्यांच्या ठायी जाणवली असे साहित्य पंढरीचे परंपरेचे वारकरी दमा! ‘साहित्य अकादमी’चा ‘महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार’, ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’, ‘पुलोत्सव जीवनगौरव’, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, ‘महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ’, महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या अनेक संस्थेवरील मानाची पदं अशा अनेक गौरवांनी युक्त असलेले दमा पंढरपूरला आल्यावर पिढ्यान्पिढ्या वारी करणार्‍या नियमाच्या निराभिमानी वारकर्‍यासारखे पंढरपूरला यायचे अन् वारी पोहोचवून आपला आनंद इथं ठेवून इथला आनंद गाठीशी बांधून परत जायचे.या सर्व गोष्टी माईकच्या कांडीसमोर सडं उभारणार्‍या गोर्‍यापान, लांबरुंद कपाळावर बट येणारे किंचित कुरळे केस, डोळ्यावर जाड भिंगाचा चश्मा, दणदणीत शरीरयष्टी, अंगात सफारी, मूळचे पंढरपूरचे असल्याने बोलता बोलता सतत कमरेवर हात ठेवून, तर कधी सफरीच्या वरच्या दोन खिशात हात घालत, अधून मधून विस्मयचकित होत, प्रत्येक शब्द भिजवून श्रोत्यांसमोर मांडण्याची लकब असणार्‍या, श्रोत्यांमध्ये आपल्या मातीचा ओलावा पसरवणार्‍या विनोदाची मिरासी मिरवणार्‍या ‘द.मा.’ नावाच्या आपल्या माणसात जाणवल्या. आजपर्यंत प्रत्यक्ष व्याख्यानांच्या, कथाकथनांच्या, स्नेहसमेलनांच्या अथवा अप्रत्यक्ष कॅसेट्स, पुस्तकांच्या माध्यमातून दमांचा सहवास -


हसतील ना कुसुमे जरी,
ना जरी म्हणतील ’ये’...
पाऊल ना टाकू तिथे,
बाग ती अमुची नव्हे...

असा पाटणकरांच्याच शब्दांत मैफील खळाळती ठेवणारा होता. मग ती हजारो माणसांची मैफील असो अथवा एकांतवासाची स्वानंदाची मैफील असो.लहानपणी दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांची पुस्तकं वाचताना त्यांच्या कथेतील ‘गणामास्तर’, ‘नाना चेंगट’, ‘बाबू पैलवान’, ‘शिवा जमदाडे’, ‘रामा खरात’ यांसारखी पात्रं आजूबाजूला वावरल्याचा भास व्हायचा, कधी कधी एखाद्या मनोवृत्तीच्या व्यक्तीत त्या पात्राचं दर्शनही घडायचं. दमा, पुलं, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, वपु या माणसांनी माणूस कसा बघावा आणि मांडावा, हे आपल्या लिखाणातून शिकवलं! त्यातून दमा हे पंढरपूरचे असल्याने भाषेतून, बोलण्यातून जास्त घरचे वाटायचे. ज्या त्या परिसरातील काही काही वेगळी शब्दसंपत्ती, म्हणी असतात, ते शब्द उच्चारण्याचा वेगळा लहेजा असतो. ‘व्हय का?’, ‘काय लगा, हुडक की’, ‘काय नाय निवांत’, ‘चकाट्या पिटत...’ अशा प्रकारच्या अनेक शब्दांना त्यांच्या लिखाणातील समावेशाने साहित्यिक मूल्य प्राप्त झालं. आजपर्यंत त्यांनी २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपट कथा लिहिल्या. त्या प्रत्येक कलाकृतीत त्यांनी आमच्या पंढरपूरच्या मातीचा वास कोणत्यातरी पात्राच्या माध्यमातून पेरला. यावरून त्यांची आपल्या गावाशी असलेली नाळ किती घट्ट होती हे कळून येतं. एक काळ महाराष्ट्राच्या साहित्य दरबारातील विनोदाचं भांडार मुक्तहस्ताने उधळून महाराष्ट्रातील फळी-कट्टा-पार-चावडीपासून अंगण-ओसरी-माजघर-देव्हार्‍यापर्यंतच्या लहान-थोर तमाम मंडळींना खळखळून हसायला लावणारी द. मा. मिरासदार, वसंत सबनीस, वि. आ. बुवा ही आघाडीची दिग्गज मंडळी माझ्या पंढरपूरची होती, ही गोष्ट आम्हा पंढरपूरकरांना निश्चित भूषणावह आणि अभिमानास्पद आहे.


