कथित शेतकरी आंदोलकांनी तरूणास हात – पाय छाटून लटकवले; दिल्लीच्या सीमेवरील भीषण घटना

15 Oct 2021 15:47:21
murder_1  H x W

कथित शेतकरी आंदोलन हिंसाचाराचे प्रतीक बनत आहे
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या कथित शेतकरी आंदोलकांनी सिंघु - कुंडली सीमेवर एका ३५ वर्षीय तरुणाची त्याचे हात – पाय छाटून आणि सार्वजनिकरित्या लटकावून शुक्रवारी निर्घृण हत्या केली. मात्र, आंदोलनस्थली हत्या करणाऱ्या आंदोलकांशी संयुक्त किसान मोर्चाचा संबंध नसल्याची भूमिका योगेंद्र यादव आणि अन्य नेत्यांनी घेतली आहे.
 
 
केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चा या कथित शेतकऱ्यांच्या आघाडीने गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू केला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांच्या सीमांवर कथित शेतकऱ्यांनी आपले बस्तान बसविले आहे. मात्र, आता हे आंदोलन हिंसाचार आणि अराजकतेचे प्रतीक बनले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
 
 
दिल्ली – हरियाणाच्या सिंघु कुंडली या सीमेवर शुक्रवारी आंदोलनस्थळाच्या मुख्य व्यासपीठामागे ३५ वर्षीय लखबीर सिंग या तरुणाची हात – पाय कापून आणि जाहिररित्या बॅरिकेडला लटकावून निर्घृण हत्या केली. यावेळी त्याचा डावा हात पूर्णपणे कापून लटकविण्यात आला. पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील चीमा या गावातील रहिवासी असलेल्या लखबीर सिंग याच्या कुटुंबात पत्नी आणि तीन लहान मुली होत्या. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या निहंगा शिखांच्या समुदायाने ही हत्या केली आहे. लखबीर सिंग याने गुरू ग्रंथसाहिबचा अपमान केल्याचा दावा निहंगा शिखांच्या समुदायाने केला आहे.
 
 
दिल्ली – हरियाणा सीमेवर शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले. मात्र, पोलिस आल्यानंतरही आंदोलकांनी तेथे गोंधळ घातला आणि मृतदेह बॅरिकेडवरून उतरविण्यास विरोध केला. या घटनेच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या आहेत, त्यामध्ये सशस्त्र आंदोलकांनी प्रथम लखबीर सिंग यास जबर मारहाण केली, त्यानंतर त्याचा हात कापला आणि अखेरीस त्यास बॅरिकेडला लटकवून दिले. धक्कादायक म्हणजे लटकविलेल्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून या हत्येचे समर्थनही करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हत्या झालेल्या आंदोलनस्थळी खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचेही छायाचित्र असल्याचे समोर आले आहे.
 
 
संयुक्त किसान मोर्चाने जबाबदारी झटकली
 
 
आंदोलनस्थळी झालेल्या या निर्घृण हत्येची जबाबदारी नेहमीप्रमाणेच संयुक्त किसान मोर्चाने झटकली आहे. संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये, मोर्चा या घटनेचा निषेध करीत असून हत्या करणारा निहंग्यांचा समुह आणि मृत व्यक्ती यांचा संयुक्त किसान मोर्चाशी कोणताही संबंध नाही. संयुक्त किसान मोर्चा हा कोणत्याही धार्मिक प्रतिकांच्या अवमानाच्या विरोधात आहे, मात्र त्या आधारे कोणीही कायदा – सुव्यवस्था हाती घेऊ नये. या घटनेची चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, अस पत्रक योगेंद्र यादव, बलबीर सिंग राजेवाल, डॉ. दर्शन पाल, गुरनामसिंग चढुनी, हनन मौला, जगजीत सिंग डल्लेवाल, जोगिंदर सिंग उगराहां, शिवकुमार शर्मा कक्काजी आणि युद्धवीर सिंग यांनी प्रसिद्ध केले आहे.
 
 
निहंग्यांच्या समुहासोबत आपला संबंध नसल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरीही त्यात तथ्य नाही. कारण, दिवसापासूनच आंदोलनामध्ये निहंग्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे २६ जानेवारी, २०२१ रोजी झालेल्या दंगलीमध्ये पोलिसांवर तलवारी उगारणे, मारहाण करणे यामध्ये निंहग्यांचा सहभाग स्पष्टपणे दिसून आला होता. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चा आता आपला त्यांच्याशी संबंध नसल्याचे सांगून जबाबदारीपासून पळ काढत असल्याचे स्पष्ट आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0