लढवय्या नेता!

    दिनांक  13-Oct-2021 13:41:26
|

dareakr_1  H xरायगड जिल्ह्यातील एका गावातील विद्यार्थी. घरात प्रतिकूल आर्थिक स्थिती. या विद्यार्थ्याला एसटीचा पास काढायला पैसे नव्हते, म्हणून तो रोज पाच किलोमीटर चालत जात असे. पुढे हा विद्यार्थी मुंबईत आला. धडपडला, लढला आणि घडला. आज तो राज्याच्या विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे आणि त्याचे नाव आहे, प्रवीण दरेकर!
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर गेली दीड वर्षे सातत्याने बातम्यांच्या केंद्रस्थानी असतात. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून दरेकर विधिमंडळात आणि बाहेरही सत्ताधार्‍यांशी लढत असतात. सातत्याने जनतेचे प्रश्न मांडत असतात. त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी धावून जाणार्‍या दरेकर यांचा आजचा संघर्ष आणि धावपळ हे कौतुकाचा विषय असले तरी मुळात ते ज्या रीतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे आले आहेत, ते पाहता आजचा संघर्ष स्वाभाविक वाटतो. संघर्ष करणे हाच त्यांचा स्वभाव...गावाकडून मुंबईत आल्यानंतर प्रवीण दरेकर विद्यार्थी चळवळीत काम करू लागले. तेथेही त्यांचा पवित्रा आक्रमक संघर्षाचाच होता. त्यांना एखाद्या कॉलेजमध्ये जायचे असेल, तर तेथे २००-३०० पोलिसांचा बंदोबस्त लावलेला असे. रस्त्यावर उतरून संघर्ष करणे त्यांना स्वाभाविक वाटते. ते अभिमानाने सांगतात, “मी रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता आहे.” महागाईच्या विरोधात आंदोलन असेल तर ते रेल्वेसमोर उभे राहून ‘रेल रोको’ आंदोलन करत असत. अशाच एका आंदोलनात त्यांना मारहाण झाली. रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले. आपल्या सैनिकाला झालेली मारहाण पाहून त्यांना काळजी वाटली. त्यावेळी त्यांनी दरेकरांच्या पाठीवर मलम लावले. अशा संघर्षाच्या अनेक आठवणी त्यांच्याकडे आहेत. शिवसेनेत असताना संघर्ष करतच ते वाटचाल करत होते. पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर २००९ साली विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेल्यावरही त्यांचा संघर्षाचा पवित्रा कायम होता.विद्यार्थी चळवळ आणि राजकारणाप्रमाणे त्यांनी दीर्घकाळ सहकार क्षेत्रात काम केले. ते ‘मुंबई बँक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ या मोठ्या सहकारी बँकेचे संचालक झाले. त्यावेळी बँकेचा व्यवसाय १,२०० कोटी रुपयांचा होता. तेथून बँकेचा व्यवसाय नऊ हजार कोटी रुपयांवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.विद्यार्थी चळवळ, विधानसभा सदस्य, सहकार चळवळीतील काम अशा पार्श्वभूमीसह प्रवीण दरेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपमध्ये फार लवकर रुजले.भारतीय जनता पक्ष हा सनदशीर पक्ष आहे. नेत्यांचे मर्यादशील वागणे-बोलणे यामुळे भाजपला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष मानले जाते. इतर राजकीय पक्षांप्रमाणे भाजपमध्ये ‘लॉबिंग’ चालत नाही किंवा पक्षांतर्गत वादांची धुणी सार्वजनिकरीत्या धुतली जात नाहीत. पण, मर्यादशील असले तरी भाजपचे नेते संघर्षशील आहेत. नम्र पण ठाम, ‘पोलाईट बट फर्म’ हे इथले सूत्र आहे. भाजपमध्ये बहुतांश नेते हे कार्यकर्ता म्हणून दीर्घकाळ काम करत पुढे आलेले आहेत. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला आहे. राजकारणातही अनेक अडथळे ओलांडले आहेत. असंख्य पीडा आणि संकटांवर मात करत आपल्या पक्षाच्या विचारांसाठी धडपड केलेली आहे. त्यामुळे बालपणापासून प्रतिकूलतेशी संघर्ष करणारे प्रवीण दरेकर भाजपमध्ये रुजणे तसे स्वाभाविकच होते.भाजपमध्ये येण्यापूर्वीची त्यांची कार्यशैली वेगळी असली तरी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द आणि तरीही जमिनीवर पाय ठेवून राहण्याची कार्यकर्त्याची वृत्ती समानच होती. त्यांनी भाजपची कार्यसंस्कृती झटपट अंगीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने युती करून विजय मिळवला. पण, विश्वासघातामुळे भाजपला विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागले. अशा स्थितीत प्रवीण दरेकर यांना भाजपने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली आणि पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांच्यातील ‘लढवय्या नेता’ महाराष्ट्राने पाहिला.विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना प्रवीण दरेकर यांना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पक्षसंघटनेचे भक्कम पाठबळ मिळते. मुळात संघर्षशील स्वभाव आणि त्याला भाजपच्या रचनेचा आधार असे असल्याने प्रवीण दरेकर यांचे कर्तृत्व दिसून आले.राज्यात कोणतीही मोठी घटना घडली की, प्रवीण दरेकर ताबडतोब तेथे धावून जातात, संकटग्रस्तांशी स्वतः बोलतात, वस्तुस्थितीची माहिती करून घेतात, सरकारी अधिकार्‍यांना धारेवर धरतात आणि पत्रकारांशी बोलताना अन्यायाला वाचा फोडतात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी किती प्रवास केला असेल, याची गणना करणे अवघड आहे. नुकतीच कोकणात अतिवृष्टी झाली आणि चिपळूण शहर बुडाले, त्यावेळी ताबडतोब प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्तांच्या भेटीसाठी मुंबईतून तिकडे धाव घेतली. इतका प्रचंड पाऊस होता की, वाटेत महाडजवळच पाण्यात अडकले. तेथून त्यांनी फोनवरून सरकारी यंत्रणेला आणि प्रसिद्धिमाध्यमांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. ‘आपण रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता आहोत,’ असे ते अगदी अभिमानाने सांगतात आणि त्याचे प्रत्यंतर त्यांच्या प्रत्येक दौर्‍यात येते.त्यांनी संघर्षाला अभ्यासाची जोड दिली. विधिमंडळात भाषणे करायची तर केवळ आक्रमकता पुरत नाही, तेथे मुद्देही हवे असतात. त्यांनी हाती घेतलेल्या विषयाचा अभ्यास करण्याची आणि त्यातील खाचाखोचा जाणून घेण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे त्यांची भाषणे आक्रमकतेबरोबरच अभ्यासपूर्ण असतात. सत्ताधार्‍यांना धारेवर धरताना ते मुद्द्यांच्या आधारे पेचात पकडतात.


