कृतिशील विचारांचा गतिमान नेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2021
Total Views |

pd 2_1  H x W:



 सहकार क्षेत्रामध्ये तर आमदार प्रवीणजींनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर अनेक यशाची शिखरे गाठली आहेत. सातत्याने नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती, सर्वसमावेशक विचारसरणी, धाडसीपणा, अत्युच्च आकलन शक्तीच्या जोरावर तर त्यांनी सहकार क्षेत्रात अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. मजूर चळवळीतील साधा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेल्या या व्यक्तीचा सहकारातील प्रवास, तर अत्यंत अचंबित करणारा आहे.



नितीन बनकर - आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांचा वाढदिवस म्हणजे खर्‍या अर्थाने आम्हा कार्यकर्त्यांचा आनंद सोहळाच म्हणावा लागेल. त्याला कारणही तसेच आहे. आदरणीय प्रवीणजी म्हणजे कार्यकर्ता तयार करण्याचा कारखाना असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षांत प्रवीणभाऊंनी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते नुसते तयार केले नाहीत, तर त्यांना आर्थिक व राजकीय मुख्य प्रवाहात आणून त्यांचे उत्थान करण्याचे कामही त्यांनी केले. म्हणून; तर जिथे जाईल तिथे प्रवीणजी यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा कायम असतो. ‘कार्यकर्ता हीच माझी ऊर्जा, कार्यकर्ता हीच माझी शक्ती’ आणि ही शक्ती वाढविण्याची, जोपासण्याची त्यांची तळमळ नेहमीच दिसून येते. म्हणूनच या ऊर्जावान नेतृत्वाचा वाढदिवस म्हणजे आमचा आनंद सोहळाच!


गेली १६-१७ वर्षे आमदार प्रवीणभाऊ यांच्याबरोबर त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, सहकारी व राजकीय जीवनाचे अनेक पैलू मला जवळून अनुभवता आले. ‘परिस’ ही काल्पनिक वस्तू आपण ऐकून आहोत, या वस्तूचा लोखंडाला स्पर्श झाला तर ती वस्तू लोखंडाचे सोने करते. परंतु, प्रवीणजी यांचे नेतृत्व इतक्या उच्च प्रतीचे आहे की, ते लोखंडाला नुसतच सोने करत नाहीत, तर ते त्या लोखंडालाच आपले गुणधर्म देऊन टाकतात. म्हणजेच लोखंडाचे सोने न करता परिसच करून टाकतात, म्हणूनच त्यांच्या अवतीभवती त्यांच्या परिसस्पर्शाने जीवनाचे सोने झाले असंख्य कार्यकर्ते, नेते समाजात दिसतात.
 

सहकार क्षेत्रामध्ये तर आमदार प्रवीणजींनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर अनेक यशाची शिखरे गाठली आहेत. सातत्याने नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती, सर्वसमावेशक विचारसरणी, धाडसीपणा, अत्युच्च आकलन शक्तीच्या जोरावर तर त्यांनी सहकार क्षेत्रात अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. मजूर चळवळीतील साधा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेल्या या व्यक्तीचा सहकारातील प्रवास, तर अत्यंत अचंबित करणारा आहे. ‘मजूर संस्थे’चा सदस्य ते ‘मजूर फेडरेशन’चा अध्यक्ष त्याच क्षेत्रातून प्रवास करत ‘मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’त संचालक म्हणून निवडून येणे, गेली २१ वर्षे त्या बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत त्यातील १२ वर्षे अध्यक्ष म्हणून जबाबदारी समर्थपणे सांभाळणे, ‘महाराष्ट्र राज्य सहकारी संघ’ या राज्यस्तरीय संस्थेवर संचालक म्हणून काम पाहणे दोन वेळा राज्यस्तरीय सहकार परिषद भरवून सहकारातील समस्या शासन दरबारी मांडून त्या जीवापाड प्रयत्न करून त्यांचे निराकरण करताना मी त्यांना जवळून पाहिले आहे. “राजकारणात कितीही उंचीवर गेलो, तरी माझे पाय सहकाराच्या जमिनीवर स्थिर असणार. किंबहुना, माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाचा पायाच मुळी सहकार आहे,” असे मत व्यक्त करताना मी प्रवीणभाऊंना भावनिक होताना पाहिले आहे. जिल्हा बँकेचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी मुंबई जिल्हा बँकेत अनेक नवनवीन योजना आणल्या. गिरणी कामगारांना घरे देणे, माथाडी कामगारांना घरे देणे, मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास इत्यादींसारख्या नवनवीन योजना बँकेत राबवून समाजातील आर्थिक, शोषित, पीडितांचे आर्थिक उत्थान करण्याचे पवित्र कार्य ते गेली अनेक वर्षे करत आहेत.
 