1997 साली दमा जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, त्यावेळी पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने, तमाम पंढरपूरकरांकडून त्यांचा नागरी सत्कार कवठेकर प्रशालेत केला होता. त्यावेळी त्यांच्या पंढरपुरातील जुन्या घरापासून ते सत्काराच्या ठिकाणापर्यंत कडकडकडकड हलगी-ताशाच्या सुरात निघालेली पारंपरिक पद्धतीची पायी मिरवणूक मला अजून आठवतेय. मी त्यावेळी माझ्या सा. ‘पंढरी प्रसाद’चा विशेषांकही प्रसिद्ध केला होता. त्याचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळी कार्यक्रम संपल्यावर आवर्जून त्यांच्या पायावर डोकं ठेवताना, त्यांच्या शेजारी उभं राहताना विशीच्या आतल्या वयाच्या मला फार दडपण आलं होतं. पण, त्यांच्या जन्मजात मिश्किल स्वभावानं त्यांनी एका वाक्यासरशी वातावरण हलकं केलं. पाठीवर थाप मारली, आपुलकीनं चौकशी केली. या गोष्टींच फक्त जाताना वर घेऊन जायच्या, बाकी सगळ्या खाली ठेवायच्या.घरात वडिलांची वकिली असल्यानं आसपासच्या खेड्यापाड्यातून अनेक प्रश्न, तंटे-बखेडे घेऊन येणारे हरतर्‍हेचे अशील, सहा भाऊ तीन बहिणींचे एकत्र कुटुंब, लहानपणापासून प्रचंड वाचनाची आवड, आध्यात्मिक अधिष्ठान असणार्‍या पंढरपुरात असणारी चार वार्‍याबरोबर सतत असणारी विविध नमुन्यांच्या माणसांची वर्दळ, उमेदीच्या काळात स्वीकारलेला शिक्षकी पेशा, त्यातून आलेला पालक-विद्यार्थ्यांचा सहवास, पत्रकारिता, नभोवणीवरील काही काळ केलेली नोकरी, जाता जाता फळी-कट्टयावर साध्या माणसांमध्ये बसून साधलेला संवाद, तयातून जपलेलं अस्सल खवय्येपण, प्रचंड जिज्ञासू, अभ्यासू वृत्तीतून आलेली स्मरणशक्ती, मूळचा मिश्किल आणि विनोदी स्वभाव, एकत्र कुटुंब पद्धतीत जपलेला बंधुभाव, ज्येष्ठत्व या सर्व बाबींवर जोपासलेल्या दमांच्या संस्कारी विनोदाचा टवटवीतपणा झाडावरून टपकन पडलेल्या तजेलदार फळासारखा पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत असाच टवटवीत राहणार. त्याला ‘कोल्ड स्टोअरेज’मधील अनैसर्गिक ताजेपणाचा दिखाऊपणा राहणार नाही.



एकंदरीत दमांच्या व्यक्तिरेखेचा थोडक्यात सारांश सांगायचा म्हटलं, तर ९८ वर्षांच्या त्यांच्या ज्येष्ठ भगिनीपासून ८० वर्षांचा धाकटा भाऊ ते पाच-दहा वर्षांचं पतवंड असो सर्व मिरासदार पै-पाहुणे जागेअभावी, नोकरी-व्यवसायानिमित्त सगळे दूरवर गेले तरी सण-उत्सवाच्या निमित्तानं सतत एकत्र येऊन आनंद घेतात. यामध्ये अजूनही सर्वांना ‘द.मा.’ नावाच्या दादांचा जिव्हाळा वाटतो आणि दादाही सर्वांमध्ये त्याच मिश्कीलपणे सामील होत. यातून सोयीसाठी वेगळं राहायचं की सोयीस्कर वेगळं व्हायचं हे आपल्या पिढीने शिकण्यासारखं आहे. याच कारणासाठी ‘दमामि’ ही व्यक्ती नसून एक संस्था वाटू लागते. ४०-४५ पुस्तकांना जन्म देणारा आणि वयाच्या नव्वदी नंतरही एवढ्या मोठ्या कुटुंबातील सर्वांच्या लहानमोठ्या समारंभाला आवर्जून हजर असणारा लेकुरवाळा साहित्यिक वयाच्या 94व्या वर्षी आपल्याला सोडून गेला, तरी त्यांचं जाणं अकाली वाटू लागतं.



आध्यात्मिक क्षेत्रात श्री विठ्ठलामुळे पंढरपूर जगभर ओळखलं जातं, पण साहित्य क्षेत्रात ‘दमांच पंढरपूर’ ही ओळखही बरीच रूढ आहे आणि तशीच असावी. गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या धाटणीतील पंढरपुरावर काही लेख माझ्या हातून लिहिले गेले तेव्हा... हे कुठंतरी हे दमांची अनेक पुस्तकं लहानपणी वाचल्यामुळे शक्य झालं. पुढील काळात कितीही विपुल लिखाण झालं, तरी त्यांच्या सारखं लिहिण्यापेक्षा, त्यांचं बघून लिहायला आणि आपल्या गावातील मातीचा सुगंध सर्वदूर पोहोचवायला जास्त आवडेल.

शेवटी कसंय
माझ्या गावच्या पाण्याला,
अबीर बुक्क्याचा सुवास...
किती गेला जरी दूर,
सोबती विठूचाच भास...

या ओळी अशावेळी आतूनच स्फुरतात....कारण, कुण्या अनोळखी साता समुद्रापारच्या माणसाकडून ‘भारीय ओ तुमचं पंढरपूर...’ हे ऐकण्याची मज्जाचं न्यारी आहे. ही मिराशी - सर्वप्रथम दमांनी साहित्यक्षेत्रात मिळविली!दत्ताराम मारुती मिरासदारांसारख्याच्या पुस्तकांच्या संगतीत लहानपण गेलं. त्यांनी सांगितलेल्या, लिहिलेल्या किश्यात तरुणपण सरतंय. आमच्या चंद्रभागेच्या वाळवंटातून या दत्त मंदिरापर्यंत यायच्या आधी, त्या घाटाच्या पायर्‍या चढतानाच किती दम छाटतो हे घाट चढणार्‍यालाच जास्त माहीत. हे मिरासदारांसारख्या ‘द.मा.’ नावाच्या व्यक्तीलाच शक्य झालं. त्यामुळे आयुष्यभर या दत्तघाटाच्या पायरीवर बसून त्यांची पताका खांद्यावर घेण्यातच आम्ही धन्यता मानू...!


- मंदार केसकर


@@AUTHORINFO_V1@@