"खान म्हणजे प्रभावशाली, पुराव्यांशी छेडछाड करू शकतो"

13 Oct 2021 16:15:45

Aryan Khan_1  H
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीपूर्वी एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात आपले उत्तर दाखल केले. यामध्ये एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध करत सांगितले की, "एका आरोपीची भूमिका दुसऱ्यापासून वेगळी करता येत नाही. आरोपीकडून कोणतेही साहित्य मिळालेले नाही, तरीही तो या संपूर्ण कटात सहभागी आहे."
 
 
 
पुढे एनसीबीने म्हंटले आहे की, " खान म्हणजे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे. तो पुराव्यांशी छेडछाड करु शकतो. आरोपी अचित कुमार आणि शिवराज हरिजन यांनी आरोपी आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला चरस पुरवला होता. आर्यन आणि अरबाज एकमेकांशी संबंधित आहेत. आमच्या रेकॉर्डमध्ये असे साहित्य आहे जे दर्शवते की आर्यन खान परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता. आम्ही परदेशातील व्यवहारांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहोत. तपास अजून सुरू आहे."
 
सलमान खानची केस लढणारे आर्यन खानचे वकील अमित देसाई
 
क्रुझवर मारलेल्या छापेमारीत बाहेर आलेल्या ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर शाहरुख खानने आर्यनसाठी अमित देसाई या मुंबईतील प्रसिद्ध वकिलाची नियुक्ती केली आहे. सतीश मानेशिंदे यांच्यासह ते या प्रकरणाची वकिली करणार आहेत. २००२मध्ये अमित देसाई यांनी हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. आर्यनचा जामीन अर्ज यापूर्वी किला कोर्टाने फेटाळला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यनसह २० लोकांना अटक केली आहे, यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0