जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था गरजेची : अर्थमंत्री सीतारामन

15 Oct 2021 13:37:22

nirmala sitaraman_1 
नवी दिल्ली : जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था प्रक्रिया गरजेची असल्याचे परखड मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच व्यक्त केले.निर्मला सीतारामन यांनी ‘जी-२०’ सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या (एफएससीबीजी) बैठकीत आपला सहभाग नोंदवला. इटलीच्या अध्यक्षतेखाली, वॉशिंग्टन डी.सी. जागतिक नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या शाश्वत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही देशातून ‘कोविड’विषयक मदतीच्या उपाययोजना लगेच किंवा अचानक काढून घेतल्या जाऊ नयेत, तसेच, वित्तीय स्थैर्य आणि दीर्घकालीन वित्तीय शाश्वततेचे जतन करण्याचा प्रयत्न करावा आणि बाजारपेठेत अकस्मात येणार्‍या वित्तीय अडचणी किंवा जोखीम असल्यास, त्यापासून संरक्षण करण्यासाठीची व्यवस्था असावी, या मुद्द्यांवर याविषयी बैठकीत चर्चा झाली.


“संकटापासून ते संकटातून सावरण्याच्या स्थितीपर्यंतच्या या प्रवासात, महत्त्वाचे आव्हान म्हणजे सर्वांना लसींची समान उपलब्धता असणे हे आहे. त्यासाठी, गरजू देशांना पाठबळ देणे सुरूच ठेवत, एक लवचिक व्यवस्था विकसित करणे, उत्पादकतेत वाढ करणे आणि संरचनात्मक सुधारणा, ही आपली धोरणात्मक उद्दिष्टे असायला हवीत,” अशी अपेक्षा सीतारामन यांनी व्यक्त केली. महामारीच्या काळात इतर देशांना मदत करण्यात ‘जी-२० ’ समूहाने निभावलेल्या भूमिकेचे तसेच, दुर्बल देशांना कर्जपुरवठा करणे आणि नव्याने ‘एसडीआर’चे वितरण केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी कौतुकोद्गार काढले. या निश्चित केलेल्या देशांपर्यंत हे लाभ पोहोचवण्यासाठी, काही ठोस प्रयत्न करायला हवेत, अशी सूचनाही त्यांनी केली.


“यावेळी सर्व ‘जी-२०’ सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि गव्हर्नर्स यांच्यात हवामान बदलविषयक प्रयत्न अधिक सक्षम करण्याची गरज असल्याबद्दल सहमती झाली. विविध धोरणांमधील अवकाश आणि वेगवेगळ्या देशांची सुरुवात करण्याची वेगवेगळी स्थिती यावर भर देत, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक आराखडा परिषदेच्या आधारावर हवामान बदलाच्या बाबतीत न्याय्य निर्णय घेतले जावेत, यावर त्यांनी भर दिला. तसेच, या समस्येवर यशस्वी तोडगा काढण्यासाठी, हवामान बदलविषयक ‘पॅरिस करारा’च्या तत्त्वांचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे,” असेही सीतारामन म्हणाल्या.


Powered By Sangraha 9.0