 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रवीणभाऊंचे नेतृत्वगुण, अभ्यासूवृत्ती, बेधडकपणा, आक्रमकता इत्यादी गुण अचूक हेरले. रत्नपारखीला रत्नाची खरी पारख असते. त्यांनी प्रवीणभाऊंच्या अंगी असलेले हे गुण ओळखून त्यांना दि. १७ डिसेंबर, २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडले. आधीच कर्तृत्ववान असणार्‍या प्रवीणभाऊंच्या नेतृत्वाला देवेंद्रजींनी ताकद दिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा अधिकच विस्तारल्या. आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर प्रवीणभाऊंनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. जिथे अन्याय असेल, अत्याचार असेल, नागरिकांच्या सुविधांचा प्रश्न असेल, अशा प्रश्नांवर प्रवीणभाऊ रस्त्यावर आणि विधिमंडळात तुटून पडले. जनतेच्या हितासाठी आपल्या प्रकृतीची, कुटुंबाची पर्वा न करता प्रवीणजी सतत प्रवास करीत राहिले. अन्यायाला वाचा फोडत राहिले. ‘कोविड’ काळात, तर ‘कोविड सेंटर’मध्ये जाऊन तेथील सुविधांवर लक्ष ठेवून त्यातील भ्रष्टाचारदेखील बाहेर काढला. जिथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार, नैसर्गिक आपत्ती असेल तिथे प्रवीणभाऊ सर्वात अगोदर पोहोचले आणि त्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न उभ्या महाराष्ट्राने माध्यमांच्या द्वारे पाहिला आहे.
 
 
 

अभ्यासूवृत्ती, अफाट आकलनशक्ती लाभलेल्या या नेतृत्वाचा अजून एक गुण म्हणजे उत्कृष्ट वक्तृत्व! प्रवीणभाऊंचे भाषण म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांना मेजवानीच! आपल्या अमोघ वक्तृत्वाने भाऊंनी अनेक सभा गाजविलेल्या आम्ही पाहिल्या आहेत. आपले मत मांडताना भाऊ अत्यंत ठाम असतात. बोलण्यापूर्वी विचार करणे, विषयाचा अभ्यास करणे, त्याचा बारकावा शोधणे हे त्यांचे गुण नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आहेत. नुसताच आवाज चढवून भाषण करणे योग्य नाही, तर आपल्या भाषणातून विचार गेले पाहिजेत. आवाजाची उंची नाही, तर विचारांची उंची वाढली पाहिजे, असे भाऊ नेहमी सांगतात. म्हणूनच ‘राष्ट्रकुल संघा’च्यावतीने सन २०१९ चा विधिमंडळातील उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार भाऊंना मिळाला व भाऊंनी आपली निवड सार्थ ठरवून दाखवली.
 
 
 

प्रवीणभाऊ म्हणजे लोहचुंबकासारखे व्यक्तिमत्त्व. सहकारात, राजकारणात, सामाजिक जीवनात काम करताना सर्वांना सांभाळून घेणे, मदतीला, अडीअडचणींना धावून जाणे हा भाऊंचा अत्यंत महत्त्वाचा पैलू. स्वपक्षीय तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेतेमंडळींबरोबर भाऊंचे संबंध एकदम चांगले आहेत. कारण, राजकारणापलीकडे जाऊन मदत मागणार्‍याला मनापासून मदत करणे हा भाऊंचा स्थायीभाव. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध अत्यंत चांगले किंवा कौटुंबिक असल्याचे मी नेहमी जवळून पाहत आलो आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रवीणभाऊंचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे, असे नक्कीच म्हणता येईल.
 
