चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी नवे अध्यादेश ; निर्मात्यांपुढे प्रश्न

२२ ऑक्टोबरपासून राज्यात चित्रपट आणि नाट्यगृह खुली होणार

    दिनांक  13-Oct-2021 14:03:07
|

cinema_1  H x W
मुंबई : राज्यामध्ये आता कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली. मंदिरांचे दरवाजे खुले केल्यानंतर आता नाट्यगृह, चित्रपटगृहदेखील २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने या बाबतीत कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना देखील नियंत्रित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
 
 
 
राज्यात २२ ऑक्टोबरपासून चित्रपट आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र यामध्ये बदलकरून चित्रपट आणि नाट्यगृह १०० टक्के क्षमतेने सुरु करा. कारण ५० टक्के क्षमतेने चित्रपट आणि नाट्यगृह सुरु करणे, आर्थिकदृष्ट्या कलाकारांना परवडणारे नाही. कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घ्या, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे मागणी केली आहे. ५० टक्के क्षमतेने चित्रपट आणि नाट्यगृह खुले करण्याचा निर्णय व्यवसायिक दृष्ट्या योग्य नसल्याचे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
 
नियमावलीत काय म्हंटले आहे?
 
चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरी चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. तसेच, चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छता गृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
 
 
 
चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आत प्रवेश करणाऱ्या प्रेक्षकांचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे. प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे? याबाबत आखणी करण्यात यावी. तसेच चित्रपटगृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही, याची काळजी सुद्धा घेणे आवश्यक आहे.
 
 
 
मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळया पडद्यांवर दाखवले जातात, अशा वेळी मध्यंतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरून प्रेक्षकांची गर्दी होणार नाही. चित्रपटगृहांमध्ये काम करणारे कर्मचारी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुद्धा लसीकरण करणे आवश्यक आहे. शॉपिगमॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरवण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.