स्नेहमयी दुर्गा

13 Oct 2021 11:11:37

Navdurga  _1  H






बालविकास, महिला सक्षमीकरण आणि समाज उत्थानासाठी गेली पाच दशके काम करणार्‍या ‘स्वरूपवर्धिनी’ संस्थेच्या सहकार्यवाहिका पुष्पा नडे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा लेखमालिकेतील सातवा लेख...
 
 
 
 
पुणे मराठी ग्रंथसंग्रहालया’चा ‘मातृस्मृती पुरस्कार’, बेळगावच्या ‘उत्थान संस्थे’चा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, ‘हिंगणे स्त्री संस्थे’चा ‘बाया कर्वे पुरस्कार’, पुणे नगरवाचन मंदिराचा ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’, ‘पुणे महानगर समरसता मंच’चा ‘महात्मा ज्योतिराव फुले समरसता पुरस्कार’, ‘रामादासची कळसकर पुरस्कार’, ‘शक्ती संस्थे’चा ‘शक्ती प्रेरणा पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांच्या मानकरी पुष्पा नडे. रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक सुदर्शनजी पुष्पा यांना बहीण मानत असत. पुष्पा सध्या ‘स्वरूपवर्धिनी’ या नामांकित संस्थेच्या सहकार्यवाह आहेत.
 
 
‘स्वरूपवर्धिनी’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचा मोठा डोंगर उभा केला. पुष्पा नडे म्हणजे ऊर्जेचा अखंड स्रोत. आज त्या ७२ वर्षांच्या आहेत. वयाचे सांगणे यासाठी की, वयाच्या ज्येष्ठत्वाने त्यांच्या कार्यास कोणत्याही मर्यादा आल्या नाहीत. आजही त्या पहाटे ३ वाजता उठतात, त्या आजही दररोज संस्थेच्या कार्यालयात जातात. त्यांच्या वर्तवणुकीतला स्नेह, समाधान आणि मातृमयी भाव हा संस्थेतील प्रत्येकासाठी आत्मीयच आहे.
 
 
 
मात्र, संस्थात्मक समाजकार्यासाठी जीवन वाहिलेल्या पुष्पा यांच्या आयुष्यातला प्रवास हा चारचौघींच्या वेदनेच्या प्रवाहातूनच उमलला आहे. मूळच्या वाई बावधानच्या, पण कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या मारोतराव नडे आणि ताराबाई यांच्या त्या कन्या. घरात अत्यंत कर्मठ वातावरण. वडील सेवाभावी होते. मुलांनी शिकावे हा मारोतरावांची इच्छा होती. त्यामुळे घरच्या गरिबीतही त्यांनी मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. या वाड्याच्या समोरच मिशनर्‍यांचे वसतिगृह होते. दर रविवारी या वसतिगृहाच्या लहान मुली नळाच्या थंड पाण्याने केस धुत असत. त्यावेळी पुष्पाही लहानच होत्या. मात्र, आपली आई आपल्याला गरम पाण्याने अंघोळ घालते. या मुलींना थंड पाण्याने अंघोळ करावी लागते, तीही स्वत:च्या हाताने हा विचार पुष्पा यांच्या मनात येई. आपण मोठे झालो की, या मुलांना मदत करायची, असे त्यांनी ठरवले. थोडक्यात, आपण समाजसेवा करायची, अशी त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली.
 
 
 
पण, दहावीनंतर त्यांचा विवाह झाला. विवाह, पती, संसार या गोष्टी कोणत्याही तरूणींच्या मनातल्या कोमल भावनाच. पण पुष्पांच्या नशिबी याबाबत भोगच आले. २४ तास नशेत असलेल्या संशयी पतीने त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा नरकच केला. मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळ हे तर दररोजचेच. मोजून दहा वर्षे हा नरकवास त्यांनी सहन केला. माहेरी परत जाणे शक्य नव्हते. कारण, आईवडिलांचे म्हणणे ‘दिल्या घरी तू सुखी राहा.’ पण सहन करण्याला मर्यादा असतात. शेवटी त्यांनी ठरवले, या असल्या जगण्याचा अंत करायचा.
 
 
 
दोन दिवस अन्नाचा कणही न घेता चार विषारी द्रव्ये घेतली, दिवसही निवडला रविवारचा. जेणेकरून दवाखाने बंद असतील. मग विष घेतले म्हणून कुणी दवाखान्यात नेऊ शकणार नाही. मात्र, शेजार्‍या-पाजार्‍यांना कळले आणि अक्षरश: पाच दिवस मृत्यूशी झुंज देत त्या शुद्धीवर आल्या. पुढे पुन्हा माहेरी आल्या, परत कधीही सासरी न जाण्यासाठी. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी कधी ‘कोलगेट’चे सर्वेक्षण करण्याचे काम केले, कधी साड्या विकण्याचे काम केले. त्याच काळात त्यांना जनगणना कार्यालयात नोकरी लागली. पण आता त्यांचे मन नोकरीत लागत नव्हते. त्यांनी नोकरी सोडून ‘बालग्राम’ या सामाजिक संस्थेत काम करण्याचे ठरवले.
 
 
 
या संस्थेत बालकांच्या संगोपनात पुष्पा मनापासून रमल्या. मात्र, संस्थेतील अंतर्गत राजकारणाचा कंटाळा येऊन सात वर्षांनतर त्यांनी या संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांना नाना जोशी या गुरुतुल्य व्यक्तीने ‘स्वरूपवर्धिनी’ संस्थेत काम करण्यासंदर्भात सुचवले. इथे संस्थेचे संस्थापक कृष्णा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने पुष्पा यांनी कामास सुरुवात केली. काम काय तर सेवावस्तीतील मुलांना एकत्रित करायचे. त्यांना बालवाडीच्या माध्यमातून शिकवायचे. तीन महिन्यांत पुष्पा केवळ १२ बालकांना जमवू शकल्या. पण पुष्पा यांना वाटले, आता आपल्याला संस्था कामावरून काढून टाकेल.
 
 
 
पण पटवर्धन म्हणाले, “अरे वा ! छान ! सुरू करा बालवाडी.” बालवाडी सुरू झाली. पुढे बालवाडीत येणार्‍या बालकांच्या मातांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही सुरू झाले. सकाळी बालवाडी, दुपारी महिला प्रशिक्षण घेणे अशा जबाबदार्‍या पुष्पा लिलया सांभाळू लागल्या. त्यानंतर पुढे संध्याकाळी बालकांसाठी वर्गही त्या घेऊ लागल्या. या माध्यमातून हजारो कुटुंबांना प्रशिक्षित करण्याचे काम त्यांनी केले. मंदिराचा कळस महत्त्वाचाच, पण त्याच्या पायाखालचा दगड त्याहीपेक्षा महत्त्वाचा. पुष्पा या ‘स्वरूपवर्धिनी’च्या भव्य कार्याचा पाया आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भयंकर त्रासाला कंटाळून आत्महत्या करू पाहणार्‍या पुष्पा यांनी कौटुंबिक समुपदेशातून हजारो घरात समन्वयही घडवून आणला आहे. त्यांचे संस्था उभारणीतले योगदान, हजारो कुटुंबांच्या सक्षमीकरणातले योगदान शब्दातीत आहे. समाजोत्थासाठी निर्लोभपणे सेवा करणार्‍या पुुष्पा या स्नेहमयी दुर्गाच आहेत.






Powered By Sangraha 9.0