संवेदनशील, लढवय्ये आणि अभ्यासू नेतृत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2021
Total Views |

darekar_1  H x



विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांचा आज वाढदिवस. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने त्यांचे सर्वप्रथम अभीष्टचिंतन करतो आणि त्यांना उत्तम तसेच दीर्घायु लाभो, यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो!


भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या वर्गासाठी जे सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांना पक्षाकडून नेहमीच चांगली संधी मिळते. प्रवीण दरेकर हे त्यापैकीच एक. त्यांच्यातील लढवय्या, संवेदनशील आणि अभ्यासू आदी नेतृत्वगुणांमुळेच आज ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचले आहेत. एखाद्या संवेदनशील विषयावर ते आपले म्हणणे मांडत असतात. त्यावेळीत्यांच्यातील अभ्यासूवृत्ती नेहमीच सर्वांना पाहायला मिळते.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, अनंत अडचणींवर मात करत, त्यांनी राज्याच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रवीणजींचे वडील हे एसटी कंडक्टर. काही कारणांमुळे त्यांची एसटीतील नोकरी सुटली. त्यामुळे त्यांच्या आईला मासळी विकून घरखर्च चालवायला लागायचा. त्यामुळे गरिबी काय असते, हे माझ्याप्रमाणेच प्रवीणजींनीही अगदी जवळून अनुभवलं आहे. शालेय जीवनात शाळेत जाण्यासदेखील त्यांच्याकडे पैसे नसायचे, अशावेळी महाड तालुक्यातील आपल्या मूळ (वसाप) गावापासून रोज पाच किलोमीटर पायी प्रवास करुन शाळा गाठायचे अन् संध्याकाळी शाळा सुटली की, पुन्हा पाच किमींची पायपीट करायची. त्यामुळे राजकीय जीवनात काम करत असताना, कोणत्याही संवेदनशील विषयावर मत व्यक्त करताना, त्यांच्यातील हळवेपणा नेहमीच अधोरेखित होत असतो.प्रवीणजींनी आपलं शालेय शिक्षण मूळ गाव वसाप, दहावीपर्यंतचं पोलादपूर आणि नंतर मुंबईतून पदवीचं शिक्षण घेतलं. या काळात त्यांनी ज्या अडचणींचा सामना केला, त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत गेलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा विकास होत गेला. 2015 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर, त्यांनी मुंबई आणि कोकणात भाजपचे काम वाढविण्यास सुरुवात केली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळेच आज मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले आहेत.



पक्षवाढीच्या अनुषंगाने ते जसे संघटनकुशल आहेत, त्याचप्रमाणे अतिशय आक्रमक, संवेदनशील आणि अभ्यासूदेखील आहेत. त्यामुळेच २०१९  मध्ये शिवसेनेच्या विश्वासघातामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावं लागल्यानंतर, पक्षाने दरेकर यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज ज्या प्रकारे राज्य सरकारला धारेवर धरण्याचे काम केले आहे, ते पाहता, त्यांची नियुक्ती सार्थ होती, हे त्यांनी सिद्ध केले आहे. कारण, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे विधानसभेत आणि बाहेरही राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा चुकीचा व भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणतात, अगदी त्याचप्रमाणे प्रवीणजीदेखील विधान परिषदेत सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडतात. त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री अधिवेशनाच्या काळात सभागृहात कमी आणि आपल्या दालनात जास्त असतात, अशी स्थिती आहे.गेल्या दोन वर्षांत कोकणाला ‘तोक्ते’ आणि ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला. चिपळूणमध्ये अतिवृष्टीने सर्वांची दाणादाण उडाली. रायगड जिल्ह्यातील महाडमधील तळीयेमध्ये माळीणप्रमाणेच अनेक कुटुंबे जमिनीखाली गाडली गेली. या सर्व आपत्तीत प्रवीणजींनी ज्याप्रकारे काम केले, त्यातून त्यांची संवेदनशीलता दिसून येते. तळीयेमध्ये तर अनेक कुटुंबे दरड कोसळून जमिनीत गाडली गेल्याचे वृत्त आले. त्यावेळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश पाहवत नव्हता. कितीही संपर्क केला, तरी प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नव्हत्या. त्यावेळी काट्या-कुट्यातून, निसरड्या पायवाटांतून वाट काढत प्रवीणजी तिथे पोहोचले अन् तिथल्या नागरिकांना धीर देण्याचं काम त्यांनी केलं. प्रवीणजी तिथे पोहोचल्याचे कळताच खडबडून जागे झालेले प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ते आल्यानंतर मात्र प्रवीणजींचा रुद्रावतार सार्‍या महाराष्ट्राने पाहिला होता.‘कोविड’ काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरुन काम करत होता. त्या काळात प्रवीणजीदेखील आपल्या जीवाची पर्वा न करता कोकणवासीयांसाठी काम करत होते. या काळातच महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभाराची अनेक प्रकरणे समोर येत होती. त्यानंतर देवेंद्रजींच्या सूचनेनुसार आणि माझ्याशी चर्चा करून, प्रवीणजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना संकटकाळात प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील प्रशासकीय यंत्रणांचे घोटाळे जनतेसमोर आणत होते. याच काळात कुर्ला, मालाडमधील काही रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना लुटणार्‍या व ‘कोविड’मध्ये मृत पावलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरू होते. हा प्रकार रोखण्यासाठी प्रवीणजींनी आंदोलन करुन रुग्णांच्या नातेवाइकांना न्याय मिळवून दिला.



‘कोविड’च्या काळात घरखर्च भागवणे अशक्य झाल्याने दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समजातच प्रवीणजी अतिशय दु:खी झाले. या घटनेनंतर, त्यांच्याशी बोलताना त्यांचा गळा दाटून आल्याचे जाणवत होते. कारणही तसेच होते म्हणा! कारण, एकेकाळी आपल्या वडिलांची नोकरी गेल्यानंतर ज्याप्रकारचे संकट प्रवीणजींच्या कुटुंबीयांवर कोसळले होते, त्या आठवणी कुठेतरी ताज्या झाल्या होत्या. त्यामुळेच एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येबद्दल ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली होती.



अशा या अतिशय संवेदनशील आणि अभ्यासू आणि लढवय्ये नेतृत्व असलेले प्रवीणजी आज वयाची ५३  वर्षे पूर्ण करुन ५४  व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि राज्यातील जनतेसाठी त्यांचे कार्य असेच अविरतपणे सुरू राहो, यासाठी पुनश्च शुभेच्छा देतो!




- चंद्रकांतदादा पाटील

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)












@@AUTHORINFO_V1@@