भारतीय अर्थविचार जगाला मार्ग दाखवू शकतो - सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2021
Total Views |
rss_1  H x W: 0

जागतिक कल्याणाचे सामर्थ्य केवळ हिंदू समाज आणि हिंदू संस्कृतीमध्ये
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सध्या प्रचलित जागतिक आर्थिक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नव्या व्यवस्थेची गरज असल्याचा विचार आता जगभरातून होत आहे. अशा परिस्थितीमध्ये ‘संयमाने उपभोग’ यावर आधारित भारतीय अर्थविचार जगाला मार्ग दाखवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शुक्रवारी नागपुर येथे विजयादशमी उत्सवास संबोधित करताना केले.
 
 
स्वदेशीस कालसुसंगत बनविणे आणि विदेशी देशसुसंगत बनविणे या संकल्पनेनुसार वाटचाल करणे ही आता काळाची गरज आहे. भारतीय अर्थविचारामध्ये तेच सांगितले आहे. संपूर्ण जगभरात सध्या प्रचलित आर्थिक व्यवस्थेमुळे संकटे आणि अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या व्यवस्थेत बदल करण्याची गरज प्रत्येक देशाला वाटते आहे. अशा परिस्थितीमध्ये मानव हा संसाधनांचा केवळ विश्वस्त आहे, त्यामुळे संसाधनांचा संयमाने उपभोग घ्यावा या पायावर उभा असलेला भारतीय अर्थविचार हा सर्वमान्य होण्याची वेळ आली असून हाच अर्थविचार संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकतो, असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
 
 
 
 
 
परस्परांविषयी आत्मियता, स्वातंत्र्याचा आदर आणि सर्वांचे कल्याण या मानवता धर्मावर भारतीय संस्कृती आधारित असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मानवता धर्म म्हणजेच हिंदू धर्म. हिंदू ज्यावेळी संघटित होईल त्यावेळी तो श्रीमद्भगवद्गीतेची आणि विश्वकल्याणाचीच भाषा बोलेल, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले होते. आजची स्थिती पाहिल्यास अगदी तसेच घडताना दिसत आहे, संपूर्ण मानवजात आज हिंदू समाजाकडे आशेने पाहत आहे. कारण, विश्वशांतीसाठी हिंदू तत्त्वज्ञानावरच प्रत्येकाचा विश्वास आहे. मात्र, जगातील कलह संपुष्टात आल्यास त्यावर चालणारी अनेकांची दुकाने बंद होणार आहेत; त्यामुळेच हिंदू समाजाची मानहानी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. भारतीय धर्म, संस्कृती, जीवन, परंपरा, इतिहास आणि व्यवस्था यांची निंदा करण्याचे प्रयत्न होत आहेत, भारतींच्या मूल्यपद्धतीवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीवर ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारेही सुक्ष्म सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात सरकार आपल्या पद्धतीने प्रतिकार करेनच, मात्र त्याविरोधात समाजानेही जागरूक होणे महत्वाचे असल्याचे सरसंघचालकांनी यावेळी नमूद केले.
 
 
हिंदू समाजाच्या मंदिरांचे संचालन हे हिंदू समाजाकडेच असावे, याविषयी आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. देशात सध्या काही मंदिरांचे संचालन सरकारकडे तर काहींचे भक्तांकडे आहे. मात्र, ज्या ठिकाणी अव्यवस्था आहे, लूट माजली आहे. हिंदू मंदिरांची संपत्ती अहिंदूंसाठी, जे हिंदूच्या श्रद्धास्थानांनी मानत नाहीत, त्यांच्यासाठी वापरली जाते. हे योग्य नाही, कारण हिंदू समाजात गरज असलेल्यांची संख्या मोठी आहे. सर्वोच्च न्यायालयानेदेखील मंदिरांच्या संपत्तीची मालकी देवाकडे असून पुजारी केवळ व्यवस्थापक आहेत, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे देशात आता “हम दो, हमारे दो” या लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचेही सरसंघचालकांनी सांगितले.
 
 
समाजाने भयास झुगारून दिल्यानेच पुन्हा दहशतवादी हल्ले
 
 
केंद्र सरकारने कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर काश्मीरी समाजामे आता भय आणि दहशतवादास झुगारून दिले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची मोठी कोंडी झाली असून पुन्हा एकदा भयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी ते टार्गेट किलींगचे प्रकार घडवित आहेत. त्यामुळे या आव्हानाचा सामना करण्यासोबतच काश्मीरी जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
 
 
फाळणीचा इतिहास विसरून चालणार नाही
 
 
देशाच्या स्वातंत्र्यासोबतच फाळणीचे दु:ख भारतीयांना भोगावे लागले होते, तो भारताचा अतिशय़ दुर्दैवी इतिहास आहे. मात्र, तो इतिहास विसरून चालणार नाही, तरुण पिढीला तर तो इतिहास सांगायसाच हवा. कारण, ज्या शत्रुत्व आणि फुटीरतावादामुळे देशाचे विभाजन झाले त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. भारताचे अखंडत्व आणि एकात्मता पुन्हा मजबूत करण्यासाठी फाळणीच्या इतिहासातून धडा घेण्याची गरज आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@