 

प्रवीणभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा पैलू म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. भाऊंचा जीवनातील प्रत्येक घटनेकडे, व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो. त्यामुळेच तर भाऊ नेहमी प्रसन्नमुख असतात. त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असल्यामुळे मी त्यांना इतक्या वर्षांत कधी नाराज, नाउमेद होताना पाहिले नाही. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा ठासून भरली आहे की, पाहणार्‍यांना त्यांचा हेवाच अधिक वाटतो.
 
 
 

प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख, चढ-उतार, यश-अपयश येतेच. परिस्थितीला वश होऊन अनेकांना आपल्या ध्येयापासून परावृत्त होताना आपण पाहतो. परंतु, भाऊंचा लढणे हा स्थायीभावच. समस्या अडचण कितीही मोठी असो न डगमगता ध्येयाने त्या अडचणींना समस्यांना सामोरे जाणे, हे तर भाऊंचे रोजचेच काम! अनेक अडचणी, समस्यांना तोंड देत भाऊंनी हे यश गाठले आहे. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानादेखील भाऊंनी केवळ आपल्या असामान्य नेतृत्वामुळे कठोर परिश्रमामुळेच मेहनतीमुळे यशाची अनेक शिखरे गाठली आहेत.
 
 

सर्वसामान्यांचा असामान्य नेता, कर्तृत्ववान, प्रतिभावान, स्वतंत्र प्रतिमेचे नेतृत्व, कृतिशील विचारांचा, दूरदृष्टीचा नेता, उत्कृष्ट वक्ता, निरपेक्ष मित्र, प्रेमळ सहकारी, निगर्वी अशी अनेक विशेषणे भाऊंच्या ठिकाणी एकवटलेली दिसतात. अशा या सर्वमान्य लोकमान्य नेतृत्वास आई जगदंबा दीर्घ व निरोगी आयुष्य देवो. त्यांच्या हातून देव, देश, धर्म, राज्य, समाजाची अशीच उत्तरोत्तर सेवा घडो आणि माझ्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांचे जीवन अधिकाधिक उजळो, या सदिच्छांसह प्रवीणभाऊंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

- नितीन बनकर

(लेखक मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे संचालक असून  भाजप भायखळा विधानसभेचे अध्यक्ष आहेत.)



अभ्यासू नेता...

आमदार म्हणून पहिल्यांदा २००९ साली मी विधानसभेत निवडून गेलो, तेव्हा प्रवीण दरेकर हेदेखील प्रथमच आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हापासून त्यांचा आणि माझा परिचय झाला. जे काही आमदार आपल्या मतदारसंघाचे तसेच राज्यातील विविध विषयांवरील प्रश्न पोटतिडकीने आणि अभ्यासूपणे विधानसभेत मांडत होते, त्यापैकी प्रवीण दरेकर यांचा वरचा क्रमांक होता. प्रत्येक विषयात खोलवर जाऊन माहिती घेणे आणि मगच त्यावर वक्तव्य करणे, ही दरेकरांची कार्यशैली आहे. एक संवेदनशील, अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून दरेकर मला परिचित आहेत. विद्यार्थिनेते, आमदार ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय आहे.


कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनेक खाचखळग्यांवर मात करत त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. लहानपणी घरच्या हलाखीमुळे पाच किलोमीटर दररोज प्रवास करून शिक्षण घेणारे दरेकर यांचं नेतृत्व म्हणूनच संघर्षमय परिस्थितीच्या भट्टीत तावून-सुलाखून निखरलेले नेतृत्व आहे. महाडच्या एका खेड्यातून सर्वसामान्य घरातील हा सुपुत्र आज महाराष्ट्र विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून राज्यस्तरीय कामगिरी करीत आहे. विद्यार्थिनेता म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेली आंदोलने आजही लोकांच्या स्मरणात आहेत. दरेकरांना अन्यायविरोधात आत्यंतिक चीड आहे आणि म्हणूनच त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड न करता प्रसंगी कठोर भूमिका घेतलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन २०१५ साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून अल्पावधीतच त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली. योग्य नेतृत्वाचा भाजपमध्ये नेहमीच महत्त्वाची जबाबदारी देऊन सन्मान केला जातो. दरेकर यांना २०१६ साली महाराष्ट्र विधान परिषदेवर संधी देण्यात आली आणि त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्राला विकासपथावर अग्रेसर ठेवणारे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबरच विधान परिषदेत राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेवर नेमकं बोटं ठेवून दरेकर खडे बोल सुनावत असतात. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास दरेकर यांनी राज्य सरकारला अनेक वेळा भाग पाडले आहे. लढाई विधानसभेतील असो वा आंदोलनाच्या रूपातील रस्त्यावरील, प्रवीण दरेकर पूर्ण ताकदीने लढत असतात. या लढवय्या नेतृत्वासाठी वाढदिवसानिमित्ताने मी सुयश चिंतितो.