नवनव्या कल्पनांचा स्वीकार करण्यातही प्रवीण दरेकर आघाडीवर असतात. ‘मुंबई बँके’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी जुन्या हाऊसिंग सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाची संकल्पना अमलात आणली. या संकल्पनेच्या आधारे बोरिवलीत दोन टॉवर उभे राहिले. त्यातील सभासदांना बिल्डर पुनर्विकासामध्ये ४०० फुटांचे घर देणार होता. पण, सभासदांनी स्वयंपुनर्विकास केला आणि त्यांना प्रत्येकी ८०० चौरस फुटांची घरे मिळाली. दरेकर यांनी हा अनुभव विधान परिषदेत अभिमानाने सांगितला. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात सार्वजनिक शौचालय बांधून घेतले. पण, तेही एअर कंडिशन्ड! हे फाईव्ह स्टार सार्वजनिक स्वच्छतागृह चर्चेचा विषय बनले. ज्या पदावर काम करतो, तेथे काही तरी नावीन्यपूर्ण करावे, हा त्यांचा स्वभाव आहे.सामान्य परिस्थितीतून स्वतःच्या हिमतीवर पुढे आलेल्या प्रवीण दरेकर यांना भारतीय जनता पक्ष या हिंमतवान कार्यकर्त्यांच्या पक्षाचे माध्यम मिळाले आहे. भाजपची कार्यसंस्कृती अंगीकारून त्यांनी वाटचाल चालू ठेवली आहे. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून कोणत्याही दबावाला न झुकता ते काम करत आहेत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते धडाडीने पुढे जात आहेत आणि संघर्ष करत आहेत.
-डॉ. दिनेश थिटे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.