आव्हाडांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करा - किरिट सोमय्या

15 Oct 2021 20:17:03

Kirit Somaiya_1 &nbs
ठाणे : ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणी अटक झालेल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दिली. अभियंता अनंत करमुसे व त्यांच्या वकिलांसमवेत किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी ठाण्यात वर्तकनगर पोलिसांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आव्हाड हे सराईत गुन्हेगार ठरले असुनही ठाकरे-पवार सरकारने आव्हाडांविरोधात कलमे लावताना फसवाफसवी करून अटकेची बनवाबनवी केल्याची टिका सोमय्या यांनी केली.
 
 
 
ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहणारे करमुसे यांना गतवर्षी ५ एप्रिल रोजी घरातुन उचलुन नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याने करमुसे यांनी सकृतदर्शनी पुराव्यांसह सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार, न्यायालयाच्या बडग्याने पोलिसांनी गुरुवारी (दि.१४ ऑक्टो.) रोजी आव्हाड यांना अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. या अटकनाट्याची गंधवार्ताही पोलिसांनी तक्रारदार तसेच माध्यमांना न दिल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
 
 
 
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी सोमय्या यांनी करमुसे यांच्यासोबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली. याबाबत बोलताना सोमय्या यांनी, आव्हाडांच्या अटकेची कारवाई म्हणजे पोलिसांची सेटींग असुन एकप्रकारे फसवाफसवी, बनवाबनवी असल्याचा आरोप केला. तसेच जितेंद्र आव्हाड याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितलं आहे.यावेळी त्यांनी ठाकरे - पवार सरकारवर जोरदार टीका केली.करमुसे प्रकरणातील गुन्ह्यातील कलमे मान्य नसल्याचे करमुसे यांचे वकील अॅड.अनिरुद्ध गानू यांनी सांगितले.या कलमांचा अभ्यास करून ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार असल्याचे वकिलांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0