- संदीप नाईक, माजी आमदार



परिसस्पर्शी प्रवीणभाऊ...!

खरं म्हणजे विरोधी पक्षनेता म्हटलं म्हणजे अतिशय व्यस्त, सहजासहजी भेट न होणे आणि नेमक्या मोठ्या लोकांसोबत संपर्क ठेवणारी व्यक्ती अशी काहीशी आभासी प्रतिमा आमच्या मनात होती. पण, अशा पारंपरिक प्रतिमेस तडा देऊन सामान्य कार्यकर्त्यांना वेळ देणारी व्यक्ती म्हणजे प्रवीण यशवंत दरेकर. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे, ही त्यांची प्रामाणिक भावना. घरी आणि कार्यालयात आलेला प्रत्येक व्यक्ती म्हणजे देवाचे रूप आणि त्याची सेवा करणे हे माझे सौभाग्य, या शिकवणुकीतून प्रत्येकासाठी आदर्श घालून देणार्‍या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण यशवंत दरेकर यांचा आज वाढदिवस.



खरं म्हणजे प्रत्येकालाच प्रवीणभाऊंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभतोच, असे नाही. परंतु, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्यासारख्या सहकारातील सामान्य कार्यकर्त्याला गेली २० वर्षे सातत्याने प्रवीणभाऊंचा सहवास लाभला. मुंबई सहकारी बोर्ड असो, मुंबई जिल्हा बँक असो, प्रत्येक संस्थेच्या सभासदाला प्रवीणभाऊ अगदी समान महत्त्व देणार. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, आलेला प्रत्येक मेसेज वाचून त्याला आत्मीयतेने प्रतिसाद देणे, कितीही तणावात असले तरी काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला वेळ देऊन त्याचे काम करून देणे, लोकांना किंमत दिली, तरच आपली किंमत राहते आणि लोकांची किंमत केली, तर आपली किंमत संपते, अशा एक ना अनेक बहुआयामी स्वभावाच्या प्रवीणभाऊंच्या टीममध्ये काम करायला मिळणे म्हणजे आमचे सौभाग्य. प्रवीणभाऊंची कार्य करायची पद्धती, वेळ व्यवस्थापन, गोष्ट तडीस नेऊन निकाली लावण्याची जिद्द या आणि अशा अनेक सद्गुणांमुळे प्रवीणभाऊ लाखो कार्यकर्त्यांच्या गळ्यातले ताईत आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांस अनेक समाजोपयोगी काम करण्यासाठी प्रवीणभाऊंनी जी प्रेरणा दिली, त्यामुळेच गेली दोन वर्षे ‘कोविड’मध्ये आम्ही ‘कोविड’ रुग्णांची सेवा करू शकलो. त्याबद्दल मला मिळालेला ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’चा सन्मान हा मी प्रवीणभाऊंना समर्पित करतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’च्या संचालकपदी नेमणूक केल्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. जो जो कार्यकर्ता त्यांच्या संपर्कात येईल, त्याला उत्तमरीत्या घडवणार्‍या परिसस्पर्शी प्रवीणभाऊंना मनापासून सलाम. अडीअडचणींमध्ये प्रत्येकाच्या मदतीला धावून या महानेत्याला उत्तम आरोग्य, स्थैर्य, समाधान आणि राजकारणातील सर्वोच्च पद प्राप्त होवो, हीच त्यांच्या वाढदिवसादिवशी ईश्वरचरणी प्रार्थना!

- विशाल कडणे, संचालक, दि मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशन मर्यादित


@@AUTHORINFO_V1@@